26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरसंपादकीयस्वातंत्र्यवीर सावरकर न पाहिलेला बरा...

स्वातंत्र्यवीर सावरकर न पाहिलेला बरा…

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर हा रणदीप हुडाचा सिनेमा पाहिला. धुलिवंदनाचा दिवस, दुपारी ४.१५ चा शो. सिनेमा हॉलमध्ये एकही सीट रिकामी नव्हती. सिनेमा पाहायला तरुणांनी गर्दी केली होती. सिनेमा तीन तासांचा आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक अंतर्बाह्य ढवळून निघतो, सुन्न होतो. सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन अशी ज्यांची व्याख्या आहे, मनातली खळबळ ज्यांचा रक्तदाब वाढवते, रक्तात फुललेला अंगार ज्यांच्या तब्येतीसाठी चांगला नाही किंवा रक्ताचा थेंबही न सांडता अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले असा गैरसमज जे बाळगतात, त्यांनी रणदीप हुडाचा हा सिनेमा पाहू नये.

निर्मिती प्रक्रियेत असल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर याने या सिनेमाची घोषणा केली तेव्हा पासून चर्चेला सुरूवात झाली. त्याने सिनेमा सोडला त्याचीही चर्चा झाला. रणदीप हुडा याने एकट्याने हा सिनेमा करण्याची घोषणा केली, तेव्हा अनेकांच्या पोटात धस्स झालं. एका अमराठी कलाकाराला हा सिनेमा पेलवेल का? असा प्रश्न अनेकांच्या पडला. त्यात सावरकर भक्त ही होते. रणदीपने या सिनेमासाठी आपले घर विकले, तीस किलो वजन कमी केले. प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. सध्या केंद्रात उजव्या विचारसरणीच्या लोकांची सत्ता असल्यामुळे असे प्रचारकी सिनेमे निघतायत, अशी गरळ ओकणारा भंपक आणि चंपकांचाही एक वर्ग होता. हा सिनेमा दणकून आपटावा अशी त्यांची इच्छा होती. पहिल्या दिवशी तिकीटबारीवर फक्त ७० लाखांचा व्यवसाय केल्यामुळे हा सिनेमा आपटला, असे सेलिब्रेशनही अनेकांनी केले.

परंतु माऊथ पब्लिसिटीमुळे हा सिनेमा हळूहळू तिकीटबारीवर कमाल करतोय. सोमवारपर्यंत सिनेमाने १० कोटी ९६ लाखांचा व्यवसाय केला. हा काही यशराजचा शंभर-दोनशे कोटी रुपयांचे बजेट असलेला बिग बजेट सिनेमा नाही. फक्त २० कोटी रुपयांत बनलेल्या सिनेमाने चार दिवसात इतकी मजल मारली हेही नसे थोडके.

शालेय पाठ्यक्रमात सावरकर मीठापुरतेही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, १८५७ चे बंड, त्यानंतर थेट गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टीळक आणि त्यानंतर गांधी नेहरुंचा काळ. १८५७ चे बंड नव्हते ते देशाचे पहिले स्वातंत्र्यसमर होते, हे सांगणारे सावरकर पाठ्यक्रमातून हद्दपार करण्यात आले होते. काँग्रेसच्या सत्तेत इतिहासाचा कब्जा घेतलेल्या डाव्यांनी देशाच्या नव्या पिढीला प्रत्येक क्रांतिकारकाचे विस्मरण व्हावे असा प्रयत्न केला. परंतु सावरकरांचा इतिहास त्यांना पुसता आला नाही.

रणदीप हुडाने सावरकरांचा हा धगधगता इतिहास जनतेच्या समोर ठसठशीतपणे मांडला आहे. त्या आधी सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सावरकर विचारांची ज्योत तेवत ठेवली. लेखक विक्रम संपतने देश-विदेश पातळीवर या इतिहासाला उजाळा देऊन हुडा यांचे काम थोडे सोपे केले होते. रणदीप या सिनेमात सावरकरांच्या टीकाकारांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडलेला नाही. त्याने जे घडले ते दाखवले. सावरकरांचा तथाकथित माफीनामा आणि भत्त्यासहीत. सावरकरांनी काळ्यापाण्याची सजा भोगली म्हणजे नेमके काय भोगले हे नव्या पिढीला दाखवले. सावरकरांनी अंदमानात जे भोगले तो केवळ नरकवास होता. असे जीवन ज्या पेक्षा मृत्यू बरा असे म्हणून कैदी आत्महत्या करीत. पडद्यावर सावरकरांचे भोग पाहून डोळे पाणावतात. सावरकरांनी कोठडीत जर आत्महत्या केली असती किंवा ते मेले असते तर ब्रिटीशांना ते हवेच होते.

सिनेमात एक घटना खूप प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. काळ्यापाण्याची सजा भोगून सावरकर जेव्हा रत्नागिरीत परतले तेव्हा लोक त्यांना विचारतात की काँग्रेस प्रवेश करणार काय? सावरकर त्यांना प्रतिप्रश्न करतात, काँग्रेसमध्ये कुणाला कधी काळ्यापाण्याची सजा झाली आहे का? सावरकरांचा हा प्रश्न काँग्रेसच्या तमाम इको सिस्टीमला प्रचंड खूपतो. काळ्यापाण्याच्या तुलनेत इंग्रज महात्मा गांधींना आगाखान पॅलेसच्या तुरुंगात का ठेवत, त्यांना आणि नेहरुंना तुरुंगात कडक इस्त्रीचे स्वच्छ कपडे, चांगले अन्न, नोकर, बॅडमिंटन खेळण्याची सुविधा, पुस्तके, लिखाणाची सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात असत.

माफीवीर आणि ब्रिटीशांच्या एजण्टचा ठपका असलेल्या सावरकरांचे इतके हाल आणि हातात मूठभर मीठ उचलून ब्रिटीश साम्राज्याला हादरे देणाऱ्या महात्मा गांधींचे, नेहरुंना इतक्या सुविधा याचे कोडे देशातील जनतेला अजून उलगडत नाही. काँग्रेसवाले याचे उत्तर देण्याचा कधी प्रयत्न करीत नाहीत. हुडाच्या सिनेमातून हे कोडे काहीसे उलगडते.

हे ही वाचा:

६ कोटी नेटकऱ्यांचे ‘विराट’ सर्च

म्हणे `नागरिकतेचा पैस` आकसतो आहे !

चेन्नईकडून गुजरातचा पराभव

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

हुडाचा हा सिनेमा प्रचारकी आहे. सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीला धार्जिणा आहे, असा प्रचारही काही लोक करतायत. मग दे दी हमे आझादी, बिना खड्ग बिना ढाल… हे सिनेगीत हा प्रचार नव्हता? रिचर्ड एटनबरो निर्मिती गांधी हे दुसरे काय होते ? दूरदर्शनवरील प्रदीर्घ मालिका भारत एक खोज काय होती? चीन युद्धात भारताच्या झालेल्या अपमानास्पद पराभवावर बेतलेल्या हकीकत या सिनेमासाठी पंजाब मधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांनी त्या काळात १० लाख रुपये दिले होते. हकीकतची निर्मिती आणि दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केले होते. या सिनेमात भारतीय जवानांचे शौर्य दिसले, परंतु भारतीय नेतृत्वाचा दुबळेपणा दाखवण्यात आलेला नव्हता. चीन युद्धात जवाहरलाल नेहरु यांनी काय लायकीचे नेतृत्व देशाला दिले, चीनने भारतात कशी घुसखोरी केली या आशयावर बेतलेला सिनेमा काँग्रेसवाले काढू शकले असते का?

काँग्रेसच्या हाती ५५ वर्षे देशाची अनिर्बंध सत्ता होती, परंतु तेव्हाही नेहरुंवर सिनेमा बनवण्याचे धाडस कोणी करू शकले नाही. कारण नेहरुंच्या जीवनात दाखवण्यापेक्षा लपवण्यासारखा भाग जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इको सिस्टीमने प्रचारकी सिनेमाबाबत बोलू नये. हुडाच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी हिंमत असेल तर सिनेमात चुकीचे काय आहे, हे बोट ठेवून दाखवावे. रणदीप हुडाचे कौतूक, त्याने घरादारावर निखारा ठेवून हा सिनेमा बनवण्याचा अट्टहास केला. सिनेमासाठी सच्चिदानंद शेवडे यांच्यासारख्या कडवट सावरकरवाद्याने संशोधन केलेच, परंतु रणदीप त्याही पलिकडे गेला, त्याने स्वत: सावरकरांचा अभ्यास केला. पन्नासावर पुस्तके वाचून काढली. सावरकर हे देशाचे खरे नायक होते, त्यांचे योगदान जनतेपासून दडवून ठेवण्यात आले, या मतापर्यंत तो आला. त्यामुळेच त्याने या भूमिकेसाठी झिजण्याची तयारी ठेवली. ३० किलो वजन कमी करणे त्याच्या अंगाशी आले. त्यामुळे शारीरीक दुष्परीणामही त्याला भोगावे लागले. खंत एवढीच वाटते की एकाही मराठी कलाकाराला हे करावेसे वाटले नाही.

काँग्रेसने तुकडा टाकलेले ४० पैसेवाले ट्रोलर्स रणदीपवर भुंकताना दिसतात. त्याची खिल्ली उडवताना दिसतात. उकीरड्यावर तोंड मारणाऱ्या या भटक्या कुत्र्यांची दखल इतिहास कधीच घेत नाही, तो फक्त सावरकरांसारख्या नरसिंहाला लक्षात ठेवतो किंवा सावरकर जिवंत करणाऱ्या रणदीप हुडासारख्या जातीवंत कलाकाराला. अहिंसेच्या बोगस तत्वज्ञानाने किंवा अहिंसेच्या चुकीच्या मांडणीने देशाचे मोठे नुकसान केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर पाहाताना प्रेक्षकांची सगळ्यात धक्कादायक प्रतिक्रिया म्हणजे नथुराम महात्मा गांधीवर गोळ्या झाडतो, तेव्हा लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. गांधींची हत्या ही मोठी चूक होती. हिंदुत्ववाद्यांवर वरवंटा चालवण्याची संधी त्यामुळे नेहरुंना मिळाली. गांधी हत्या झाली नसती तर कदाचित काही दशकांपूर्वीच काँग्रसेचा सफाया झाला असता. सांगण्याचा मुद्दा एवढाच की गांधी-नेहरुंच्या धोरणांमुळे देशाला दिलेल्या फाळणीच्या जखमा आणि मुस्लीम कट्टरवाद माफ करायला देशाची जनता तयार नाही. अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हे मिथक उद्ध्वस्त होते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा