27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरसंपादकीयफरार वाल्मिकी कराडवर बुलडोजर चालणार?

फरार वाल्मिकी कराडवर बुलडोजर चालणार?

Google News Follow

Related

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अंगावर काटा आणणारे आहे. राज्यात सत्ता कोणाचीही येवो गुन्हे पूर्णपणे रोखणे अशक्य असते. परंतु गुन्हेगारांवर सत्ताधाऱ्यांची जरब असायला हवी. अन्यथा गुन्हेगारीला चाप लावणे कठीण होऊन बसते. देशमुख हत्या प्रकरणात वारंवार वाल्मिकी कराड यांचे नाव घेतले जाते आहे. या माणसाचे कर्तृत्त्व ऐकल्यानंतर भस्मासुराची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. देशमुख हत्या प्रकरणात कराड संबंध काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु हत्येनंतर त्याचे गायब होणे निश्चितच संशयास्पद आहे.

कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, समाजाभिमुख कामे करणाऱ्या, जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेल्या संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबात जो तपशील उघड झाला आहे, त्याचे वर्णन क्रौर्याचा नंगा नाच, या शिवाय दुसऱ्या शब्दात करता येत नाही.

ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये शिरण्याचा प्रयत्न एक टोळके करते. ड्युटीवर असलेला दलित समाजाचा वॉचमन तरुण त्यांना अटकाव करतो. त्याने नकार दिल्यामुळे बाचाबाची होते. वॉचमनच्या बाजूचे लोक आणि ते टोळके यांच्यात हाणामारी होते. प्रकरण पोलिस ठाण्यात जाते. तिथे सरपंच म्हणून संतोष देशमुख पोलिसांना तक्रार नोंदवायला सांगतात. याच दरम्यान पोलिस अधिकाऱ्याला कुणाचा तरी फोन आल्यामुळे तक्रार नोंदवली जात नाही.
याचाच वचपा काढण्यासाठी संतोष देशमुख यांचे अपहरण केले जाते. हालहाल करून हत्या केली जाते. त्यांच्या शरीराची विटंबना केली जाते. या प्रकरणातील म्होरक्या विष्णू चाटे हा वाल्मिकी कराडचा मावस भाऊ आहे, असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. हा चाटे राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे.

ग्रामीण भागात गावगुंड आणि राजकीय नेत्यांचे जबरदस्त साटेलोटे असते. अनेकदा पोलिस त्यांच्या दबावाखाली किंवा प्रभावाखाली काम करताना दिसतात. गोदामासमोर दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिस गोदामात घुसखोरी करणाऱ्या गटासोबत चहापान आणि गप्पाटप्पा करताना दिसले. प्रकाश झा च्या गंगाजल, अपहरण सारख्या सिनेमात बिहारमध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सामील असलेले पोलिस दाखवले आहेत, त्याची आठवण करून देणाऱ्या घटना या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार दिसतात.

कंपनीच्या गोदामासमोर झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी फिर्याद घ्यायला टाळाटाळ केली. कडेलोट म्हणजे संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर तक्रार नोंदवून घेण्यात पोलिस टाळाटाळ करत होते. सुमारे तीन तास पोलिसांनी काहीच केले नाही, अशी माहीती भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत उघड केलेली आहे. हे जर सत्य असेल तर देशमुख यांच्या हत्याप्रकरणात पोलिसही दोषी ठरतात. त्यांना या हत्या प्रकरणात सहआरोपी करणे ही सरकारची जबाबदारी बनते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींनी मकोका (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम एक्ट) लावण्याची घोषणा केली आहे. वाल्मिकी कराडचे नाव घेऊन ते म्हणाले आहेत की तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला सोडणार नाही. कराड यांची धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक चव्हाट्यावर आलेली आहे. कराडशी असलेले संबंध मुंडे यांनीही जाहीरपणे कबूल केलेले आहेत.

बीडच्या स्थानिक लोकांशी चर्चेनंतर मिळालेली माहीती भयंकर आहे. कधी काळी जेमतेम शंभर चौरस फूटांच्या झोपड्यात राहणारा हा कराड आज बीडमधील प्रस्थ बनला आहे. त्याच्यासोबत असलेले तरुणांचे टोळके आणि त्यातून निर्माण झालेल्या मनगटशाहीमुळे त्याची राजकीय उपयुक्तता मोठी होती. धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक आणि मुंडे यांची गेली अनेक वर्षे सत्तेशी असलेली जवळीक यामुळे कराडचे वजन बीड जिल्ह्यात वाढत गेले. विरोधात असलेल्यांना खणून काढायचे, कायम दहशतीत ठेवायचे. फार ताप झाला तर त्यांचा बंदोबस्त करायचा, अशा प्रकारची राजकीय संस्कृती काँग्रेसने महाराष्ट्रात रुजवली. जुन्या काळातील अनेक मराठी सिनेमात ही संस्कृती आपण पाहीलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची संस्कृती काही वेगळी नाही. कुजलेल्या अन्नात बॅक्टेरीया वाढावेत तसेच अशा राजकीय संस्कृती वाल्मिकी कराड याच्यासारख्या लोकांचा सुळसुळाट होतो.

हे ही वाचा..

तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ… एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

पाकमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ची केंद्रे सोयीसुविधांनी सुसज्ज; फ्रेंच मॅगझिनमध्ये धक्कादायक खुलासे

उपमुख्यमंत्री शिंदे यांची दीक्षाभूमीला भेट

निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ; खटला चालवण्यास नायब राज्यपालांची मंजुरी

बीड जिल्ह्यात या संस्कृतीला जातीय किनारही आहे. इथल्या राजकारणात मराठा विरुद्ध वंजारी असे सरळ सरळ तट पडलेले दिसतात. दोन जातींतला विखार संपणे काही पक्षांच्या राजकारणासाठी उपयुक्त नसल्यामुळे देशमुख प्रकरणाचे राजकारण केले जाणार गृहीत धरून चालायला हवे. याप्रकरणातील कोणतीही हयगय टपलेल्या राजकीय गिधाडांना संधी देणारी ठरेल. संतोष देशमुख हे समाजाभिमुख होते. सरपंच म्हणून आपल्या गावातील लोकांच्या हक्कासाठी जागरुक होते. त्यामुळेच त्यांनी जबाबदारी न टाळता हे प्रकरण अंगावर ओढवून घेतले. गावाच्या हितासाठी प्राणांचे मोल दिले. त्यांना न्याय मिळालाच पाहीजे. या प्रकरणातील आरोपींचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध स्पष्टपणे दिसतो आहे. महायुतीत सामील झालेल्या तीन पक्षातील हा एक पक्ष आहे. तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई होणार, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे.

धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी असे जाहीर विधान केलेले आहे. वाल्मिकी कराड हा त्यांचा खास माणूस असला तरी ते मंत्री म्हणून न्यायाच्या वाटेत आडवे येणार नाही, अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. वाल्मिकी कराड जिथे लपला असेल त्या बिळातन त्याला बाहेर काढण्याचे पहीले आव्हान सरकार समोर आहे. त्याची चौकशी झाली पाहीजे. देशमुख यांची हत्या करताना व्हीडीओ कॉल कुणाला करण्यात आले, या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहे. या प्रकरणात कराड सामील असेल तर त्याला गजाआड करण्यासोबत त्याच्या गुन्हेगारी साम्राज्यावर बुलडोजर चालवण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा