उघड्याकडे नागडा गेला…

समाजवादी मंडळी ठाकरेंना डोक्यावर घ्यायला तयार का झाली याचे उत्तर त्यांच्या मानसिकतेत आहे

उघड्याकडे नागडा गेला…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समाजवाद्यांच्या २१ विविध गटांनी हातमिळवणी केली आहे. समाजवाद्यांच्या पांगुळगाड्यावर स्वार होऊन ठाकरे दिग्विजयासाठी सज्ज झाले आहेत. पराकोटीचा हिंदूद्वेष, मोदीद्वेष आणि मुस्लीम तुष्टीकरण ही समाजवाद्यांची प्रमुख वैशिष्ट्ये. हा द्वेषाचा कंड शमवण्यासाठी उपयुक्त असलेला उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रातील एकमेव नेता असल्याचे समाजवादी मंडळींचे मत झाले असेल तर ते अजिबातच चुकीचे नाही. ठाकरे आणि समाजवाद्यांची ही युती याच वैशिष्ट्यांमुळे स्वाभाविक आणि नैसर्गिक बनली आहे.

समाजवादी संघटनांचे २१ भंगारात गेलेले डबे ठाकरेंच्या पक्षाला जोडण्यासाठी आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी बाबा आढाव, कुमार सप्तर्षी आदी बुजुर्ग मंडळींनी आशीर्वाद दिला. देशात निर्माण झालेले द्वेषाचे वातावरण बदलण्यासाठी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही मंडळी काम करणार आहेत. लोकशाही वाचवण्याचे काम करणार आहेत. समाजवादी मंडळी ठाकरेंना डोक्यावर घ्यायला तयार का झाली, याचे उत्तर समाजवाद्यांच्या रा.स्व.संघ-भाजपाविरोधी मानसिकतेत आहे. संघ द्वेषाची बीज त्यांच्या संपूर्ण इतिहासात सापडतात. द्वेषाच्या त्याच मजबूत धाग्याने ही सोयरीक झालेली आहे. परंतु दोघांची सद्यस्थिती पाहाता या संबंधांचे वर्णन उघड्याकडे गेला नागडा असेच करावे लागेल.

 

 

ज्यांच्या देण्यासारखे कधीच काही नसते असे ठाकरे आणि देशाच्या राजकारणात संपलेले समाजवादी अशीही युती आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण सुब्बुराव हर्डीकर यांनी १९२३ मध्ये हिंदुस्तानी सेवा दलाची स्थापना केली. १९४१ मध्ये राष्ट्र सेवा दल या नावाने याचे पुनर्गठन करण्यात आले. महाराष्ट्रातील तमाम समाजवाद्यांची ही मातृसंस्था म्हणता येईल. पुढे राष्ट्रसेवा दलाचे वधू-वर सूचक मंडळ झाले. संघटनात्मक काम वाढवण्या ऐवजी आपसांत विवाह करून समाजवादी विचार मजबूत करण्याचा प्रयोग राष्ट्र सेवा दलाने अखंडपणे सुरू ठेवला. प्रमिला दंडवते- मधु दंडवते, सदानंद वर्दे-सुधा वर्दे अशी उनेक उदाहरणे सांगता येतील.

 

राजकीय क्षेत्रात समाजवाद रुजवण्याचा राम मनोहर लोहीया, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आदींनी केला. १९५२ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना झाली. समाजवाद्यांचे एक वैशिष्ट्य आहे. इथे कार्यकर्ते कमी नी नेते जास्त असा मामला आहे. इथे प्रत्येकाला असे वाटते की पक्ष आपणच पक्षाचे नेते आहोत आणि पक्ष आपल्या ताब्यात असला पाहिजे. त्यामुळे मूळ पक्ष फोडून नव्या पक्षाची स्थापना करायची, नवा पक्ष पुन्हा एकदा पक्षांतर्गत दुहीमुळे डबघाईस आला की अन्य मोडीत निघालेल्या समाजवादी पक्षांसोबत त्याचे विलिनीकरण करून नवा पक्ष स्थापन करायचा हा समाजवादी नेत्यांचा जुना आणि आवडता उद्योग.

 

आणीबाणी विरोधी आंदोलनात जॉर्ज फर्नांडीस, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव, नीतीश कुमार, चंद्रशेखर आदी नेत्यांची फळी निर्माण झाली. पुढे प्रत्येक नेत्याने स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यातले अनेक पक्ष कौटुंबिक उद्योग बनले. मुलायम सिंह, लालू प्रसाद यादव ही काही नावे वानगीदाखल सांगता येतील. महाराष्ट्रातही समाजवादी मंडळी एका पक्षात नांदू शकली नाहीत. यातील अनेक नेते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेसची तैनाती फौज बनले. घनघोर हिंदू विरोध हा समाजवादी चळवळीचा आत्मा राहिलेला आहे. मुलायम सिंह यांनी कारसेवकांवर गोळीबार केला. लालू प्रसाद यादव यांनी समस्तीपूर येथे रामरथ यात्रा रोखली. आज समाजवाद्यांच्या महाराष्ट्रातील पिलावळीला उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारावेसे का वाटते याचे कारण हेच आहे.

 

समाजवाद्यांच्या मनात रा.स्व.संघाबाबत प्रचंड अढी आहे. एकत्र सुरूवात करूनही संघ स्वयंसेवक एकहाती सत्तेपर्यंत पोहोचले, परंतु आपण आजही काँग्रेसची धुणीभांडी करतोय ही ती सल असावी. समाजवादी सतत आपसांत भांडत राहिले, संघात कधी फूट पडली नाही, संघ कायम वर्धिष्णू राहीला ही खदखद. आणीबाणी उलथून टाकण्यासाठी समाजवाद्यांच्या सोबत संघाची मोठी भूमिका आहे. संघाने देशभरात भूमिगत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीला आव्हान दिले होते. इंदिराजींचा पाडाव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आले. परंतु एकत्र नांदणे हा समाजवाद्यांचा पिंड नाही. सगळे काही बरे सुरू असताना अचानक यांचा वैचारीक कंड जागृत होतो आणि समाजवादी मंडळी खाजवण्याचा मनसोक्त आनंद घेण्याच्या कामाला लागतात.

हे ही वाचा:

शरद पवारांचे निकटवर्ती, राष्ट्रवादीचे माजी कोषाध्यक्ष ईश्वरलाल जैन यांची ३१५ कोटींची संपत्ती जप्त

निठारी हत्याकांडातील दोषी कोली, पंधेर निर्दोष, मृत्युदंडाची शिक्षा रद्द

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?

१२८ वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन

मधु लिमये यांनी दुहेरी सदस्यतेचा मुद्दा उकरून जनता पार्टीत फूट पाडण्याची व्यवस्था केली. जनसंघासह अनेक पक्षांचे विलिनीकरण करून त्या काळी जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती. ‘संघ ही जातीयवादी विचारांची संस्था आहे. पूर्वीच्या जनसंघाच्या नेत्यांनी संघाशी जाहीरपणे संबंध तोडावेत’ अशी मागणी लिमये यांनी केली. ही मागणी अर्थात जनसंघाच्या सदस्यांनी फेटाळली. त्याचे पर्यावसन जनता पार्टीचे सरकार गडगडण्यात झाले. बिगर काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा एक मोठा प्रयोग पाण्यात गेला.

 

समाजवाद्यांच्या मनात संघाबद्दल पूर्वीच्या जनसंघाबद्दल आणि सध्याच्या भाजपाबद्दल जो द्वेष आहे त्या तोडीचा द्वेष आज जर कोणाच्या मनात असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. कोणताही कामधंदा न करता देशविदेशात गडगंज मालमत्ता बनवणारे ठाकरे हे कोणत्या वैचारिक वैशिष्ट्यामुळे समाजवादी साथींना आपलेसे वाटतात? या प्रश्नाचे उत्तर ठाकरेंचा भाजपा द्वेष हेच आहे. ठाकरे अलिकडे उच्चारवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनर्गल टीका करत असतात. संघावर टीका करत असतात. हाच तो धागा आहे. समाजवाद्यांची संघविरोधी खाज भागवण्याचे काम ठाकरे करतायत. केवळ त्याच एका कारणासाठी हे खचलेले, खपलेले एकत्र आले आहेत.

एमआयजी क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात ठाकरेंनी समाजवाद्यांचा भाजपाविरोधी कंड शमवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या चळवळीत समाजवादी आघाडीवर होते, संघ यात कुठे होता? अशा सवाल त्यांनी केला. मुळात ज्या तिन्ही लढयांचा उल्लेख ठाकरे करतायत त्या तिन्ही लढ्यात शिवसेना किंवा ठाकरे कुठे होते याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. आणीबाणीच्या लढ्यात जनसंघ आणि संघाचे कित्येक नेते तुरुंगात होते. त्या आणीबाणीला पाठिंबा शिवसेनेचा होता, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना असण्याचा प्रश्नच नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नेतृत्व आचार्य अत्रे, एस.एम.जोशी यांनी केले. त्यात प्रबोधनकार ठाकरे यांची भागीदारी छटाकभरच होती. तेव्हा शिवसेनेचा जन्म झालेला नसला तरी जनसंघ मात्र या चळवळीत सक्रीयपणे उतरला होता. उद्धव ठाकरेंचा या तीन चळवळी सोडा शिवसेनेच्या जडणघडणीशी तरी काय संबंध आहे. ते आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आले असे राज ठाकरे यांच्यापासून एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सगळ्यांचे मत आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version