शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गप्प का? असा सवाल केला जातोय. काही दिवसांपूर्वी जे शरद पवार याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. संजय राऊतांना अटक होऊ नये यासाठी त्यांनी शब्द टाकला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासाठी पवारांनी केलं नाही, ते त्यांनी राऊतांसाठी केलं. परंतु राऊतांच्या प्रत्यक्ष अटकेनंतर मात्र पवार मौनात आहेत. त्यांच्या मौनाचे बरेच अर्थ काढले जात असतानाही जे या विषयावर एक शब्दही बोलेलेले नाहीत. या मौनाचे कारण फक्त एकच असू शकते. पवार हे द्रष्टे आहेत. जे राऊतांच्या बाबतीत घडले आहे, तेच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतीत घडेल अशी पवारांना खात्री आहे. पवारांना पक्षाचे दारुण भविष्य दिसते आहे, त्यामुळे ते गप्प आहेत.
राज्यात सत्तांतराची धामधुम सुरू असताना ED ने वरळीतील सीजे हाऊसचे चार मजले जप्त केले. ही मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. सत्ता बदलाच्या गदारोळात जप्तीच्या या कारवाईवर फार चर्चा झाली नाही. माफीया डॉन दाऊद इब्राहीम याच्या टोळीतील इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन याची ही मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात यूपीएचे सरकार असताना विकत घेतली होती. तेव्हा ते केंद्रात नागरी विमान उड्डाण मंत्री होते.
देशातील दोन सर्वोच्च नेते या सौद्याबद्दल अत्यंत तिखट शब्दात बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी बीकेसी येथे अतिविराट सभा झाली होती. या सभेत त्यांनी मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख केला होता. जे लोक या स्फोटात मारले गेले, त्यांच्या परिवाराला काँग्रेस सरकारने मदत केली नाही. जे या स्फोटात सामील होते, त्यांना पळून जाण्यासाठी मदत केली. देशाच्या गद्दारांशी काँग्रेसचे नेते व्यापार करीत होते, असा हल्लाबोल करताना त्यांनी गँगस्टर इक्बाल मिर्चीचा उल्लेखही केला. मोदींचा हा हल्लाबोल उघड उघड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात होता. मोदी बोलून थांबणार नाहीत, याची पवारांना जाणीव आहे.
मोदी बोलले त्याच वर्षी गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना या सौद्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झोडले होते. एकीकडे यूपीए सरकारने न्यायालयात इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा बिवी हिला पासपोर्ट देऊ नये यासाठी जोरदार युक्तिवाद केला होता. त्याच वेळी यूपीएचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात मंत्रीपदी असताना हाजरा बिवीशी वरळीतील सीजे हाऊसचा सौदा करत होते, असा मुद्दा शहा यांनी उपस्थित केला. केंद्रात सत्ताधारी असलेल्या शरद पवार, राहुल गांधी आणि प्रफुल्ल पटेल यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
हे ही वाचा:
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला
झेब्र्यांमध्ये असलेल्या या रोगामुळे आयातीला विरोध
सायबर गुन्हेगारांनी जवानाला दीड लाखांना फसवले
टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग
दाऊद टोळीशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपाखाली महाविकास आघाडीतील एक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ED ने अटक केली होती. ते आजही तुरुंगात आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीची पत्नी यांच्याशी केलेला व्यवहार हा त्याच पठडीतला किंबहुना जास्त गंभीर आहे. मिर्चीच्या विरोधात त्यावेळी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे हा व्यवहार म्हणजे देशाच्या शत्रूला केलेली मदतच होती. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात इतके ठोस पुरावे आहेत, की त्यांची अटक अटळ आहे.
संजय राऊतप्रकरणी पवारांची विनंती धाब्यावर बसवून मोदींनी सेटलमेंटचे राजकारण चालणार नाही, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दिल्लीत पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही, ही बाबही यातून पुरेशी स्पष्ट होते आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना अटक होणार हे पवार ओळखून आहेत. पटेल हे पवारांचे अंत्यत विश्वासू आणि जुने सहकारी आहेत. अशा सहकाऱ्यांकडे अनेक गुपितं असतात. त्यामुळे असे सहकारी गजाआड जाणे नेत्यांना परवडणारे नसते.
एकीकडे पवारांच्या सल्तनीतील एकेक सरदार गजाआड होत आहेत. त्यात त्यांचा बारामतीचा गड खणून काढण्यासाठी केंद्र सरकारने फिल्डींग लावली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा तीन दिवसांचा बारामती दौरा जाहीर झाला आहे. पवारांसाठी हे संकेत चांगले नाहीत.
A फॉर अमेठी आणि B फॉर बारामती… हे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे उद्गार फार जुने नाहीत. बारामतीवर केंद्राचे लक्ष आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पवारांची ही गढी ढासळणार आहे. पवारांना हे भविष्य दिसू लागले आहे. त्यांचे स्वत:चे हात दगडाखाली असताना ते संजय राऊतांबद्दल कोणत्या तोंडाने बोलणार आणि काय बोलणार हा प्रश्न आहे. पवारांच्य मौनाची कारणे ही अशी आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)