मराठा आऱक्षणाचा विषय तापतोय, किंबहुना तापवला जातोय. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सत्तेत असतात तेव्हा मराठा आऱक्षणाचा मुद्दा धसास लावण्याच्या नावाखाली सरकारची पूर्णपणे कोंडी करण्याचा प्रय़त्न केला जातो. मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून जाहीर करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मराठ्यांना हे मंजूर आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जाती-पातीचे विखारी राजकारण सुरू झाले असा उघड आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार केला आहे. सत्तेत नसताना या विखारी राजकारणाला जोर येतो. राज्यात १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे सूत्रधार आणि त्या आधी चार वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार आता मराठा आरक्षण कसे होऊ शकते याबाबत केंद्र सरकाला सल्ला देतायत. परंतु हाती सत्ता असताना त्यांनी काय केले, याचा जाब त्यांना कोणी विचारत नाही.
पवारांचा पक्ष सत्तेत असताना जरांगेंना उपोषण करण्याचा विचारही आला नाही. हे तेच पवार आहेत, ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या शालिनीताई पाटील यांना पक्षातून हाकलेले होते. जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली आहे. हिंदू समाजातील जाती, त्याच्या जन्माला चिकटलेल्या असतात. त्या बदलता येत नाहीत. अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, आदी महापुरुषांना जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी लढा उभारावा लागला नसता. धर्मांतर करता येते, जात बदलता येत नाही आणि जात संपतही नाही हे हिंदूंचे दुर्दैवी वास्तव आहे.
जरांगे जे काही सांगतायत ते जर सरकारच्या हाती असते तर सामाजिक भेदाभेद उरण्याचे काहीच कारण नव्हते. सरकारने ज्याला हवी ती जात बहाल केली असती आणि प्रश्न संपवला असता. मुळात जरांगे पाटील हे जरी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले असले तरी ते समस्त मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करतायत का? मराठ्यांना कुणबी घोषित करा ही त्यांची मागणी असू शकते, समस्त मराठा समाजाचा त्याला पाठिंबा आहे का? हे स्पष्ट होण्याची गरज आहे.
कुणबी आणि मराठा या दोन जातीत असलेला फरक सूक्ष्म आहे. ज्या शेतकऱ्यांनी तलवारी हाती धरल्या ते मराठे झाले. जे शेती करत राहिले ते कुणबी झाले. परंतु एक काळ असाही होता जेव्हा दसऱ्यापर्यंत कुणबी म्हणून शेतात राबायचे आणि दसऱ्यानंतर मराठा म्हणून सीमोल्लंघनासाठी बाहेर पडायचे. मराठा-कुणबी असा भेदच नव्हता. हाती नांगर धरणारे कुणबी झाले, ज्यांनी हाती तलवारी धरली ते मराठा, हे सांगणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा खरोखरच मराठा समाजाच्या हितासाठी उचलला जातोय की फडणवीसांसारख्या ब्राह्मण नेत्याला नामोहरम करण्यासाठी वापरण्यात येणारे हे शस्त्र बनले आहे. हे नेते मराठ्यांच्या समस्यांबाबत खरोखरच गंभीर आहेत का?
मराठा समाजातील आर्थिक मागासांच्या उत्थानासाठी फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली होती. ते मविआ सरकारने मोडीत काढले तेव्हा जरांगे पाटील कुठे होते? तेव्हा किती नेत्यांनी उठाव केला होता? सारथीचा बाजार उठवण्यात आला तेव्हा किती जणांनी आवाज उठवला. फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांना चेपण्याचा प्रय़त्न करायचा, या धोरणाने मराठा समाजाचे भले होणार आहे का? आरक्षणाचा लढा जो पवारांनी लढला पाहिजे होता, ती लढाई फडणवीसांनी लढली. त्यांनी जे कमावले ते मविआच्या सत्ताकाळात टिकवताही आले नाही, याचा जाब जरांगे यांच्यासारखे नेते विचारतात का?
आता राहिला मुद्दा मराठा समाजाला सरसकट कुणबी करण्याचा. शरद पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, आदी तमाम नेत्यांनी आधी जाहीर करावे की समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणण्यास आमचा विरोध नाही. राज्य सरकारने या मुद्दावर आता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिउबाठाच्या नेत्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी जाहीर करण्याच्या प्रस्तावाला त्यांचा पाठिंबा आहे हे जाहीर करावे. त्याची सुरूवात शरद पवारांनी स्वत: पासून करावी.
हे ही वाचा:
मोरोक्को भूकंप आणि भारतासाठी धडा
आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी १४ सप्टेंबरला
खलिस्तानी कारवायांकडे पंतप्रधान मोदींनी कॅनडाच्या राष्ट्रप्रमुखांचे लक्ष वेधले
गणेशमूर्तीवर शिक्का मारू नका !
शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळू दिले नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केला आहे. आरक्षणासाठी फडणवीसांनी सर्वाधिक प्रयत्न केलेले होते हे सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे संतापाचे धनी फडणवीस नव्हे तर शरद पवार व्हायला हवे. परंतु ते मराठा असल्यामुळे बहुधा त्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचे आणि फडणवीसांवर खापर फोडण्याचे काम काही लोक करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी घोषित करणारा अध्यादेश काढा असा लकडा जरंगे पाटील यांनी लावला आहे. सरकारने तसा अध्यादेश काढला आणि तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर त्याचे खापर पुन्हा हे फडणवीसांच्या डोक्यावर फोडायला तयारच आहेत.
मराठवाड्यातील मराठ्यांना सरसटक कुणबी करण्याचा निर्णय जर होत असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडे मारले आहे, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून जाहीर करण्याच्या भूमिकेला काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विरोध केला आहे. विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांची भूमिकाही साधारणपणे अशीच आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाणा मांडलेली भूमिका मराठा नेत्यांना तरी मान्य आहे का हे स्पष्ट व्हायला हवे. मराठा समाजात याबाबत एक वाक्यता नसेल तर जरांगे यांची भूमिका मान्य करूनही हा तिढा सरकारला सोडवता येणार नाही. या विषय़ावर एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पाहिली तर प्रश्न सोडवण्यापेक्षा हा गुंता वाढून राज्यातील वातावरण तापेल कसे याकडे त्यांचे लक्ष आहे, असे चित्र दिसते.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)