लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या विजयासाठी रक्त आटवतायत. मोदी-०.३ साठी पुढच्या शंभर-सव्वाशे दिवसांचा रोड-मॅप त्यांनी जाहीर केला आहे. त्यावर काम सुरू झालेले आहे. प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या याच रोड-मॅपबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठकाही सुरू आहेत. प्रचारामुळे प्रचंड शिणलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनच्या गारव्यात विश्रांती घ्यायला गेलेले आहेत. सोबत वाचाळ शिरोमणी संजय राऊतही रवाना झालेले आहेत. सध्या राजकीय घडामोडी पाहता ठाकरेंचा हा दौरा फक्त विश्रांती घेण्यासाठी आहे, यावर विश्वास बसत नाही.
१ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्याच दिवशी एक्झिट पोल आणि ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. निकालानंतर काय करायचे याचा निर्णय विरोधी पक्षांनी आधीच जाहीर केलेला आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काय होणार ही बाब स्पष्ट आहे. इंडी आघाडीचा निवडणुकीत विजय झाला तर देशात तथाकथित हुकुमशाहीचा अंत होऊन नव्याने लोकशाहीचा पाळणा हलू लागेल. परंतु इंडी आघाडीतील नेतेही याबाबत फार आशावादी दिसत नाहीत. मोदींचे सरकार पुन्हा येण्याची चिन्ह लक्षात घेऊन काँग्रेस नेते आखणी करतायत. ईव्हीएमच्या नावाने ओरडा करून आंदोलनाच्या नावाखाली अराजक निर्माण करण्याची योजना तयार आहे.
कोणाला हा हवेतल्या गप्पा वाटू शकतील, परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनावधानाने हा अजेंडा जाहीर केलेला आहे. ‘देशात होणाऱ्या या फिक्स्ड निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय झाला तर, घटना बदलण्याचा प्रयत्न होईल, देशात आगडोंब उसळेल’, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर विधान केलेले आहे. ठाकरेंची सध्याची भूमिका ही राहुल गांधी यांच्या भूमिकेला मम म्हणण्याची आहे. जनतेचा कौल काय आहे? देशाची मानसिकता काय आहे? याच्याकडे साफ दुर्लक्ष करून राहुल गांधींनी देशाच्या निवडणुकांना आधीच क्रिकेटचा फिक्स्ड सामना ठरवलेला आहे. भाजपाचा जिंकल्यावर आगडोंब उसळणार हेही जाहीर केलेले आहे. मी जिंकलो नाही तर बॉल फेकून देईल, बॅट आणि स्टंप तोडून टाकेन, अंपायरला बदडून काढेन, अशी राहुल गांधी यांची भाषा आहे. बहुधा हीच त्यांची लोकशाहीची व्याख्या आहे. लोकशाहीच्या बाता करणारे देशात अराजक माजवण्याची तयारी करीत आहेत. ठाकरेंची भूमिका यापेक्षा वेगळी असण्याची शक्यता नाहीच. असतीच तर त्यांनी तसे जाहीरपणे सांगितले असते.
संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीवर बोलले. ईव्हीएमच्या कथित घोटाळ्यावर बोलले. निकाल भाजपाच्या बाजूने लागले तर ते नेमके काय करतील? या प्रश्नाचे उत्तर फार कठीण नाही. निवडणुकांचे निकाल ४ जूनला आहेत. त्यामुळे निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही ठाकरेंना परदेशात जाता आले असते. परंतु आधीच ते दौरा आटोपून घेतायत.
हे ही वाचा:
दिवाळी पूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीचे फटाके?
मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल
कोलकाता संघावर बक्षिसांचा वर्षाव
रेमल चक्रीवादळाचा बंगालला तडाखा, एक मृत्यू, २ लाख लोक स्थलांतरित!
लंडनमध्ये लोक फक्त फिरायला जात नाहीत. तिथे गाठीभेटीही केल्या जातात. चर्चाही होते. योजनाही बनवल्या जातात. ठाकरे यापैकी काय काय करणार हा प्रश्न आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांचे उदाहरण ताजे आहे. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना बराच काळ चड्ढा लंडनमध्ये उपचार घेत होते. या काळात त्यांच्या खालिस्तान समर्थक ब्रिटीश खासदार प्रीत कौर यांच्यासोबत गाठीभेटी झाल्या. अन्य काही लोकांना ते भेटले. आम आदमी पार्टीला खलिस्तानवाद्यांकडून मोठी आर्थिक रसद मिळते. अमेरिकेत सिख फॉर जस्टीस नावाचे दुकान चालवणाऱ्या गुरुपंतवत सिंह पन्नू यानेच हे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळ चड्ढा यांच्या लंडन दौऱ्यात नेमके काय शिजले याचे आपण फक्त तर्क करू शकतो. जगातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारी डोळ्यावरील शस्त्रक्रिया आटोपून ते अलिकडेच भारतात परतले. नेत्यांचे परदेश दौरे हे असे एका दगडात अनेक पक्षी मारणारे असतात.
राहुल गांधी मार्च २०२३ मध्ये लंडन दौऱ्यावर होते. तिथे त्यांच्या आजूबाजूच्या गोतावळ्यात भारताच्या वाईटावर टपलेल्या अनेक विदेशी विभाजनवादी शक्तींचे दर्शन झाले होते. याच दौऱ्यात राहुल गांधी यांनी चीनची भलामण केली होती. भारताबाबत फुत्कार टाकले होते. त्यामुळ ठाकरेंचा दौरा फक्त विश्रांतीसाठी आहे का, असा प्रश्न निर्माण होतोच? तिथे काही गाठीभेटी आणि चर्चात्मक कार्यक्रमही होणार आहेत का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ठाकरे जर कौटुंबिक दौऱ्यावर असतील. विश्रांती घेण्यासाठी गेले असतील तर त्या दौऱ्यात संजय राऊतांचे काय काम? आजवर लंडन दौऱ्यात ठाकरे आणि राऊत एकत्र गेले आहेत, असे ऐकीवात नाही. राऊतांचे ठाकरेंच्या सोबत जाणे हे स्पष्ट करते की विश्रांती आणि हिंडण्याफिरण्या पलिकडे काही साधण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे.
राहुल गांधी यांच्या आगडोंबवाल्या विधानाचा महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर तसे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ४ जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी आधीच जाहीर केलेला आहे. जातीच्या नावाने महाराष्ट्र पेटवण्याचा तिसरा सिझन ४ जूनपासून सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जरांगेच्या मागे कोण आहे, हे आतापर्यंत पुरेसे उघड झालेले आहे. असे बरेच प्रयोग शक्य आहेत. राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी दंगली होतील, असे ठाकरे वारंवार जाहीर करत होते. हे इशारे होते की तयारी हे कळायला मार्ग नाही. सुदैवाने केंद्र सरकार दक्ष होते त्यामुळ काहीही झाले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर निकाल काहीही लागो देशात आगडोंब उसळू नये असे ज्यांना वाटते त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)