27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरसंपादकीयआदित्य ठाकरे आता तरी संपत चाललेल्या पक्षाबद्दल बोलणार का?

आदित्य ठाकरे आता तरी संपत चाललेल्या पक्षाबद्दल बोलणार का?

Google News Follow

Related

‘संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही,’ अशी दर्पोक्ती अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी केली होती. कोणतेही योगदान नसताना हाती आयत्या चालून आलेल्या सत्तेचा अहंकार आणि माज या विधानात होता. आदित्य यांचा रोख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे होता. पण तीन महिन्यात होत्याचे नव्हते झाले. आमदार सोडून गेले, सत्ता चौपट झाली, पक्षात उभी फूट पडली आहे. मनसेला संपलेला पक्ष बोलणारे आता स्वतःचा पक्ष संपताना असहाय्यपणे पाहात आहेत. आता या संपलेल्या पक्षाबाबत तरी ते बोलणार आहेत का?

अहंकार, उर्मटपणाचे राजकारण फार काळ चालत नाही. ‘पेराल ते उगवते’, हा नियम इथेही लागू आहे.
घराण्याचा वारसा या एकाच गुणवत्तेवर कोणाताही अनुभव नसताना ते युवासेनेचे अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहीर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन आणि शिवसेनेचे सुनील शिंदे यांच्या खांद्यावर पाय देऊन वरळीतून आमदार झाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर थेट पर्यावरण मंत्री आणि पालकमंत्री झाले. काही न करता बरंच काही मिळतं तेव्हा माणसं सुटतात. आदित्य ठाकरे यांच्या डोक्यातही वारा शिरला. सत्ता गेल्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत, त्यातून ते सतत सरकारच्या विरोधात बोलत असतात, असं ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले.

राज ठाकरे यांनी जेव्हा मशीदीवरील भोंग्यांचा विषय काढला तेव्हा, आदित्य ठाकरे यांना ती राजकीय स्टंटबाजी वाटली. मग आरेच्या नावाखाली मेट्रो कारशेडला मोडता घालताना आदित्य ठाकरे यांनी जे आंदोलन केलं ते नेमकं काय होतं? संजय राऊतांचा गंडा बांधल्यागत त्यांनी बेताल विधानं सुरू केली. महाराष्ट्रातील आघाडी सरकार पुढची २५ वर्षे टिकेल, २०२४ मध्ये दिल्लीत आपलं सरकार येईल, अशी विधानं ते वारंवार करत होते. प्राण जाये पर वचन न जाये, हेच आमचे हिंदुत्व, अशी डायलॉगबाजीही सुरू होती.

भारतीय विद्यार्थी सेना सुरूवातीपासून राज ठाकरे यांच्या प्रभावाखाली होती. इथे राज यांचे निष्ठावंत होते. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने भारतीय विद्यार्थी सेना मोडीत काढली. तरुणांच्या भरतीसाठी युवासेनेची स्थापना करून त्याची कमान आदित्य यांना देण्यात आली. युवासेनेतील निष्ठावंताना लवकरच महत्त्वाच्या पदावर विराजमान करून शिवसेनेवर जुन्या जाणत्याची पकड ढीली करायची असा गेम प्लान होता. उद्धव ठाकरे यांचे भाचे वरूण सरदेसाई यांना आदित्य यांनी जोडीला घेतले. मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आणायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. भाजपाच्या नेत्यांना गलिच्छ भाषेत ट्रोल करणारे चाळीस पैसेवाले ट्रोलर निर्माण करणे या पलिकडे युवासेनेचे कर्तृत्व नव्हते.
फासे कसे मनासारखे पडत होते.

चंद्रकांत खैरे यांच्यासारखे नेते आदित्य ठाकरे यांच्या पाया पडू लागले होते. त्यामुळे आपलं राजकीय वजन आणि उंची प्रचंड वाढली असा आदित्य यांचा समज झाला. आजूबाजूला असलेले बॉलिवूडचे कोंडाळे लोणी लावून हा समज अधिक बळकट करत होते. अशात कोणी आरसा दाखवला तर त्याला चेपायला सत्ता होतीच. गेल्या वर्षी शीतकालीन अधिवेशनात भाजपा आमदार विधी मंडळाच्या पायऱ्यांवर धरणे देत होते, त्याच वेळी आदित्य ठाकरेंचे आगमन होत असताना आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. त्याचा वचपा काढण्यासाठी सिंधूदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचा खुन्नस होताच. पिताश्रींच्या सूडाचा वारसा आदित्य यांनीही समर्थपणे चालवला.

कामापेक्षा पीआरवर भर हे आदीत्य ठाकरे यांच्या कामाचे सूत्र राहिले. पर्यावरणमंत्री म्हणून ते अन्य काही मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत दावोसमध्ये गेले, तिथे त्यांनी काही कंपन्यांशी हजारो कोटीचे करार केल्याच्या बातम्या छापून आल्या. परंतु ज्या कंपन्यांशी त्यांनी करार केले त्या विदेशी नसून भारतीय कंपन्याच असल्याचे पुढे उघड झाले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची कामगिरी सुमार होती. अतिवृष्टी असो वा कोरोना आदित्य ठाकरे लोकांची विचारपूस करायला अभावानेच फिरकले.

कर्तृत्व नाही, समज नाही, कष्ट करण्याची तयारी नाही, टीका सहन करण्या इतपत संयम नाही, केवळ शिवसेनाप्रमुखांचे नाव आणि पीआर या बळावर त्यांना संपूर्ण गाडा ओढायचा होता. त्याचा परीणाम जो व्हायचा तो झाला. ज्यांच्या जोरावर पक्ष चालत होता, त्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न झाले. सत्ता जाण्याचे निमित्तही आदित्य ठाकरेच बनले. ट्रायडण्ट ह़ॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे शिंदे दुखावले गेले. पुढे काय झाले तो इतिहास आहे. आदित्य यांच्यावर संजय राऊत यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे तेही ब्रह्मदेव असल्याच्या थाटात बोलत असतात. ४० आमदार सोडून गेले त्याबाबत आत्मचिंतन दूरच राहिले, त्यांना दमबाजी करण्याचे काम, आगीत तेल ओतण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले. हाती होते, त्याची स्वकर्तृत्वाने माती केल्यानंतर पुन्हा सत्तेवर येऊ अशा बाता सुरू आहेत. ही बडबड कोणाच्या जीवावर करतायत? पिताश्री उद्धव ठाकरे की संजय राऊत? की वरूण सरदेसाई?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हे पाहायला शिवसेनाप्रमुख हवे होते असे आदीत्य ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांचे सुदैव की आपण मेहनतीने उभा केलेला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला गेलाय हे पाहण्या आधीच ते स्वर्गस्थ झाले. आज ठाण्यात शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी उद्धव यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. ज्या ठाण्यात शिवसेनेचा पहिला महापौर झाला, त्या ठाण्यातून उद्धव ठाकरे गट संपला आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक

उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग

४० आमदार गेले, भावना गवळी, शिवाजी अढळराव पाटील, राहूल शेवाळे, राजेंद्र गावित हे खासदार उघडपणे भाजपाच्या बाजूने कलले आहेत. त्यात अखेरच्या क्षणाला उडी मारणारे संतोष बांगर किती हे अजून उघड व्हायचे आहे. शिवसेनाप्रमुखांनी मोठे कष्ट घेऊन उभा केलेला पक्ष ठाकरेंच्या दृष्टीने संपत चालला आहे. आदित्य ठाकरे या संपत चाललेल्या पक्षाबद्दल काही बोलणार आहेत का?

मी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नाही, मी फक्त शिवसैनिकांचा आवाज ऐकतो असे आदित्य ठाकरे काल बोलले होते. हे खरे आहे, गेले चार- दोन दिवस आदित्य ठाकरे फक्त शिवसैनिकांचा आवाज ऐकतात. आधी खुषमस्कऱ्यांच्या फिल्मी कोंडाळ्या असल्यामुळे हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता. पण चिमण्या आता शेतातला एकेक दाणा वेचून निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग आली तर उपयोग काय?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा