26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरसंपादकीयशरद पवारांची ब्रह्मोस चाचपणी...

शरद पवारांची ब्रह्मोस चाचपणी…

काँग्रेसमध्ये विलिनीकरण हा एकमेव पर्याय नसला तरी तो थोरल्या पवारांसाठी सोयीचा पर्याय नक्कीच आहे.

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात वेगवान हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार अस्वस्थ आहेत. पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली आणि ती फेटाळण्यातही आली. विलीनीकरणाचा दावा करणारे आणि ही शक्यता फेटाळणारे दोघेही पवार गटाचे नेते आहेत. काँग्रेसकडून याबाबत काही प्रतिक्रिया नाही. २०२२ मध्ये भारताचे ब्रम्होस क्षेपणास्त्र पाकिस्तानवर कोसळले होते. ती चूक नसून चाचपणी होती असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. विलिनीकरणाच्या वावड्या म्हणजे तशाच प्रकारची चाचपणी असण्याची शक्यता आहे.

भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या खानेवाल जिल्ह्यातील मियाचन्नू भागात कोसळले होते. ९ मार्च २०२२ ची ही घटना. हा भाग पाकिस्तानच्या सीमेपासनू १२४ किमी आत आहे. भारताने ही चूक असल्याचे पाकिस्तानला कळवले होते. परंतु ही चूक नसून आपले क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या रडारचा डोळा चुकवून आत शिरते काय, याची ही चाचपणी होती, असे मत या घटनेनंतर अनेक विश्लेषकांनी व्यक्त केले होते.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाची चर्चा ही अशाच प्रकारची चाचपणी आहे. पवार गटाचे एक नेते मंगलदास बांदल यांनी अशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल असेही सांगून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मात्र ही शक्यता फेटाळलेली आहे. हे दोन्ही नेते प्रमुख नेते नाहीत. विलिनीकरणाबाबतची चर्चा सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यापैकी कुणीही छेडलेली नाही. परंतु अशी चर्चा सुरू आहे, असे बांदल यांनी स्पष्ट केले आहेत. वरीष्ठ नेत्यांपैकी त्यांचे मत कोणीही खोडून काढलेले नाही.

हे ही वाचा:

पालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले!

कॅलिफोर्नियात एक भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळले

वरळी आदर्श नगर मैदानातील कुंपण क्रीडाप्रेमींनी उखडून टाकले!

 

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल केलेले आहे. निवडणुकी आधी चिन्ह मिळाले तरी ते सर्वदूर पोहोचवणे अशक्य नसले तरी सोपे नाही. शरद पवार हाच आमचा पक्ष आणि तेच आमचे चिन्ह असे त्यांचे समर्थक कितीही बोलत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आणि अनेक बडे नेते बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात एकदा म्हणाले होते, की शरद पवार राज्यभरात हात जोडून फिरले तरी लोक त्यांच्या पाठीशी येतील. बाळासाहेब जे काही म्हणाले तशी स्थिती तूर्तास दिसत नाही, आणि एप्रिल महीन्यात पाऊस पडण्याची शक्यताही नाही याची जाणीव शरद पवारांनाही आहे.

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर शरद पवार म्हणाले होते की ‘आमच्या इथे अलिकडे एखादा अपघातात मृत्यूमुखी पडला की लोक म्हणतात हा देवेंद्रवासी झाला’. शरद पवारांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शब्द वापरून टीका करावी लागते कारण त्यांचे राजकारण देवेंद्रवासी होण्याच्या मार्गावर आहे. विलिनीकरणाची चर्चा त्याचेच लक्षण आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पवारांचे जे राजकीय मल्लयुद्ध २०१४ पासून सुरू आहे. त्यात मविआच्या सत्तेचे अडीच वर्ष वजा केली तर फडणवीस पवारांना प्रत्येक वेळा पुरून उरले. पंतप्रधान पदाची दावेदारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद तर खूप दूरची गोष्ट, पवारांच्या उरल्यासुरल्या पक्षाचे विलीनीकरण करायचे की आणखी काही याची चर्चा आता त्यांच्या पक्षाचे नेते करतायत.

काँग्रेसमध्ये विलिनीकरण हा एकमेव पर्याय नसला तरी तो थोरल्या पवारांसाठी सोयीचा पर्याय नक्कीच आहे. सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरीकत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते. हा मुद्दा त्याच वर्षी म्यान करून त्यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले होते. आजही पवार यांची विचारधारा म्हणजे काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु हेच त्यांचे आदर्श आहेत.

पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारांच्या नियंत्रणाखाली असलेला काँग्रेसचा तुकडाच होता. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न फार अवघड नाही. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचा मोठा गट बाहेर पडला तर बरीच पदंही मोकळी होतील. त्यामुळे पदाधिकारीही वाऱ्यावर नसतील. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा एखादा नेता सोडला तर काँग्रेसच्या अन्य नेत्यांना शरद पवारांचे काही वावडे असण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण भाजपामध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड आदी काँग्रेसचे नेते शरद पवारांना भेटायला गेले होते. म्हणजे शरद पवारांचा काँग्रेसलाही आधार वाटू लागला आहे. खरे तर दोघांना एकमेकांचा आधार वाटतो आहे.

अजित पवार जेव्हा महायुती सरकारमध्ये सामील झाले तेव्हा एक चर्चा जोरात होती. शरद पवार भाजपासोबत जायला तयार होते, परंतु सुप्रिया सुळे राजी नव्हत्या. त्यामुळे अखेर अजित पवार यांना पक्षासोबत शरद पवारांपासून वेगळे व्हावे लागले. अशा राजकीय चर्चांचे साक्षी किंवा पुरावे नसतात. त्यामुळे त्यातले सत्य सिद्ध करणे अशक्य असते. ही चर्चा भूतकाळात होती. आता शरद पवार यांच्याकडे तीन पर्याय आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपाला एकतर्फी पाठींबा जाहीर केला होता, तसे काही तरी करून भाजपाशी जवळीक निर्माण करणे, म्हणजेच भाजपाच्या गोटात जाणे. दुसरा पर्याय उरलेसुरले नेते हाताशी धरून मिळेल त्या चिन्हासह लोकसभा निवडणुका लढवणे किंवा १९९९ मध्ये आखलेली तकलादू रेषा पुसून पुन्हा एकदा काँग्रेसवासी होणे. राजकारणाचा अखेरचा टप्पा देवेंद्रवासी होण्यापेक्षा काँग्रेसवासी होणे कधीही चांगले.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा