रविवारी ग्रेगोरीयन नव वर्ष २०२३ ची सुरूवात रविवारी झाली. सरते वर्ष नववर्षाच्या खांद्यावर एका नव्या वादाचे ओझे लादून गेले. ‘संभाजीराजे धर्मवीर नव्हते’, असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांनी हा वाद पेटवला. परंतु का कोण जाणे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या समोर शिरा ताणून उभे असलेल्या अनेकांच्या या वादावर प्रतिक्रिया अत्यंत गुळमुळीत आहेत. छत्रपतींचा वारसा सांगणारे संभाजी राजे आणि उदयन राजे सुद्धा याला अपवाद नाहीत.
विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते असा दावा केला. मुळात दावा अर्धसत्य आणि दिशाभूल करणारा आहे. हा छत्रपती संभाजीराजे यांच्या दैदिप्यमान बलिदानाला झाकोळण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वैचारिक पिंड संभाजी ब्रिगेडच्या पिवळ्या इतिहासावर पोसलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मतांसाठी छत्रपतींना सेक्युलर बनवण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. परंतु अजितदादा फारसे या वादात पडत नाहीत. मराठ्यांच्या इतिहासाच्या हिरवेकरणाची जबाबदारी स्वत: शरद पवारांनी पेलली असल्यामुळे तिथे फारसा वाव नाही हे दादांना माहीत आहे. परंतु छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून ते सुद्धा थोरल्या पवारांच्या जोडीला मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपती संभाजी राजांनी तब्बल नऊ वर्ष मुघलांशी लढा दिला. स्वराज्य वाढवले. त्या अर्थाने ते निश्चितपणे स्वराज्य रक्षक होते. दगाफटका करून मुघलांनी त्यांना अटक केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. एखादे हिंस्त्र जनावरही ओशाळेल असे औरंगजेबाने दाखवले पण राजे बधले नाहीत, झुकले नाहीत. भीषण यातना सहन करत त्यांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले.
त्यांचे हौतात्म्य धर्मासाठी होते याचा विसर अजितदादांना पडला कारण ही भूमिका त्यांच्यासाठी राजकीय सोयीची आहे. शिवसेना उबाठा या विषयावर मौन आहे कारण त्यांनाही मतांसाठी हिरवी झूल आवश्यक वाटते आहे. महाविकास आघाडीत शिरल्यानंतर त्यांचे पूर्णपणे मतांतर झालेले आहे. परंतु जे छत्रपतींचा वारसा सांगतात ते संभाजी राजे आणि उदयन राजे या विषयावर शांत कसे? राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपतींचा अपमान केला म्हणून गळा काढणाऱ्या संभाजी राजे यांना अजितदादांच्या विधानानंतर तीन दिवसांनी कंठ फुटला. ज्यांना रडू फुटले होते ते उदयनराजेही मूक झाले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते आणि धर्मवीरही अशी गुळमुळीत प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत या दाव्यामुळे दुसऱ्या छत्रपतींचा अपमान होतो, धर्मासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानावर या विधानामुळे बोळा फिरवला जातो, असे त्यांना वाटले नाही. त्यांनी अजितदादांचा निषेध केला नाही किंवा त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली नाही. इतिहासाच्या मोडतोडीबाबत त्यांनी माफक आणि औपचारिक विरोध कर्तव्य पार पाडल्याचा देखावा केला. त्यांचा हा निषेध म्हणजे निव्वळ त्रागा असल्यामुळे अजित पवार यांच्यासाठी तो निव्वळ अदखलपात्र आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनेही. अजित पवारांच्या विधानाने छत्रपतींचे वारस पेटून उठतील अशी अपेक्षा होती. परंतु इथे तर साधी ठिणगीही पडलेली दिसत नाही.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा इतिहास बदलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न होतायत. भगव्या इतिहासाचे हिरवेकरण करण्यात जे पिवळे इतिहासकार यात आघाडीवर आहेत शरद पवार यांचे गॉडफादर आहेत. या पिवळ्या इतिहासकारांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचे पद्धतशीरपणे इस्लामी आक्रमकांना फक्त आक्रमक ठरवले. हिंदू संस्कृती संपवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांचे जिहादी क्रौर्य सौम्य करून मांडण्याचा प्रयत्न केला. औरंगजेब, अफजलखानाचे उदात्तीकरण केले. त्यांच्या कबरींचे उदात्तीकरण केले. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गड किल्ल्यांवर अचानक मजारी निर्माण झाल्या, त्यांना संरक्षण मिळाले त्याचे कारणही हेच.
जे स्वत:ला इस्लामचे बंदे, इस्लामसाठी जिहाद करणारे गाझी म्हणवत होते. त्यांना फक्त जमीनीसाठी लढणारे आक्रमक ठरवले. हिंदवी स्वराज्याचा जन्मच मुळात तुर्कांच्या निर्दालनासाठी झाला. परंतु या मंडळींनी तुर्क हे छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून लढत होते असे चित्र निर्माण करण्याचा प्रय़त्न केला.
छत्रपती शिवाजी हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हेत असा प्रचार करणाऱ्या या टोळक्याने आता छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाकडे आपली विकृत नजर वळवली आहे. छत्रपती संभाजी हे धर्मवीर नव्हते असा प्रचार सुरू केला आहे. केवळ मतांसाठी इतिहासाचे हे विकृतीकरण हा छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा अपमान आहे. परंतु त्याचा निषेध करण्याचे धाडस संभाजी राजे किंवा उदयन राजे यांच्या ठायी दिसत नाही.
हे ही वाचा:
राजौरीमध्ये हत्याकांडानंतर दहशतवाद्यांचा आयईडी स्फोट
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले
काय पंचकर्म, काय योगासनं, शहाजी बापू पाटलांच वजन एकदम ओक्के
मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्य
कोशियारींमुळे अस्वस्थ झालेले हे दोन्ही वारस अजितदादांना सवाल विचारायला तयार नाहीत. त्यांचा निषेध करण्याची, त्यांच्याकडून माफीनामा घेण्याची त्यांची तयारी नाही. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशा प्रकारचे अपमान सहन करण्याची यांना सवय असावी. यापूर्वी तो शरद पवार यांनी अनेकदा केलेला आहे. शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या शरद पवारांना त्यांचे चेले-चपाटे जाणता राजा म्हणतात.
संजय राऊत जेव्हा ‘छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्या’, या शब्दात दम देतात, तेव्हाही या वारसांच्या तोंडून निषेधाचा शब्द फुटत नाही. याचा अर्थ या वारसांकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिउबाठाच्या जिहादी प्रचाराचा निषेध करण्याचे सामर्थ्य नाही. वारशाचे तेज ज्यांना टिकवता येते त्यांनीच वारसा सांगावा. थोरांचा वारसा हा मालमत्तेचा नसतो विचारांचा असतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय या निमित्ताने आला आहे. छत्रपतींच्या वारसांनी जनतेचा अपेक्षाभंग केला आहे.