म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तर…

गेल्या नऊ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा ठाकरे पिता-पुत्रांनी एकदाही केला नव्हता.

म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तर…

हैदराबादच्या दौऱ्यात शिउबाठाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी एका चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी जो दावा केलाय, त्यावर विश्वास ठेवला तर विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले होते, असे ठामपणे म्हणता येईल. भाजपाची साथ सोडल्यानंतर ठाकरेंची स्थिती अशी झाली आहे, की जिथे तिथे पाठिंबा मागत फिरावे लागते आहे. आदित्य ठाकरे हैदराबादेत राजकीय गाठीभेटी करून आले. याच दरम्यान एका मुलाखतीत, त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक नवा गौप्यस्फोट केला.

शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. ‘भाजपासोबत चला नाही तर मला अटक होईल’, असे त्यांनी सांगितले होते.
आदित्य यांचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचे विधान खोडून काढणारे आहे. एकनाथ शिंदेबाबत मला कुणकुण होती आणि याबाबत मी उद्धवना सतर्क केले होते, असे पवार यांनी सांगितले आहे. जर एकनाथ शिंदे यांनी स्वत:च भाजपासोबत जाण्याबाबत सुतोवाच केले होते, मग उद्धव यांना पवारांनी सतर्क करण्याची गरज काय होती? बरं जर एकनाथ शिंदे यांना भाजपाने धमकावले असेल तर इतर ४० आमदारांचे काय, हा प्रश्न उरतोच.

ठाकरे पिता-पुत्रांनी वेळोवेळी इतके परस्पर विरोधी राजकीय दावे केले आहेत, की आधीचा दावा यांच्या लक्षात तरी असतो का, असा संशय यावा. एकनाथ शिंदे यांनाच आम्ही मुख्यमंत्री बनवणार होतो, परंतु शरद पवारांनी माझ्या नावाचा आग्रह धरला, त्यामुळे मला नाईलाजाने मुख्यमंत्री व्हावे लागले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझ्या आजारपणाच्या काळात मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली, हाही दावा त्यांचाच. हा तोच काळ होता, जेव्हा ठाकरेंच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती आणि खाजवायचे कसे असा प्रश्न त्यांना त्या काळात पडत होता.

एकनाथ शिंदे हे भाजपाच्या संपर्कात असल्याची कुणकुण माझ्याही कानावर आली होती, तेव्हा मी त्यांना तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवे आहे काय असे विचारले होते. हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु गेल्या नऊ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा ठाकरे पिता-पुत्रांनी एकदाही केला नव्हता. बहुधा हे त्यांना त्यावेळी सुचले नसावे, असे दिसते.

ईडीच्या धमक्या देऊन, अटकेची तलवार डोक्यावर टांगून शिंदे यांना भाजपामध्ये घेतले, इथपर्यंतही समजू शकतो. परंतु अटक केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री केले ते कसे? याचे उत्तरही आदित्य ठाकरे यांनी दिले असते तर बरे झाले असते.

आदित्य ठाकरे जे काही सांगतायत, त्याचा अर्थ असा होतो, की भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर घोडा लावला आणि सांगितले की, आमच्या सोबत या नाही तर तुरुंगात जा. एकनाथ शिंदे यांनी ऐकल्यावर भाजपाला त्यांच्याबाबत इतके उमाळे आले की फडणवीसांना डावलून त्यांना थेट मुख्यमंत्री बनवले. धमकावून एखाद्याला सोबत घेतले तर त्याला पायाशी ठेवतात, डोक्यावर ठेवत नाहीत हा साधा तर्क इथे लागू पडताना दिसत नाही. म्हणजे संजय राऊतांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला असता तर त्यांनाही थेट मुख्यमंत्रीपदाची संधी होती आणि ती संजय राऊतांनी लाथाडली असाही याचा अर्थ होतो. ही संधी नबाव मलिक, अनिल देशमुख यांनाही होती. हसन मुश्रीफांना ती अजूनही आहे.

हे ही वाचा:

जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

दर्शन सोळंकीची आत्महत्या आणि गप्प राहिलेली माध्यमे!

पालघर साधू हत्या प्रकरणाचा सीबीआय करणार तपास

शिवसेनेचे काम करताना ज्यांच्यावर शंभर गुन्हे दाखल झाले, जे बेळगावमध्ये चाळीस दिवस तुरुंगात होते, जे स्वत:ला आनंद दिघे यांचे चेले म्हणवतात, ते ठाणेकर एकनाथ शिंदे रडतील यावर कोण विश्वास ठेवेल? उद्धव ठाकरे मंगळवारी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. या भेटीत ते पवारांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, अशी चर्चा आहे. खरी खोटी हे सांगता येत नाही, परंतु लोक या चर्चेवर विश्वास ठेऊ शकतात. कारण एकनाथ शिंदे जेव्हा पक्ष सोडून गेले, तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना भवनमध्ये बोलले होते, माशाच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेले आणि ते भविष्यात कधीही मिळणार नाही याची ठाकरे पिता-पुत्रांना खात्री झालेली आहे. त्यामुळे ते तोंडाला येईल ते बडबडतायत. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील, असा त्यांचा समज आहे.
आदित्य ठाकरे बालिश आहेत, ही नारायण राणेंची प्रतिक्रिया. शाळकरी मुलगा काही बोलला तर त्यावर प्रतिक्रिया काय द्यायची, असे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंचा दावा निकाली काढला.

शिवसेनाप्रमुखांना मी वचन दिले होते, मी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवेन. ते वचनपूर्ण कऱण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. काल परवा त्यांनी या संदर्भात त्यांनी ताजे विधान केले. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही, आता मला सत्तेचा मोह नाही. पुन्हा सत्ता मिळाली तर मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेन. म्हणजे आधी शिवसैनिकाच्या नावावर हे स्वत: मुख्यमंत्री झाले. पुढच्या वेळी आदित्य ठाकरे आणि त्यानंतर तेजस ठाकरे यांना शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असावा. अर्थात हे सगळे मनाचे मांडे आहेत. दगाबाजी करून एकदा मुख्यमंत्रीपद मिळवले. प्रत्येकवेळी ते शक्य नाही, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे आता कधी भाजपा तर कधी एकनाथ शिंदे यांच्या नावाने बोटे मोडणे एवढेच ठाकरेंच्या हाती उरले आहे. आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद दौऱ्यात हा कंड पुन्हा एकदा शमवून घेतला एवढाच त्यांच्या विधानाचा अर्थ.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version