राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारांसमोर मन मोकळं केले. शिंदे-फडणवीस सरकारने औंरंगाबादचे नामकरण केल्यामुळे मनात निर्माण झालेली खदखद बाहेर काढली. ‘मी औंरगाबादला औरंगाबादच म्हणणार’, अशी घोषणा केली. पवारांच्या या विधानावर अनेकांनी संताप व्यक्त केला. पवार म्हणेज औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली.
पवारांचा हिंदू द्वेष, इस्लामनिष्ठा, प्रदीर्घ राजकारण यामुळे अनेकदा ही तुलना केली जाते, परंतु ही तुलना योग्य नाही. पवार हे औंरगजेब होऊ शकत नाहीत. इतिहास सतत पुनरावृत्ती करत असतो. इतिहासातील अनेक नायक-खलनायकांची तुलना त्यामुळे वर्तमानातील नेत्यांशी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. पवारांना हिंदुत्वाच्या प्रतिकांचे प्रचंड वावडे आहे.
कुठे हिंदुत्व प्रकर्षाने झळकू लागले, तर पवारांना प्रचंड पोटशूळ उठतो. मग राम जन्मभूमीवरील भव्य मंदिराची निर्मिती असो, काशी कॉरोडोअरचे उद्घाटन असो किंवा अलिकडेच संसदेच्या नव्या इमारतीत झालेला वेदमंत्रांचा उद्घोष. पवार या विषयांवर कडाडून टीका करतात. जणू आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे, जगबुडी आली आहे, अशी त्यांची भावना असते. तशाच तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यांना इस्लामबाबत मात्र अशी कोणतीही समस्या नाही, फर कॅप घालून ते इफ्तार पार्ट्यांमध्ये मिरवताना अनेकांनी पाहिले आहे. ट्रिपल तलाक हा कुराणाचा आदेश, अशी विधानं ते बिनधास्तपणे करू शकतात. एखाद्या कडवट जिहादीच्या मनात नसेल तेवढा हिंदुत्वाचा द्वेष पवारांच्याही मनात आहे.
केवळ मतांसाठी पवार हे सगळं करत असतात, असं कुणाला वाटू शकेल. हिंदू द्वेषाचे प्रदर्शन करून मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी पवार अशा प्रकारचे राजकारण करतात, असा अनेकांना संशय येऊ शकेल. परंतु हे खरं नाही. सगळ्या भावभावना अगदी आतून येतात. अस्सल असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाही आणि मुघलशाहीतून ज्या लाखा लाखाच्या फौजा हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त करायला यायच्या, त्यात मुसलमान किती होते? अधिकतर भरणा हा हिंदूंचाच होता. अनेक मराठी सरदार या फौजेत असायचे. त्यांना हिंदवी स्वराज्याशी काही घेणे देणे नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या वतनदाऱ्या शाबूत ठेवायच्या होत्या. महाराष्ट्रावर मुघल किंवा आदिलशाही वरवंटा चालेल तेव्हा आपली घरं, आपली श्रीमंती शाबूत राहिली पाहिजेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती.
हे ही वाचा:
पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका
पुण्यातील ३९ गृहप्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर!!
कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन
अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!
पवारांना हिंदुंशी आणि हिंदुत्वाशी घेणे देणे नाही. मुस्लीम मत झोळीत पाडून घ्यायची आणि आपले साडे तीन जिल्ह्याची वतनदारी अबाधित ठेवायचे हा पवारांचा हिशोब आहे. परंतु तरीही पवार औरंगजेब ठरू शकत नाहीत. कारण औरंगजेब हिंदूद्वेष्टा असला, इस्लामनिष्ठ असला तरी कर्तृत्ववान होता. त्याचे निर्णय कधी तळ्यात कधी मळ्यात अशा प्रकारचे नसायचे. तो त्याच्या उद्दीष्टावर ठाम होता. सगळा उत्तर भारत टाचेखाली आणण्यात त्याला यश मिळाले होते. पवारांचे कर्तृत्व कधी ५०-५५ आमदार आणि आठ दहा खासदारांच्या पलिकडे गेलेच नाही. त्यामुळे त्यांची तुलना एखाद्या वतनदाराशी होऊ शकते. मंदीरांवर घणाचे घाव पडत असताना, हिंदुंचे जीवित, महीलांची अब्रु संकटात असताना वतनाच्या तुकड्याकडे आशाळभूतपणे बघत चाकरी करणारे वतनदार.
आणि एकदा चाकरी करण्याचे ठरवले की, मग कशाचीच चीड येत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर सुद्धा अनेक मराठे सरदार औरंगजेबाची चाकरी करत होतेच की. पवारांच्या याच भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांनाही अध्येमध्ये औरंगजेबाची भलामण करण्याचा मोह होतो. औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हता असे विधान त्यांनी काही काळापूर्वीच केले होते. पवार औरंग्याची तळी उचलण्यासाठी अनेकांना नैतिक बळ देतायत. १९९३ बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी अबु असीम आजमी याने औरंगजेबाला सेक्युलर असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. आजमींना दोष का द्यावा, महाराष्ट्रातील सर्वात बुजूर्ग राजकारणी औरंगजेबाच्या पालख्या घेऊन नाचायला तयार असतील तर मग अबू सारखे वाया गेलेले लोक तेच करत असतील तर त्यांना दोष का द्यावा? औंरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होत असेल आणि अबु आजमीसारखे पवारांची भलामण करून सुटत असतील, तर कारवाईचा उपयोग काय? गृहमंत्र्यांनी आजमींची गठडीसुद्धा वळायला हवी. औरंगजेबाची भलामण हा स्टेटस ठेवण्यापेक्षा नीच प्रकार आहे.
पवारांचे औरंगजेबाबद्दलेच प्रेम इतके उत्कट आहे, की ते पेशव्यांचाही द्वेष करतात. ज्या पत्रकार परिषदेत काल पवारांनी देशातील मुस्लीम आणि ख्रिस्ती बांधवांबाबत चिंता व्यक्त केली, त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पेशव्यांबद्दलही गरळ ओकली. पवार पेशव्यांच्या विरोधात बोलतात कारण ते ब्राह्मण आहेत म्हणून. महापुरुषांना जातीच्या चौकटीत कैद करण्याचे नीच राजकारण देशात ज्या राजकारण्यांनी सुरू केले, पवार त्यांचे अग्रणी आहेत. आणि पवारांचा पेशव्यांबद्दल असलेला द्वेष त्यांच्या एकूण वर्तणुकीशी सुसंगत देखील आहे.
कारण जर औरंगजेबाच्या परंपरेशी निष्ठा दाखवायच्या असतील, तर पेशव्यांचा द्वेष करणेही गरजेचे आहे. कारण छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, काशीविश्वेश्वराच्या मुक्तीचे स्वप्न पाहीले ते पूर्ण करणारे पेशवे होते. मुघलांची सल्तनत चेचून त्यांचे तख्त फोडणारे पेशवे होते. पेशव्यांची बाजू घेणारे सध्याच्या सरकारमध्ये अनेक जण आहेत, असे पवारांचे विधान आहे. पवारांना यात वावगे काय वाटते? तुम्हाला जर औंरंगजेबाचे पाय चेपावेसे वाटत असतील तर हीच विकृती प्रत्येक राजकारण्यात हवी असा तुमचा आग्रह कशाला?
महाराष्ट्रात आणि केंद्रात मुस्लीम मतांची चाटुगिरी करणारे सरकार नाही, म्हणून पवार धगधगतायत. संपूर्ण देशात इस्लामचा चांद तारा फडकेला पाहण्याचे औंरगजेबाचे स्वप्न होते. परंतु ते पूर्ण झाले नाही, त्या स्वप्नासह तो महाराष्ट्राच्या भूमीतच दफन झाला. अखेरच्या दिवसात मुघलसत्ता आचके देत असल्याचे चित्र त्याने पाहिले. पवारांनाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात संपलेली सद्दी आणि सत्ता पाहावी लागते आहे. हे चित्र बदलेल याची शक्यता खूपच कमी आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)