राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…

कीर्तिकरांच्या पुस्तकातही ठाकरेंवर भडीमार

राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुवत काढली आहे. ‘ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरकण्याच्या लायकीचे नाहीत’, असे ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही विधाने केली. ठाकरेंच्या या ताज्या विधानामुळे कोरोनाच्या काळात कुवत नसल्याची खात्री असल्यामुळेच ठाकरे मंत्रालयात फिरकत नव्हते काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या ठीक एक दिवस आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंच्या कुवतीवर भाष्य केल्यामुळे चिडलेल्या ठाकरेंनी वड्याचे तेल वांग्यावर काढले, अशी चर्चा जोरात आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेले भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार कधी कोसळतेय याची वाट पाहून मविआच्या नेत्यांचे डोळे थकले. सरकार पडण्याची काय, हलण्याचीही चिन्ह दिसत नाहीत, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही सरकारमध्ये सामील झालेली आहे. संख्या बळाच्या जोरावर सरकार पडण्याची सुतराम शक्यता नसताना, अचानक विरोधकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटेल आणि आपल्याला हात शेकण्याची संधी मिळेल या आशेने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उकळ्या फुटतायत.

उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रय़त्न केला. फडणवीसांची कुवत काढली. ते मंत्रालयाच्या आजूबाजूलाही फिरण्याच्या योग्यतेचे नाहीत अशी शेलकी टिप्पणी केली. ज्यांची मंत्रालयाच्या आसपास फिरकण्याची लायकी नाही, असे लोक मंत्रीही झाले आहेत आणि मुख्यमंत्रीही. मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात फक्त दोनदा फिरकलेला नेताही महाराष्ट्राने पाहिला आहे. ते कोण आहेत हे महाराष्ट्राला व्यवस्थित ठाऊक आहे. परंतु फडणवीसांच्या कुवतीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावे इतकी त्यांची वाईट परिस्थिती नाही. ठाकरेंनी असे बोलून पायावर धोंडा मारून घेतला आहे.

फडणवीसांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी मजल मारली आहे. प्रत्येक वेळा ते जनतेतून निवडून आले आहेत. मागील दाराने मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत फाईलींचा निपटारा करणारा आणि पुन्हा सकाळी कामाला लागणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. फडणवीस ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देतील अशी शक्यता खूप कमी. परंतु ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी एक दिवस शिवसेना नेते, खासदार आणि लोकाधिकार समितीचे कर्ते गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे तडाखेबंद भाषण झाले. त्यांनी उद्धव ठाकरें यांची सालटी काढत त्यांच्या कुवतीवर यथोचित प्रकाश टाकणारे अनेक किस्से सांगितले. कीर्तिकरांच्या पुस्तकातही ठाकरेंवर भडीमार करण्यात आला आहे, त्यामुळे चिडून ठाकरेंनी फडणवीसांनी लक्ष्य केल्याची चर्चा आहे.

‘उद्धव ठाकरे यांना काहीच कळत नाही. दौऱ्यावर एकत्र असताना ठाकरेंनी मला जीडीपी म्हणजे काय?’ असा सवाल केला होता. ‘अलिकडेच इंडी आघाडीच्या बैठकीत त्यांनी वॉचमनचे काम केले. ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र शोभतच नाहीत. एअर इंडियाचे मॅनेजर हरीहरन यांच्या कडून ठाकरे महिन्याला २५ लाख रुपये घ्यायचे. सहारा हॉटेल जेव्हा सुब्रतो रॉय यांनी चालवायला घेतले तेव्हा तिथले १४० मराठी कामगार त्यांनी तडकाफडकी काढून टाकले. गप्प बसण्यासाठी ठाकरे यांनी सात कोटी रुपये घेतले. त्यांनी कोणाकडून खोके घेतले, किती घेतले याचे १०५ किस्से आपल्याकडे आहेत’, असे राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सौरव गांगुलीच्या चरित्रपटामध्ये रणबीरऐवजी आयुष्मान?

नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक

सेहवाग म्हणतो, जर्सीवर ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव असावं

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

जेव्हा नारायण राणे किंवा त्यांचे दोन्ही पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागतात तेव्हा ठाकरे उत्तर देण्याची भानगडीत पडत नाहीत. ते राणेंकडे दुर्लक्ष करतात अशी म्हणण्याची सोय नाही, कारण राणे हे दुर्लक्ष करण्याइतके छोटे नेते नाहीत. कदाचित राणे यांना मातोश्रीच्या बंद फडताळातील सांगाड्यांची माहिती आहे. त्यामुळे तोंड बंद ठेवणे ठाकरेंना भाग असावे.

कीर्तिकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नारायण राणे यांची तोफ धडाडली. कीर्तिकर यांनीही आपल्या पुस्तकात ठाकरेंचा समाचार घेतलेला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘२००९ मध्ये मला विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले. तिकीट नाकारल्याचे दु:ख नाही, परंतु माझ्याशी बोलणे देखील उद्धव ठाकरेंना आवश्यक वाटले नाही. उमेदवारी नाकारली या पेक्षा ती ज्या पद्धतीने नाकारली ते जास्त क्लेशकारक आहे’.

‘संवाद न साधण्याच्या आणि एखादी घटना व्यवस्थित न हाताळण्याच्या उद्धव यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाले’. ‘एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतरही ते मविआच्या प्रयोगाला चिकटून बसले ते जास्त चिंताजनक आहे.’ ‘एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख असणे आणि मुख्यमंत्री असणे यात फरक आहे. पक्षप्रमुख कार्यकर्त्याला हवे तेव्हा भेटत नाही हे शिवसैनिकाने अनेक वर्षे सहन केले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतरही कार्य़कर्ता रस्त्यावरच आणि त्याची झोळ रिकामीच राहीली.’

कीर्तिकर यांची शिवसेनेतील इनिंग मोठी आहे. चार वेळा आमदार, मंत्री, दोन वेळा खासदार. त्यामुळे त्यांच्या या पुस्तकात शिवसेनेचा आणि ओघाने महाराष्ट्राचा राजकीय सामाजिक इतिहास येणे अपेक्षित होते. परंतु तसे दिसत नाही. हातचे राखून पुस्तक लिहिले आहे, असे वाचताना सतत जाणवते. राजहंस सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. परंतु पुस्तकातील छायाचित्र एखाद्या कार्यअहवालात छापावी तशी छापली आहेत. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठसठशीत फरकावर या पुस्तकाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. शरद पवारांची त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात ठाकरेंवर जसे फटकारे ओढले आहेत, त्याचा मात्र या पुस्तकात अभाव दिसला.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version