महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचे निकाल जाहीर व्हायला फक्त काही तास शिल्लक असताना मीडियामध्ये नव्या समीकरणांची चर्चा होते आहे. ही चर्चा करायला जे सूत लागते ते शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिलेले आहे. ‘एकनाथ शिंदे जिथे जातील तिथे जाऊ’, हे त्यांचे विधान आहे. अनिश्चिततेचे धुके इतके गडद आहे की राजकारणाच्या सारीपाटावरच्या
शिरसाटांसारख्या सोंगट्या सुद्धा गोंधळलेल्या दिसतात. नव्या समीकरणांचा रस्ता सर्वांनाच खुला असतो, मुद्दा तो नाहीच. २०१९ मध्ये नव्या समीकरणाच्या मांडवाखालून गेलेल्यांची अवस्था काय होते, हे एकदा शिरसाट यांनी पाहून घ्यावे, नंतर थंड डोक्याने विधाने करावीत.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत काडीमोड घेतला होता. या घडामोडीनंतर ‘सत्तेसाठी कोणीही काहीही करू शकतो’, अशी भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे. शिरसाटांचे विधान ही भावना अधिक घट्ट करणारे आहे. एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत गेले तर? या प्रश्नाचे उत्तर देताना शिरसाट असे म्हणाले की, ‘ते जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत.’ या एका वाक्यात शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या रांगेत नेऊन उभे केले.
‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेससोबत गेले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व ठाकरेंनी काँग्रेसच्या चरणी गहाण ठेवले होते. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बांधिलकी असलेली शिवसेना वाचावी म्हणून आम्ही ठाकरेंची साथ सोडली.’ ठाकरेंची साथ सोडताना एकनाथ शिंदे यांनी केलेला हा युक्तिवाद आहे. त्यांचा दावा मोडीत काढणारे शिरसाट यांचे विधान आहे. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’, असे विधान जर शिरसाट यांनी केले असते, तर त्यात काहीच गैर नव्हते. भाजपाच्या नेत्यांना वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, तसे शिवसेनेच्या नेत्यांनाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हवे असतील तर ते स्वाभाविक आहे. परंतु शिरसाट यांनी व्यक्त केलेले मत या पलिकडचे आहे.
हिंदुत्व वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, असा सतत दावा करणाऱ्यांमध्ये शिरसाट हेही होते. ते जर शरद पवारांसोबत जाण्याची भाषा करत असतील, तर त्यातून हिंदुत्वाचे काय आणि किती भले होणार आहे, हेही त्यांनी
स्पष्ट करावे. हिंदू दहशतवादाचे ढोल वाजवणाऱ्या चौकडीत शरद पवार एक महत्वाचे नेते होते. ‘एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले होते.’ हा काँग्रेससोबत जाताना उद्धव ठाकरे यांनी केलेला युक्तिवाद.
हे ही वाचा:
दिल्लीत ट्रक प्रवेश रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
‘राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार यावं’
कुस्तीपटू विनेश फोगट बेपत्ता, पोस्टर्स व्हायरल!
शेअर बाजारात अदानी समूहाच्या समभागात सुधारणा
मुख्यमंत्री पदाचा मुगुट मिळण्यासाठी ते स्वत:च शिवसैनिक बनले. मुख्यमंत्री पदासाठी ते काँग्रेसमध्ये गेले हे त्यांनी या विधानातून नकळत स्पष्ट केलेलेच आहे. परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंशी फारकत घेणारे, ठाकरे काँग्रेससोबत गेले म्हणून त्यांना सोडून येणारे, कोणत्या तोंडाने शरद पवारांच्या सोबत जाण्याची भाषा करतात? जर शिरसाटांना शरद पवारांसोबत जाणे मान्य असेल तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन चूक केली असा दावा ते कोणत्या तोंडाने करणार? महायुतीच्या सत्ता काळात शरद पवार यांनी दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या कुजबुजीला सुरूवात झाली होती. ‘पवार कामानिमित्त भेटले होते. मुख्यमंत्री म्हणून सगळ्याच पक्षाचे नेते मला भेटतात’, असा खुलासा शिंदे यांनी केलेला होता. तो अमान्य कऱण्याचे काहीच कारण नाही.
शरद पवारांच्या सोबत जाण्याचा विचार शिंदे यांच्या मनात असण्याची शक्यता वाटत नाही. गेल्या वेळी हुकलेली मंत्री पदाची संधी अशा प्रकारची वक्तव्य करून साधता येईल, असा विचार करून शिरसाट यांनी हे वक्तव्य केले असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपद हे काही तहहयात नसते. तसे असते तर २०१४ ते २०१९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर येण्याची नामुष्की सहन करावी लागली नसती. आमदारांची संख्या भाजपा पेक्षा कमी असूनही शिंदे २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाले. ती लॉटरी त्यांना २०२४ मध्ये पुन्हा लागली तर पुन्हा त्यांचे अभिनंदन करायला आम्हाला आवडेल. कारण सत्तेवर आल्यानंतर ‘हे हिंदुत्ववादी सरकार आहे’ असे त्यांनी ‘डंके की चोट पर’ सांगितले होते.
हिंदुत्ववादी मुख्यमंत्री, हिंदुत्ववादी नेता ही शिंदेंची प्रतिमा काळवंडण्याचे काम शिरसाट यांनी करू नये. सत्ता येत जात असते, परंतु सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडतात त्यांची काय परिस्थिती होते हे पाहिल्यानंतर तरी त्यांनी असे धाडस करू नये. एकनाथ शिंदे यांनी या तोंडाळ नेत्यांना वेळीच रोखलेले बरे आज पवारांसोबत जाण्याची भाषा करतायत, उद्या राहुल गांधी
यांच्यासोबत हातमिळवणी करण्याची भाषा करतील. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही चिखल झाला आहे, त्यात भर घालण्याचे काम शिरसाट यांनी करू नये.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)