पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?

मविआचा प्रयोग उद्धव ठाकरेंबाबत शक्य झाला कारण, भाजपा बेसावध होता आणि ठाकरे उतावीळ होते

पवार, राहुल गांधींना लोणी का लावतायत?

लोकसभेच्या निवडणुकांचे पाच टप्पे पार पडले आहेत. दोन टप्पे शिल्लक आहेत. नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे भाकीत नामांकित वृत्तवाहिन्या करतायत. ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र अजून आशावादी आहेत. देशातील काही राज्यात भाजपाच्या जागा कमी होतील, काँग्रेसच्या वाढतील असे ते म्हणतायत. एनडीएला बहुमत मिळाले नाही तर, आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रय़त्न करू असा दावा त्यांनी केलेला आहे. राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, समजण्याइतपत पवार चतुर आहेत, तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तळी का उचलतायत, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

 

लोकसभा निवडणुकींच्या आधी काही महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार ४०० पार… ही घोषणा दिली. गेल्या वेळी एनडीएचा आकडा ३५३ होता. भाजपाकडे ३०३ खासदार होते. या व्यतिरिक्त काही मित्रपक्ष धरून आमच्याकडे ४०० च्या आसपास संख्या बळ होते. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही अधिक मोठे ४०० पार… चे टार्गेट ठेवले, अशी कारणमीमांसाही त्यांनी स्पष्ट केली.

मोदींच्या घोषणेचा परिणाम असा झाला देशभरात राजकीय चर्चा ४०० पार… भोवतीच फिरत राहिली. एनडीए ४०० पार… जाणार की, जाणार नाही यावरच काथ्याकुट होत राहिला. ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, नाही मिळाल्या तरी सत्ता भाजपा येणार हे सत्ताधारी आणि विरोधकांनी या चर्चेत गृहीत धरलेले होते.

विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सापळ्यात अलगद सापडले. त्यांना नेमके हेच हवे होते. चौथ्या टप्प्यानंतर विरोधकांना त्यांच्या चुकीचा उलगडा झाला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडी आघाडीचे अन्य नेते बोलू लागले, की भाजपा १५० चा आकडाही पार करणार नाही. आघाडीतील अन्य मित्र पक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याला अनुकूल विधाने करू लागले. संजय राऊत यांच्यासारखे वाचाळवीर इंडी आघाडीला ३०३ जागा मिळणार असल्याचा दावा करू लागले. ममता बॅनर्जी म्हणाल्या इंडी आघाडीचे सरकार आले तर मी बाहेरुन पाठिंबा देईन. काँग्रेसची इको सिस्टीमही कामाला लागली. योगेंद्र यादव यांनी एनडीएचा आकडा बहुमताच्या खाली जाऊ शकतो अशा प्रकारचे आकडे पेरायला सुरूवात केली.

हे ही वाचा:

न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न

‘प्रभू रामांच्या हाती १३ किलो चांदीचे धनुष्यबाण’

“वैयक्तिक फोटो लीक करून खच्चीकरण करण्याचं काम आप नेत्यांना दिलंय”

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून शरद पवारांच्या या वक्तव्याकडे पाहावे लागेल. शरद पवार जरतरच्या भाषेत जरी बोलत असले तरी भाजपाला कमी जागा कशा मिळतील, इंडी आघाडीची सत्ता कशी येऊ शकते याचा तपशील त्यांनी जाहीर केलेला आहे. गुजरात, राजस्थानमध्ये भाजपाला पूर्वी इतक्या जागा मिळणार नाहीत. तिथे काँग्रेसला फायदा होईल. दिल्ली, हरयाणा, पंजाबमध्ये भाजपाच्या जागा कमी होतील, काँग्रेसच्या वाढतील. भाजपाच्या जागा का कमी होतील, का वाढतील याबाबत मात्र पवार अवाक्षर काढत नाहीत.

तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नाही, असेही शरद पवार म्हणतायत. कर्नाटकमध्ये २८ पैकी २५ खासदार भाजपाचे आहेत. तिथे भाजपाचा प्रभाव नाही, म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. तेलंगणामध्ये १७ पैकी चार जागा भाजपाकडे आहेत, हेही त्यांच्या खिजगणतीत नाही. ओडीसामध्ये भाजपाचे बिजू जनता दलाशी फाटले असल्यामुळे तिथेही भाजपाची मतं कमी होतायत. पवार अशा प्रकारची बिनबुडाची विधाने करतात तेव्हा समोर बसलेले पत्रकार त्यांना प्रतिप्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत.

 

नामांकित सेफॉलॉजिस्ट प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपाच्या जागांचा आकडा ३०३ पेक्षा वाढेल एनडीएलाही जास्त जागा मिळतील, असा दावा केलेला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाही. पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होईल कारण इथे भाजपाची लाट जाणवते आहे, असा दावा केलेला आहे. तेलंगणा, ओडीशामध्ये भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला तर आश्चर्य वाटायला नको, आंध्रमध्ये एनडीएची सत्ता येण्याची शक्यता आहे, असे मत प्रशांत किशोर ठणकावून सांगतायत.

प्रशांत किशोर यांचे दावे घरबसल्या केलेले नसतात. देशभरात त्यांचे जाळे आहे. त्यांच्याकडे प्रत्येक मतदार संघाची तपशीलवार आकडेवारी असते. बरं हे प्रशांत किशोर भाजपा समर्थक नाहीत की भाजपा सोबत नाहीत. किंबहुना, २०२५ मध्ये ते बिहारमध्ये भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे तिथे त्यांची स्पर्धा थेट भाजपाच्या सोबत आहे.

तरीही केवळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानाची री ओढण्यासाठी शरद पवारांसारखे नेते इंडी आघाडीची सत्ता स्थापन करण्याची भाषा करतायत.

पवार हे महाराष्ट्रातील वयोवृद्ध आणि अनुभवी नेते मानले जातात. राजकीय आयुष्यात अनेकदा त्यांनी गांधी घराण्याशी पंगा घेतला. कधी इंदिरा गांधी यांना आव्हान देत पुलोदचा प्रयोग केला, सोनिया गांधी यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. परंतु दोन्ही वेळी त्यांनी बंड थंड करत, शरणागती पत्करली आणि सत्तेचा मार्ग स्वीकारला. वाढत्या वयामुळे बहुधा त्यांनी राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्याची मानसिक तयारी केलेली आहे. राहुल यांचे वय आणि पवारांचा अनुभव सारखाच आहे. तरीही पवारांवर राहुल गांधी यांच्या विधानाला मम म्हणण्याची वेळ आलेली आहे. ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन कऱण्याची भाषा बोलतायत. बुड्ढा शेर घास खायला का तयार झालाय, याचा उलगडा अनेकांना होत नाही आहे.

केंद्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करणार असे पवार म्हणाले आहेत. याचा नेमका अर्थ काढणे कठीण आहे. महाराष्ट्रात त्यांना भाजपासोबत निवडणूक लढवणारा मित्रपक्षच फोडला. केंद्रात पवारांकडे इतकी ताकद नाही आणि करीष्मा नाही. उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते शक्य झाले कारण, भाजपा बेसावध होता आणि ठाकरे उतावीळ होते. पवार म्हणतायत त्याचा अर्थ एवढाच कि उद्धव ठाकरे यांच्यासारखा अनुभवहीन आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री सत्तेवर बसवला की सत्तेची सूत्र आणि राज्याची तिजोरी आपसूक हाती राहते. चुकूनमाकून जर इंडी आघाडीची जुळवाजुळव झाली, सत्ता आली तर ममता आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यांच्या तुलनेत राहुल गांधी कधीही बरे. पवारांना बॅकसीट ड्रायव्हींगचा उत्तम अनुभव आहे. मविआच्या काळात त्यांनी हे सिद्धही केलेले आहे. राहुल गांधीना लोणी लावण्याचे कारण हेच असण्याची शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version