बिल्कीसवर अश्रू ढाळणारे ठाकरे संदेशखालीवर मौन का…

संदेशखाली सारखे विषय समोर येताच उद्धव ठाकरेंची मशाल विझून जाते.

बिल्कीसवर अश्रू ढाळणारे ठाकरे संदेशखालीवर मौन का…

शिवसेना फुटल्यानंतर मी हिंदुत्व सोडलेले नाही. मी शेंडी जानव्याचे हिंदुत्व मानत नाही, आमचे हिंदुत्व तोडणारे नाही, जोडणारे आहे. आमचे हिंदुत्व अमके, आमचे हिंदुत्व तमके, असे खुलासे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा करताना दिसतात. मध्ये बराच काळ ते गुजरात दंगलीतील बलात्कार पिडीता बिल्कीस बानो हिच्यावर बोलत होते. तिच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दुगाण्या झाडत होते. संदेशखाली प्रकरणात हजारो हिंदू महिलांचे शोषण झाल्याच्या प्रकरणावर गेला बराच काळ गदारोळ सुरू आहे. उद्धव ठाकरे यावर तोंडात मळी भरल्यासारखे गप्प आहेत.

संदेशखाली प्रकरणातील आरोपी आणि प.बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहाँ हा गेले ५५ दिवस फरार होता. कोलकाता उच्च न्यायालयाने याप्रकरणी प.बंगाल सरकारचे कान उपटल्यानंतर अखेर आज पोलिसांनी त्याला अटक केली. हे प्रकरण भयंकर आहे. नव्वदच्या दशकात अजमेरमध्ये अशाच प्रकारचे एक कांड झाले होते. शाळेतील मुलींचे नग्न व्हीडीयो आणि फोटो काढून त्यांचे शोषण करण्यात आले. एका मुलीला जाळ्यात ओढायचे, तिचा वापर करून तिच्या मैत्रिणीलाही जाळ्यात फसवायचे. अशा शंभरावर मुली बर्बाद झाल्या. या सर्व मुली चांगल्या घरातील होत्या. या बलात्कार कांडात अजमेर शरीफ दर्ग्याचे ट्रस्टी आणि काही काँग्रेसशी संबंधित लोक सामील असल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यातल्या एका पीडित मुलीने आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. अवघा देश सुन्न झाला.

संदेशखाली प्रकरणातही सत्ताधारी पक्षाचे नेते सामील असल्यामुळे महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संदेशखाली भागात एखादी चांगली महिला दिसली ती तिला घरातून उचलायचे, तिला उद्ध्वस्त करायचे असा प्रकार बराच काळ सुरू होता. याप्रकरणी हजारो महिलांना लक्ष्य करण्यात आले. या सर्व महिला हिंदू आहेत हे विशेष. या प्रकरणाचा म्होरक्या होता शेख शाहजहाँ. हा तोच नेता आहे, ज्याच्या घरावर धाड टाकणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाले, त्यांना अमानुष मारहाण झाली.

प.बंगालमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या रेशन घोटाळा प्रकरणी ईडीने ५ जानेवारी रोजी त्याच्या घरावर धाड टाकली होती. तेव्हाच ईडीच्या टीमवर जमावाने दगडफेक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच प्रकरणी शाहजहाँला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विविध प्रकरणात एकूण ४२ गुन्हे दाखल आहेत. ईडी त्याच्यावर कारवाई कऱणार हे स्पष्ट झाल्यानंतर तृणमूलच्या एका जाहीर कार्यक्रमात शाहजहाँ बोलला होता, की ईडीचे अधिकारी माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. आज त्याला घुसखोर बांगलादेशींचा अड्डा असलेल्या २४ परगणा भागातील मीनाखान येथे अटक झाली.

शिबू हाजरा आणि उत्तम सरदार या दोन प्याद्यांसह त्याने संदेशखालीमध्ये सामुहिक बलात्काराचे हे सत्र सुरू केले होते. सरकार त्याला संरक्षण देत होते. परंतु जनतेच्या संयमाचा कडेलोट झाला. हजारो प्रक्षुब्ध महिलांनी संदेशखालीमध्ये हातात चप्पल घेऊन मोर्चा काढल्यानंतरही सरकार ढीम्म होते. अखेर न्यायालयाने ममता सरकारची हजामत केल्यानंतर शाहजहाँला अटक झाली. या प्रकरणात देशात फक्त एक पक्ष आवाज उठवत होता तो म्हणजे भाजपा. आरोपी मुस्लीम असल्यामुळे काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राजद हे सगळे पक्ष गप्प होते. उबाठा गटानेही तेच केले. हिंदू मतं गमावल्यामुळे अल्पसंख्यांकाच्या मतांसाठी लाळ गाळण्याचे काम उद्धव ठाकरे अलिकडे इमाने इतबारे करीत आहेत. संदेशखाली कांड जिथे घडले ते ममतांचे सत्ता क्षेत्र असल्यामुळे बिल्कीससाठी कळवळणाऱ्या उद्धव ठाकरेंची बोलती बंद होती. आदित्य ठाकरेही काही बोलले नाहीत. काँग्रेस आणि शरद पवार काँग्रेससाठी घाम गाळणारे त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या सकाळच्या बडबडीत या प्रकरणाला कधीही स्पर्श झाला नाही.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

शहाजहान शेखला कोर्टाचा धक्का, १० दिवसांची पोलिस कोठडी!

१९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता

उद्धव ठाकरेंना जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, अशी परीस्थिती आहे. हिंदुत्व सोडले म्हणता येत नाही ही यांची समस्या आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे मूठभर का होईना लोक यांच्यासोबत अजून शिल्लक आहेत. मतदार तर बाळासाहेबांच्या विचारामुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. त्यांची मतं उद्धव ठाकरेंना हवी आहेत. हे नव हिंदुत्ववादी ठाकरे ना नया नगरच्या दंग्यावर बोलतात, ना संदेशखाली वर. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण आले तरी पाठ फिरवतात. संदेशखाली सारखे विषय समोर येताच यांची मशाल विझून जाते. ‘लडकी हूं लड सकती हूं’ फेम प्रियांका वाड्रा यांचे वैशिष्ट्य ठाकरेंमध्ये पुरेपूर उतरले आहे. या बाई काँग्रेसच्या राज्यात बलात्कार झाले तर तोंड लपवून बसतात आणि भाजपा शासित राज्यात खुट्ट झाले तरी बोंब ठोकतात.

स्वत: हिंदुत्ववादी म्हणवणाऱे उद्धव ठाकरे बाईंचेच अनुकरण करतायत. भाजपाशी फाटल्यानंतर हिंदूबाबत सहानुभूती संपण्याचे काही कारण नव्हते. त्यांना बिल्किसबाबत वाटणारी हळहळ संदेशखालीतील महिलांच्या वाट्याला येऊ नये हे नेमकं कोणाचे दुर्दैव. हिंदुस्तानचा हिस्सा असलेल्या एका राज्यात हजारो हिंदू महिलांचे शोषण होते. मतांसाठी मुस्लिमांना अल्लाचा वास्ता देणारी हिंदू मुख्यमंत्री या प्रकाराकडे दुर्लक्ष करते आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे ठाकरेंसारखे नेते या प्रकरणावर बोलत नाहीत. कारण बोलले तर त्यांचे नवे मालक रागावतील.

देशात पक्ष आणि पद गमावणारे नेते कमी नाहीत. त्यातले अनेक लोक फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेपावले. परंतु पक्ष आणि पद गेल्यानंतर विचारसरणी सोडणारा, मतांसाठी कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे. संदेशखालीची धग जर तुमच्या पर्यंत पोहोचली नसेल तर ठाकरे तुम्हाला जनता माफ करणार नाही. या पापाला माफी नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version