हिंदू समाजाचे धर्माबाबत प्रबोधन करण्यासाठी, त्यांना धर्माबाबत उपदेश करण्यासाठी, त्यांना धर्माच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठाची स्थापना केली. ज्योतिष मठ हा त्यापैकी एक. दुर्दैवाने या मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हिंदूंचे प्रबोधन, त्यांची एकजूट, त्यांचे हित करण्याचे सोडून बाकी उचापती करताना दिसतात. हिंदू नफरत फैलाता है, या विधानावरून त्यांनी अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोषमुक्ती सर्टीफिकेट प्रदान केले आहे. प्रश्न हा निर्माण होतो की या महोदयांना आता एवढाच धंदा उरला आहे का? जातीप्रथा, धर्मांतर, देशातला घसरणारा हिंदूंचा टक्का, हिंदूविरोधी राजकारण या हिंदू समाजाच्या समोरच्या सगळ्या समस्या संपल्यामुळे त्यांनी गांधी घराण्याची पालखी खांद्यावर नाचवण्याचे काम स्वीकारले आहे का?
शंकराचार्यांची पीठं ही हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान आहेत. आद्य शंकराचार्यांनी चार वेळा पायी संपूर्ण भारत पालथा घातला. हिंदू समाजातील भेदाभेद संपवण्यासाठी, धर्माला आलेली मरगळ संपवण्यासाठी प्रयत्न केले. अनेक महान ग्रंथांची, रचनांची निर्मिती केली. कार्यपूर्ती झाल्यानंतर वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी देह ठेवला. अनेक शंकराचार्यांनी या पीठांच्या माध्यमातून मोठे सामाजिक काम केले आहे. परंतु खेदाने म्हणावे लागेल की हिंदू समाज अडचणीत असताना कधीही तोंड न उघडणारे अविमुक्तेश्वरानंद यांच्यासारखे शंकाराचार्य त्यांनी करणे अभिप्रेत असलेले काम न करता, वैयक्तिक आकस, द्वेष आणि राजकारणाचा कंड शमवून घेण्याचे काम करत असतात.
हिंदू समाज सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जातो आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीतला संघर्ष अत्यंत तीव्र झालेला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, राजस्थान, अशा अनेक राज्यांत त्याची प्रचिती येते आहे. एकजात दुसऱ्या जातीच्या समोर उभी आहे. एका जातीचा नेता दुसऱ्या नेत्याच्या उरावर बसू पाहतोय. समाजात विद्वेषाचा वणवा पेटलेला आहे. काही धूर्त राजकीय नेते आरक्षणासारख्या प्रश्नांचा वापर समाज पेटवण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करीत आहेत. हिंदूंची एक जात दुसऱ्या जातीला पाण्यात पाहाते, त्याच वेळी अन्य धर्मीयांबाबत मात्र उदारता दाखवते, असे दुर्दैवी चित्र राज्या राज्यात दिसते आहे.
मनोज जरांगे यांच्यासारखे नेते आणि त्यांचे राजकीय सुत्रधार ओबीसींच्या विरोधात गरळ ओकतात आणि मुस्लिमांच्या गळ्यात गळे घालतात. ब्रिगेडी मानसिकतेचे लोक ब्राह्मणांचा जाहीर द्वेष करतात, परंतु मुस्लिमांचे गोडवे गातात. हिंदूच्या काही जातींना एकटे पाडण्यासाठी मुस्लिमांसोबत दलितांची मोट बांधण्याची भाषा केली जाते. हिंदूंमध्ये सुरू असलेल्या या फुटाफुटीची मजा इतर धर्माचे नेते घेतात, भांडणाऱ्या दोघांपैकी एकाची बाजू घेतात. ही दुही, हा विद्वेष वाढत राहील असाही प्रयत्न करतात.
धर्मांतराचा प्रश्न तर खूपच गंभीर झालेला आहे. नावाने हिंदू असलेले अनेक क्रिप्टो ख्रिश्चन देशात वावरतायत. नाव हिंदू असले तरी यांच्या मनात हिंदूबाबत पराकोटीचा द्वेष असतो. हा द्वेष निर्माण करण्यात चर्चचा मोठा हातभार आहे.
‘देशात धर्मांतर सुरू राहिले तर एक दिवस हिंदू अल्पसंख्यांक होईल’, अशी स्पष्टोक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहीत रंजन अग्रवाल यांनी एका खटल्याची सुनावणी करताना अलिकडेच केली. एकीकडे ख्रिस्ती पाद्री कुठे सेवेच्या बुरख्या आड, कुठे आमीष देऊन तर कुठे मंतरलेले पाणी शिंपडून रुग्ण बरे करण्याचे दावे करत देशातील आदिवासी, दलितांचे धर्मांतरण करीत आहेत. त्यांना हिंदू धर्माच्या द्वेषाचे धडे देत आहेत.
हिंदू तरुणींना लव जिहादच्या सापळ्यात अडकवण्यासाठी काही कट्टरतावादी संघटनांनी रेट कार्ड जारी केलेली आहे. केरळ उच्च न्यायालयाने या संकटावर शिक्कामोर्तब केले आहे. ही समस्या गंभीर असल्याचे भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या समितीचा लोकसंख्येबाबत एक अहवाल काही महीन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला. स्वातंत्र्यानंतर देशात हिंदूंची संख्या घटली असून आणि मुस्लीम लोकसंख्या वाढते आहे, असा धक्कादायक अहवाल या समितीने अलिकडेच जाहीर केला.
ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांना यापैकी एकही समस्या गंभीर वाटली नाही. भाष्य करण्याच्या योग्यतेची वाटली नाही. यापैकी एकाही मुद्द्यावर पुढाकार घेऊन या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. केवळ वेगळ्या जातीचा म्हणून गावाच्या वेशीबाहेर आयुष्य काढणाऱ्या जातींच्या उद्धारासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. हिंदूंमधील भेदभाव मिटवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. जाती जातीतील फूट, समाजातील उच्चनीचता संपवण्यासाठी काम केले नाही. हिंदूंची घटती लोकसंख्या या मुद्द्यावर हिंदूंचे जागरण केले नाही, धर्मांतराच्या विरोधात षड्डू ठोकून उभे राहीले नाही, असे काहीही या महोदयांनी केलेले नाही.
जमियत उलेमा ए हिंद या संघटनेच्या अधिवेशनात सरस्वती वंदनेला, सूर्यनमस्काराला विरोध करण्यात आला, तेव्हाही या शंकराचार्यांना कंठ फुटला नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा म्हणताना आणि राहुल गांधी यांना निर्दोष प्रमाणपत्र देताना यांना कंठ फुटतो. आपण शंकराचार्य आहोत याची आठवण होते. राहुल गांधी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचा दावा हे महोदय करतात. मंदीरो मे लोग लडकीया छेडने के लिये जाते है, हिंदू धर्म मे जो शक्ती है, मै उसे खत्म करना चाहता हूं, या वक्तव्यामुळेही शंकराचार्य अस्वस्थ झाले नाही किंवा त्यातही त्यांना काही गैर वाटले नसावे.
हे ही वाचा:
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईची दमदाटी!
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरबद्दल पंतप्रधान कार्यालयाने मागवला अहवाल
‘भारताने जगाला युद्ध नाहीतर बुद्ध दिला’
शासकीय नोकरी मिळताच पत्नीने पतीला दिला डच्चू !
मोठ्या पदावर असलेले अनेक लोक अनेकदा अहंकारामुळे, मत्सरामुळे, द्वेषामुळे आंधळे होऊन प्रतिस्पर्ध्यावर भलतीसलती टीका करताना दिसताना आणि आपल्या चेल्या चपाट्यांच्या घोडचुका पोटात घेतानाही दिसतात. अनेकदा हे चित्र राजकारणाच्या प्रांतात दिसते. राजकारणी असल्यामुळे ते नजरेआडही करता येईल. अविमुक्तेश्वरानंद कपाळावर भस्म रगडून, भगवी वस्त्र धारण करून, हिंदूंचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आहेत, ते कोणत्या आकसापायी मोदींवर टीका करतात आणि राहुल गांधी यांची तळी उचलतात? राजकीय टिप्पणी करताना हिंदू धर्मासाठी त्यांनी काय योगदान दिले, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवे.
ज्या काँग्रेसच्या नेत्याची शंकाराचार्य तळी उचलतायत त्यांनी यूपीएच्या सत्ताकाळात भगवा दहशतवाद नावाच्या नव्या शब्दाची व्युतपत्ती केली होती. हिंदूंना बदनाम करणे, त्यांना राजकीय दृष्ट्या निष्प्रभ करणे आणि हा देश कट्टरतावाद्यांच्या घशात घालणे हे त्यांचे धोरण आहे. या देशात मोदींसारखे नेते आहेत, त्यामुळे हिंदूंना, हिंदूंच्या शंकाराचार्यांना बरे दिवस आहेत. या देशात सेक्युलर नेत्यांचे अच्छे दिन असताना शंकराचार्यांना खूनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्याची घटना फार जुनी नाही. ऐन दिवाळीच्या सणाचा मुहुर्त साधून ही अटक करण्यात आली होती. त्यामुळे हिंदूंचे खच्चीकरण करणाऱ्यांची तळी उचलताना किमान ज्या गादीवर तुम्ही बसलात त्याची तरी आठवण राहू द्या, ही आमची कळकळीची विनंती आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)