उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही…? जलेबी फाफडा, मुकेश अंबानी आपडा

मोदी ठाकरेंकडे ढुंकून पाहात नाहीत. त्यामुळे एखाद्या दमदार असामीच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत का?

उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही…? जलेबी फाफडा, मुकेश अंबानी आपडा

निवडणुका झाल्या, एक्झिट पोलचे निकाल आले. उद्या अवघ्या देशाला निकालांची उत्सुकता आहे. एकीकडे इंडी आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला असताना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात रममाण झाले आहे. ठाकरेंचा लंडन दौरा फक्त विश्रांतीसाठी नाही, असे आम्ही या पूर्वी म्हटले होते. अंबानींच्या विवाह सोहळ्यात ठाकरेंची उपस्थिती त्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे.

लंडनला गेलेले ठाकरे निदान एक्झिट पोलच्या आधी तरी भारतात पोहोचतील अशी अपेक्षा होती. कारण १ जून रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर इंडी आघाडीतील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होती. ठाकरे या बैठकीकडे फिरकलेही नाहीत. ही वाटते तितकी सामान्य बाब नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एका बाजूला आघाडीला २९५ जागा मिळण्याचा दावा करतायत. या दाव्याचा अर्थ देशात नरेंद्र मोदी पायउतार होऊन इंडी आघाडीचा पंतप्रधान होणार, असा होतो.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींचा उल्लेख निवर्तमान प्रधानमंत्री आणि अमित शहा यांच्या उल्लेख निवर्तमान गृहमंत्री असा करायला सुरूवात केलेली आहे. काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास असा ओसंडून वाहत असताना ठाकरे मात्र या दाव्यांपासून हजारो किमी लांब जाऊन बसले आहेत. इंडी आघाडीची सत्ता आली तर देशात जे वर्षाला एक पंतप्रधान मिळणार होते, ठाकरे त्यापैकी एक आहेत. आपण पंतप्रधान पदाचे उमेदवार आहोत असे ठाकरेंनीच जाहीर केलेले आहे. पंतप्रधान पदाचे स्वयंघोषित उमेदवार अशा प्रकारे लांब लांब कसे ? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

ठाकरे नेमके कुठे आहेत हे स्पष्ट झाले, दै.भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका फोटोमुळे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसत असून ते अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हातात एक लेडीज बॅग सुद्धा दिसते आहे.

हे ही वाचा:

शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या

क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!

गौतम गंभीरने सोडले मौन. म्हणाला, ‘भारतीय संघाचे प्रशिक्षक व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा सन्मान नाही’

सलामीच्याच सामन्यात वेस्ट इंडिजची दमछाक!

फ्रान्समधले हे दृष्य असून सगळे जण एका क्रूझवर चढण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग सोहळ्यासाठी सगळे क्रुझ फेरीवर चालले आहेत. तूर्तास ही क्रुझ इटालीतील एका बंदरानजीक आलेली आहे. देशातील सगळे बडे नेते निवडणूक निकालांवर लक्ष ठेवून आहेत. रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. गाठीभेटी आणि चर्चांचा सिलसिला सुरू आहे. देशातील एकही बडा नेता अंबांनीच्या प्री वेडींग सोहळ्यासाठी गेलेला नाही. ठाकरे हे अपवाद बनले आहेत.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे निवडणुका संपल्यानंतरही राहुल गांधी बँकॉकला ध्यान धारणेसाठी गेलेले नाहीत. ते अजून भारतात आहेत. ते सुद्धा २९५ जागांचा दावा करतायत. परंतु ठाकरे बाहेर आहेत.

काँग्रेस नेत्यांचे एक चांगले आहे. नाना पटोलेंपासून मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत कोणताही नेता २९५ चा आकडा सोडायला तयार नाही. कोणालाही विचारा तोच आकडा तोंडावर फेकतो. २९५ चे २९० होत नाहीत की ३००. काँग्रेसवाले असे आकडे घेऊन सज्ज असताना ठाकरेंची मात्र या सगळ्या उठाठेवीत उणीव भासते आहे. लंडनहून लवकर परत आलेले ठाकरेंच्या पक्षाचे शिलेदार संजय राऊत किल्ला लढवतायत. परंतु त्यांच्यापासून काँग्रेसवालेच त्रस्त आहेत. नाना पटोले त्यांच्याविरोधात बोलताना काहीही शिल्लक ठेवत नाहीत.

देशात इतकं काही घडत असताना ठाकरे देशाबाहेर तळ ठोकून आहेत. ते निवडणुकीबाबत फार गंभीर नाहीत, की वेगळ्याच काही गंभीर मुद्द्यावर मंथन करण्यासाठी ते बाहेर थांबलेले आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

राजकीय नेते देशाबाहेर जाऊन फक्त विश्रांती घेण्याचा काळ संपलेला आहे. अलिकडे नेते देशाबाहेर जाऊन बऱ्याच उचापती करीत असतात. आपण राघव चड्ढा याचे उदाहरण पाहिले आहे. ठाकरेही असे काही करतायत का?

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री दिपक केसरकर यांनी एक भारी विधान केलेले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याच्यात्याच्या मार्फत तहाचे निरोप पाठवतायत. रालोआचे दार ठोठावयात. ठाकरेंना अनेकांकडून निरोप पाठवावे लागतायत याचा अर्थ मोदी त्यांच्याकडे ढुंकून पाहात नाहीत, असा होतो. त्यामुळे एखाद्या दमदार असामीच्या माध्यमातून हे साध्य करण्याचा प्रयत्न ठाकरे करतील हे शक्य आहे. तो दमदार असामी मुकेश अंबानी तर नाही? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

एंटालिया प्रकरणानंतर अंबानी आणि ठाकरे परिवाराच्या संबंधावर किती परिणाम झालेला आहे, हे कळायला मार्ग नाही. परंतु उद्योजक हे राजकारण्यांपेक्षा मुत्सद्दी असतात. वरकरणी तरी ते कुणाचा वाईटपणा घेत नाहीत. राहुल गांधी यांनी गौतम अदाणी यांच्याविरोधात इतकी ओरड केल्यानंतरही अदाणी त्यांच्याविरोधात एक अक्षरही बोलले नाहीत. त्यामुळेच ठाकरेंना जामनगरच्या प्रीवेडींग सोहळ्याचे निमंत्रण होते. तेव्हा विधिमंडळाचे सत्र सुरू असतानाही ठाकरे जामनगराला सहकुटुंब गेले होते. आता देशात लोकसभेची धामधुम सुरू असताना ते पुन्हा विदेशातील प्री-वेडींग सोहळ्यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका आटोपल्या होत्या हे खरे असले तरी इंडी आघाडीतील मित्रपक्षांच्या प्रचारासाठी ठाकरे महाराष्ट्राबाहेर सभा घेऊ शकले असते. किमान मुस्लीम इलाख्यात तरी मतदारांना आवाहन करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकला असता. परंतु तसे काही होताना दिसले नाही. लोकसभेचे रण तापलेले असताना ठाकरे थंड व्हायला लंडनला गेले. विदेशात काही महत्वाची कामगिरी पार पाडूनच ते भारतात परततील अशी शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version