संसद सदस्यत्व बहाल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी काल संसदेत दाखल झाले. ते काल संसदेत बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु ते बोलले नाही. बहुधा आज मुहूर्त ठरला असावा. वाट्टेल ते बोलणे हा राहुल यांच्या भाषणाचे प्रमुख वैशिष्ट्य. ते त्यांनी आजही जपले. ‘भाजपा ही देशभक्त पार्टी नसून देशद्रोही पार्टी आहे… मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली’, अशी बेताल वक्तव्य केली. या बेशरम वक्तव्यांवर काँग्रेस नेत्यांनी बाकं बडवली. भाषण ठोकून झाल्यावर राहुल यांनी काढता पाय घेतला. कारण पुढचे भाषण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे होते.
काँग्रेसची परिस्थिती आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची सद्यस्थिती पाहता राहुल हे नेहरु घराण्याचे बहादूरशहा जफर ठरतील असे चित्र दिसते आहे. जफर हा अखेरचा मुघल बादशहा होता. राहुल गांधी हे काँग्रेसचे अखेरचे मुघल ठरणार आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक ही काँग्रेससाठी नसली तर सोनिया गांधी यांच्या परिवारासाठी अस्तित्वाची आणि अखेरची लढाई ठरणार आहे. ही लढाई आपण जिंकू शकत नाही, हे सोनिया, राहुल यांना कळून चुकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवणे अशक्य आहे, याची खात्री पटल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला आलेली हताशा राहुल गांधी यांच्या भाषणातून नेहमीच झळकते. आज त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
राहुल यांचे डोळे मिचकावणे, त्यांचे विनोद, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आजच्या भाषणात दिसले नाही. चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता. बहुधा त्यांनाही पराभव दिसू लागलेला आहे. भांडण सुरू असताना हरण्याची खात्री असलेला अनेकदा शिवीगाळ किंवा मारहाणीवर उतरतो. तोच पवित्रा घेत त्यांनी आज लोकसभेत भाजपाला देशद्रोही ठरवले. भारत मातेची हत्या झाली…, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती केली, अशी बोंब ठोकली.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार बाकं बडवत होते. कधी काळी लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासारख्या दिग्गजांनी काँग्रेसचे नेतृत्व केले. आज राहुल त्यांचे नेतृत्व करतायत. घसरण फक्त नेतृत्वाबाबत नाही. खासदारांची स्थितीही वेगळी नाही. भारत मातेची हत्या झाली… या वक्तव्यावर बाकं बडवून काँग्रेसच्या सदस्यांनी सदनात लायकी सिद्ध केली. मत देणारे आणि त्या मतांमुळे सत्ताधारी झालेले येत-जात असतात, देश चिरंतन असतो. आपण देशालाच भारत माता म्हणतो, हेही राहुलना कळू नये हे त्यांचे दुर्दैव.
२०१४ मध्ये काँग्रेसने सत्ता गमावली. तेव्हा पासून देशात काही वाईट घडले की ते देशाच्या इतिहासात प्रथमच घडले असा आव आणत, राहुल गांधी थयथयाट करायला सुरूवात करतात. देशात काही वाईट घडले की यांना कोण आनंद होतो की, चला मोदींच्या विरोधात काही तरी मुद्दा सापडला. मणिपूरमध्ये जे काही घडले ते मानवतेला काळीमा फासणारे होते. त्याचा वापर करून राजकारणाची पोळी भाजण्याची वेळ काँग्रेसवर आली, कारण त्यांना दुसरा मुद्दाच सापडत नाही. ‘मणिपूरमध्ये लष्कर उतरवले तर एका दिवसात मणिपूर शांत होईल’, असे राहुल गांधी आजच्या भाषणात म्हणाले. इतकं सगळं सोपं असते, तर भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात प्रकरण इतके चिघळेपर्यंत मोदींनी वाट का पाहीली?
विषय संवेदनशील आहे. गोळ्या घालून सुटणारा नाही, हे मोदींना ठाऊक आहे. गोळ्या घातल्या की, भाजपाचे सरकार ख्रिस्त्यांना टिपून टिपून मारते आहे, असा कांगावा करायला राहुल गांधी, त्यांची तैनाती फौज आणि ईशान्य भारतातील चर्च मोकळाच आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृति ईराणी यांचे भाषण होते. त्यापूर्वीच राहुल गांधी सटकले. पळण्याची ही सुरूवात अमेठीपासून झालेली आहे.
अमेठीचा परंपरागत मतदार संघ राहुल गांधी स्मृती ईराणी यांच्या भयामुळेच सोडून पळाले. अध्येमध्ये कुठेही न थांबता त्यांनी थेट केरळमधील वायनाडमध्ये आश्रय घेतला. स्मृती इराणींचे भाषण ऐकल्यानंतर पळ काढण्याचा राहुल यांचा निर्णय़ योग्यच होता, असे काँग्रेसवाल्यांना वाटले असेल. राहुल लोकसभेत भाषणाला उभे राहतात. एखाद्या योद्ध्याच्या थाटात केंद्र सरकारवर प्रहार करतात. परंतु समोरचा त्यांच्या आरोपांना, आक्षेपांना उत्तर देण्यापूर्वीच ते पळ काढतात. हे यापूर्वी अनेकदा झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्याचा पळपुटेपणा देशाने अनेकदा पाहीला आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या कथित ‘फ्लाइंग किस’विरोधात तक्रार
चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा
“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल
धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार
कश्मीरमध्ये झालेल्या महिला अत्याचारांचा पाढा उदाहरणे देऊन स्मृति इराणी यांनी वाचला. गिरीजा टिक्कू या तरुणीवर झालेला बलात्कार, नंतर लाकूड कापायच्या करवतीने केलेले तिचे तुकडे. सरला भट सारख्या कित्येक तरुणींवर झालेले सामुहिक बलात्कार. काश्मीरमध्ये इस्लामी कट्टरवाद्यांनी केले, तेच दिल्लीत शिख दंग्यांच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांनी केले. शीख महिलांवर बलात्काराच्या कित्येक घटना आहेत. लहान मुलांच्या गळ्यात टायर टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. प.बंगालमध्ये बलात्कार हे तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून विरोधकांवर वापरण्यात येणारे हत्यार बनले आहे.
काँग्रेस शासित राजस्थानच्या भिलवाडामध्ये झालेला प्रकार तर भीषण आहे. आधी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, त्यांनंतर हत्या आणि त्यानंतर भट्टीत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट करण्याचा प्रयत्न. आणीबाणीच्या काळात बंगळुरूतील तुरुंगात महिलांची होणारी नग्न परेड. अशा कित्येक दुर्दैवी उदाहरणांची जंत्री स्मृती इराणी यांनी सादर केली. मणिपूरमध्ये जे काही घडले त्यापेक्षा यापैकी एकाही घटनेची तीव्रता कमी नाही. तेव्हा मात्र राहुल गांधी यांनी भारत मातेची हत्या झाल्याचे वाटले नाही. यातले अनेक अत्याचार त्या त्या वेळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने आणि सध्या I.N.D.I.A. आघाडीत असलेल्या काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी केलेले आहेत. ईच्छा असली तरी राहुल गांधी या पापांचे काय उत्तर देणार?
बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्र यांनी काँग्रेसच्या परीस्थितीवर अचूक भाष्य केले. काँग्रेसला विजयाच्या जबड्यातून अपयश खेचून आणण्याची सवय लागली आहे. दुसऱ्याला अवलक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून वारंवार स्वत:चे नाक कापण्याचा प्रय़ोग सुरू आहे. त्यांनी स्वत:च पंतप्रधान मोदींना आय़ती संधी दिली. मोदी हे अमोघ वक्ते आहेत, त्यांना या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने काँग्रेसने बोलण्याची संधी दिली आहे. ते आता काँग्रेसच्या चिंधड्या उडवणार हे निश्चित. काँग्रेस स्वत:च टाकलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या जाळ्यात आता फसत चालली आहे. उद्या गुरूवारी पंतप्रधान मोदींचे भाषण आहे. उद्याचा दिवस काँग्रेससाठी कयामत का दिन असणार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)