कायम हिंदू धर्मीयांच्या श्रद्धांना लक्ष्य करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास पाहिला की यांची धर्मांतर करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी तर नाही ना, असा संशय आल्या वाचून राहात नाही. मुस्लिम आणि ख्रिस्ती अंधश्रद्धांबाबत कायम मूग गिळून बसणाऱ्या समितीने आता मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांना टार्गेट केले आहे.
बागेश्वर बाबा यांच्याविरोधात अनिंस पुन्हा मैदानात उतरली आहे. अमुक तमुक करून दाखवा आणि तीस लाख रुपये मिळवा अशी खास समिती स्टाईल घोषणा शाम मानव यांनी केली आहे.
फक्त अंनिस नाही तर काँग्रेसने सुद्धा बाबांचा विरोध करायला सुरूवात केली आहे. मध्यप्रदेशचे विरोधी पक्षनेते गोविंद सिंह यांनी बागेश्वर बाबा यांनी आपल्या शक्ती सिद्ध करून दाखवाव्या असे आव्हान दिले आहे. छत्तीसगढचे अबकारी खात्याचे मंत्री कावासी लखमा यांनी बस्तरमध्ये धर्मांतरण सुरू आहे, हा आरोप सिद्ध करण्याचे आव्हान बागेश्वर बाबा यांना दिलेले आहे.
बागेश्वर धाममध्ये भक्तांची गर्दी गेल्या काही वर्षात प्रचंड वाढलेली आहे. धीरेंद्र शास्त्री पहील्या भेटीतच कोणत्याही भक्ताचे नाव, मोबाईल नंबर सांगतात अशी चर्चा आहे. आपण संताकडून शिकवण घेतलेली आहे, आपण कोणताही चमत्कार करीत नाही, असे स्पष्टीकरण देऊनही अंनिसने त्यांना आव्हान दिले आहे.
अंनिसवाल्यांची ही आव्हानं कायम सोय पाहून केलेली असतात. अलिकडे शिउबाठाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जादूटोणा या शीर्षकाखाली अग्रलेख पाडण्यात आला, त्याच्या काही दिवस आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लिंबू-टाचण्यावाले विधान प्रसिद्ध झाले. परंतु हे प्रकरण सोयीचे नसल्यामुळे आणि सध्या उद्धव ठाकरे हे पुरोगामी शरद पवारांच्या कडेवर बसल्यामुळे अंनिसवाल्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शांत राहाणे पसंत केले.
एखादा भगवाधारी संत किंवा बाबा असला आणि तो धर्मांतर रोखण्यासाठी काम करत असला की मग अंनिसला चेव येतो. बागेश्वर बाबा यांना सिद्धी प्राप्त आहे की नाही हे त्यांचे त्यांना ठाऊक. अशी सिद्धी प्राप्त आहे, असा दावा त्यांनीही केलेला नाही. परंतु अंनिसवाल्यांचा तसा दावा आहे. एखाद्या प्रसिद्ध बाबावर हल्लाबोल केला, की प्रसिद्ध मिळते, देणग्यांचे दुकान सुरू राहते. त्यामुळे असे काही तरी करत राहाणे गरजेचेही असते.
१९८९ मध्ये स्थापन झालेल्या अनिंसचा इतिहास पाहिला तर त्यांनी आव्हान दिलेल्या भोंदूंच्या यादीत तुम्हाला मुस्लिम किंवा ख्रिस्ती पाद्री अभावानेच दिसतील. अमुक तमुक सिद्ध करा आणि तीस लाख रुपये बक्षीस जिंका असे आव्हान, अंनिसने एखाद्या मौलवी, पीर किंवा पाद्रयाला अशा प्रकारचे आव्हान दिल्याचे कधी ऐकले आहे का? कि या दोन्ही धर्मात कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा नाहीत असा अंनिसचा दावा आहे.
महाराष्ट्रासह देशभरात शोषित वंचित समाजाला टार्गेट करून त्यांचे घाऊक धर्मांतर सुरू आहे. मुंबई, पुण्यासारखी शहरेही याला अपवाद नाहीत. ही धर्मांतरे अंधश्रद्धेच्या बळावरच सुरू असतात. गंभीर आजार केवळ पवित्र पाणी शिंपडून बरे करण्याचा दावा करत हजारोंच्या गर्दीच्या पापक्षालन शिबिरांचे आयोजन केले जाते. तिथे कॅन्सर, एचआयव्ही, क्षय अशा आजारामुळे मरणासन्न झालेले रुग्ण केवळ पवित्र पाण्याच्या शिडकाव्यामुळे एका क्षणात खडखडीत बरे होतात. नाचायला लागतात. जॉनी लिव्हरसारखा कॉमेडीयन अशा शिबिरांमध्ये येऊन चमत्कारांचे किस्से सांगत असतो. गोरगरीब हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी हे तमाशे नियमितपणे भरवले जातात.
हजारोंची गर्दी जमवून रुग्णांना बरे करण्याचा दावा केला जातो. अघोरी विद्येवर प्रभुत्वाचा दावा करणारे मुस्लिम बंगाली बाबा सरेआम दुकान मांडून बसलेले असतात. भुताखेंतांचा कायमचा इलाज करण्यासाठी रे रोडच्या हजरत पीर सय्यदअली मीरा दातार दर्ग्यात शेकडो लोक रोज जातात. इथेही तुम्हाला भुताखेतांपासून खात्रीशीर मुक्ती दिली जाते. झाड-फूक करून घ्यायची आणि थुंकलेले पवित्र पाणी प्यायचे बस्स. मुंबईत असे अनेक दर्गे आहेत. सेलिब्रेटी स्टेटस असलेल्या अजमेरच्या दर्ग्यात मागितलेली मन्नत पूर्ण होते, असा लौकीक आहे. श्याम मानव यांनी इथे ३० लाखांचे बक्षीस जाहीर केल्याचे कधी ऐकीवात नाही. तेव्हा अनिंसवाले डोळ्यावर कातडे ओढून बसलेले असतात.
हे ही वाचा:
महेश कोठारे यांना पितृशोक अंबर कोठारे यांचे निधन.
ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावणारे रासबिहारी बोस
क्रिकेटपटू उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा
दिल्ली भाजपची ‘मालिवाल’ यांना निलंबित करण्याची मागणी
परंतु एखादा भगवाधारी धर्मांतराच्या विरोधात कंबर कसून उभा राहतो अंधश्रद्धेचा ठपका ठेवून त्याचा कडेलोट करण्यासाठी अंनिससारख्या संस्था सज्ज असतात. काँग्रेस नेते राहुल गांधी मंदीर-मठांचे दौरे करून आपण हिंदुंचे तारणहार असल्याचे चित्र निर्माण करीत असले तरी त्यांचे अंतरंग हे हिंदूविरोधाचेच आहेत. मध्यप्रदेशचे नेते डॉ.गोविंद सिंह यांनी बागेश्वर बाबांना जे आव्हान दिले आहे, तसे आव्हान त्यांनी पवित्रपाणी शिंपडणाऱ्या पाद्र्यांना देऊन दाखवावे. मुस्लिमांना त्यांच्या श्रद्धा सिद्ध करायला सांगाव्या.
अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा, हिंदू संताला टार्गेट करण्याचे काम अंनिस गेली अनेक वर्षे इमाने इतबारे करीत आहे. त्यासाठी त्यांना परदेशातून भरपूर निधीही मिळत असतो. अलिकडेच रिषभ शेट्टीचा कांतारा हा सिनेमा प्रचंड यशस्वी झाला. या सिनेमात देव माणसाच्या शरीरात प्रकटतो आणि लोकांशी संवाद साधतो असे दाखवण्यात आले आहे. हा समाजाच्या परंपरेचा श्रद्धेचा अभिन्न हिस्सा आहे. हिंदू समाजात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची उकल विज्ञानाला नव्हती. आता ती हळूहळू होते आहे. आपण ज्याला नजर काढणे म्हणतो, त्याला पाश्चिमात्य जग आज ऑरा क्लीनिंगच्या नावाखाली स्वीकारते आहे. म्हणजे तुमच्या मशेरीतील कोळशाने आणि मीठाने दाताला चरे पडतात असे सांगणारे टुथपेस्टवाले आपके टुथपेस्ट मे नमक है, अशा जाहीराती करतात ना तसेच.
ऑरा, शरीरा भोवती असलेले एनर्जी फिल्ड, आत्मा, सकारात्मक आणि नकारात्म ऊर्जा, चेतना अशा अनेक बाबींवर पाश्चिमात्य देशात संशोधन सुरू आहे. शाम मानव स्वत: स्वसंमोहन नावाचे दुकान चालवतात, अनेकांच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा आहे. स्वसंमोहनामुळे मनातील कमकुवतपणा, भीती नष्ट होते असा त्यांचा दावा आहे. ही त्यांची श्रद्धा आहे. परंतु उद्या एखाद्या व्यक्तिने भीती दूर करण्यासाठी मारुती स्तोत्र म्हणायला सांगितले ते शाम मानवांसाठी ही अंधश्रद्धा ठरू शकेल.
अंनिसच्या बौद्धिक कुवतीच्या पलिकडे असलेल्या सर्व गोष्टी या अंधश्रद्धा आहेत. जसे देशात हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या काही मुस्लिम संस्था आहेत. त्यांनी प्रमाणपत्र दिले ही एखादे उत्पादन हलाल ठरते. अंनिसचे सुद्धा तसेच आहे. ते म्हणतील ती श्रद्धा, ते म्हणतील ती अंधश्रद्धा. यांना हिंदुत्वाचा इतका तिटकारा आहे की अनेकांनी मुलांची नावे मुस्लीम ठेवली आहेत. ही त्यांच्या दृष्टीने सर्वधर्म समभावावर श्रद्धा असेल पण हिंदूच्या दृष्टीने हिंदू धर्मावर असलेली अश्रद्धा. त्यामुळे भगवा धारण करणाऱ्या लोकांवर भोंदूपणाचा शिक्का मारण्याआधी अंनिसवाल्यांनी आपली हिंदूविरोधी मानसिकता आणि त्यांच्या गल्लाभरू श्रद्धा तपासून पाहण्याची गरज आहे.