दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

बीडमध्ये जे काही घडले ते ठाकरेंना लाज आणणारे आहे

दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?

केजमध्ये कुंटणखाना चालवण्याचा ठपका असलेल्या पदाधिकाऱ्याची नव्याने शिउबाठाच्या जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आलेली आहे. जुलै २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केजचा जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे याची पक्षातून हकालपट्टी झाली होती. परंतु अवघ्या चार महिन्यांत पापक्षालन झाल्यामुळे पुन्हा शिंदेला जिल्हाप्रमुख पद बहाल करण्यात आले.

 

भाजपाकडे भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन असल्याचा टोमणा मारणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही कुंटणखाना चालवणाऱ्यांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन गवसले की काय, असा सवाल लोकांना पडला आहे. पक्षात सुषमा अंधारे यांचे आगमन झाल्यापासून बीड चर्चेत आहे. आप्पासाहेब जाधव या जिल्हाप्रमुखाने उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केली. अंधारे नियुक्त्यांसाठी पैसे मागतात, बीड जिल्ह्यात पदांचा बाजार सुरू आहे, असा आरोप करत जाधव यांनी मारहाणीचे समर्थन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या स्टार प्रचारक अंधारेबाईंच्या विरोधात हे असले काही ऐकून घेण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे जाधव यांना नारळ मिळाला.

 

रत्नाकर शिंदे हा केजचा तालुका प्रमुख होता. त्याची जाधव यांच्या जागी वर्णी लागली. शिंदेचे बुड स्थिरस्थावर होत असताना त्याला कलाकेंद्राच्या नावाखाली कुंटणखाना चालवण्या प्रकरणी अटक झाली. १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला देहविक्रय करायला भाग पाडल्याचा ठपका याच्यावर होता. इतके तोंड काळे झाल्यावर त्याला पदावर कसे काय ठेवता येईल? जिल्हाप्रमुख पदावरून शिंदे याची हकालपट्टी झाली. यू-टर्न घेण्याची ठाकरेंना इतकी सवय झाली आहे की या निर्णयावरून त्यांनी यू-टर्न घेतला आणि जिल्हाप्रमुख पदावर शिंदेची फेरनियुक्ती करण्यात आली.

 

ठाकरेंनी पक्षाची वासलात लावली, आता तर अशी परिस्थिती आहे की कुंटणखाना चालवणाऱ्यांना पद देण्याइतपत पक्षाचे बुरे दिन सुरू आहेत. ठाकरेंनी शिंदेला पावन करून घ्यायचे ठरवले तरी बीडच्या शिवसैनिकांनी या निर्णयाच्या विरोधात बंड केले. जो आरोप आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केला होता. तोच आरोप करत सुषमा अंधारे यांच्याविरोधात तोफ डागली.

 

पैसे घेऊन पदं वाटली जात आहेत, पदांचा बाजार मांडण्यात येत आहे, असा आरोप झाला. बीडमध्ये ठाकरे सेना संपवून अंधारे सेना करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत शिउबाठा आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामुहीक राजीनामे दिले. हिंदू देवदेवता आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात अद्वातद्वा बोलणाऱ्या अंधारे यांना केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे आम्ही सहन केले, परंतु त्या आता पक्ष संपवायला निघालेल्या आहेत. पोक्सोचा गुन्हा असलेल्या, कुंटणखाना चालवणाऱ्या आरोपीला पक्षात जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली जात आहे, याचा निषेध करत, सामुहिक राजीनामे देण्यात आले.

आमचा आवाज पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा प्रय़त्न केला, परंतु आम्हाला यश आले नाही, असे बीड शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जून २०२२ मध्ये नेमके हेच कारण सांगत पक्षाच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी ठाकरेंना टाटा, अच्छा, बाय बाय केले होते. आता या घटनेला दीड वर्ष झाली आहेत, तरीही उद्धव ठाकरे यांनी धडा घेतलेला दिसत नाही. पक्षप्रमुखांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप करत आजही पक्षाचे पदाधिकारी पक्षाला राम राम ठोकतायत.

हे ही वाचा:

पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!

रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

‘प्रणब मुखर्जी म्हणायचे, राहुल गांधी हे अपरिपक्व नेते’

‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’

जिल्हाप्रमुख पदावर नियुक्त केलेले पदाधिकारी पंचायत निवडणुकीत तीन आकडी मतं घेण्याच्या लायकीचेही नाहीत. पैसे घेऊन पदं वाटली गेली आहेत, असा राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. बीडमध्ये जे काही घडले त्याचा अर्थ स्पष्ट आहे. पक्ष आणि सत्ता गमावल्यानंतरही ठाकरे धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षातील लोकांवर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप होते आता कुंटणखाना चालवणाऱ्या लोकांच्या हातीही पक्षाची सूत्र देण्यास ठाकरेंना वावगे वाटत नाही.

बीडच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तेव्हा मीडियामध्ये चर्चा होती, विधान सभा निवडणुकांची, एक्झिट पोलची आणि त्यानंतर निकालाची. त्यामुळे आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना केलेल्या मारहाणीची जितकी चर्चा झाली तेवढी चर्चा या विषयाची झाली नाही. ठाकरेंच्या पक्षात जिल्हाप्रमुख एका महिलेला पैसे मागते असा आरोप करत मारहाण करतो, हे जितके लाजिरवाणे त्याच्या पेक्षा पक्षाचा पदाधिकारी कुंटणखाना चालवतो हे कितीतरी पटीने लाजिरवाणे आहे.
महिलांचे शोषण करणाऱ्या, त्यांचे शरीर विकून पोट भरणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केल्यावर चार महिन्यात त्याला पुन्हा पदाची खिरापत वाटावीशी उद्धव ठाकरेंना का वाटली याचा उलगडा उद्धव ठाकरे यांनी स्वत: केला तर बरे होईल.

 

या घटनेचे दोन निष्कर्ष काढता येतील. पक्षात काय घडते आहे, हे ठाकरेंना काहीही ठाऊक नसते. त्यामुळे अशा भाडखाऊ नेत्यांचा पक्षात सुळसुळाट झाला आहे. किंवा ठाकरेंच्या पक्षात आता मर्द शिवसैनिक उरले नसल्यामुळे दलालांना पावन करून त्यांना पदं बहाल केली जात आहेत. बीडमध्ये जे काही घडले ते ठाकरेंना लाज आणणारे आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधून जर उद्धव ठाकरे यांन अपराध केला आहे. तर कुंटणखान्याच्या दलालाला जिल्हाप्रमुख बनूवून पाप केलेले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version