काँग्रेसचे नेते मृतांचे राजकारण करतात, ही बाब काही नवीन नाही. राहुल गांधी एक पाऊल पुढे गेलेले आहेत, ते मृतांवरही जाती पाहूनच शोक व्यक्त करतायत. महाराष्ट्र हादरवणाऱ्या दोन दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडल्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि पोलिस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू. महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले राहुल गांधी सोमनाथच्या आई-वडीलांना भेटले. परंतु बीडच्या देशमुख कुटुंबियांची भेट मात्र त्यांनी टाळली. भेटून सांत्वन करणे दूर राहिले, त्यांनी शाब्दिक शोक संवेदनाही व्यक्त केली नाही. राहुल गांधी यांच्या निर्ढावलेपणावर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने शिक्कामोर्तब केले आहे.
परभणी आणि मस्साजोग प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल हक्कभंग आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु पटोलेंचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या हक्कभंग प्रस्तावाची हवा आधीच काढून घेतलेली आहे. राहुल गांधी मस्साजोगमध्ये का गेले नाहीत त्याची कारणे अनेक आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे जातीपाती पलिकडचा विचार करणारे होते. ते भाजपाचे बूथ प्रमुख असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात उघड केलेली आहे. त्यांना खरे
तर दलितांचे मसीहा म्हणायला हवे. एका गोदामाचा वॉचमन म्हणून काम करणाऱ्या दलित तरुणाला मारहाण झाल्यामुळे त्यांनी गावगुंडांना अंगावर घेतले. आपला जीव गमावला.
देशमुख यांची हत्या त्यांच्या वैयक्तिक वैमनस्यातून नाही, तर गावकीच्या भानगडीमुळे झाली. एका मराठ्याने एका दलित
बांधवासाठी रक्त सांडले. देशमुख जातीसाठी नाही तर गावासाठी लढले. सामाजिक ऐक्याचे खूप मोठे उदाहरण त्यांच्या बलिदानाने निर्माण केले. राहुल गांधी यांना कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाजपा सरकारला लक्ष्य करण्यासाठी हे प्रकरणही सोयीचे होते. देशमुख प्रकरणावरूनही त्यांना सरकारवर तोफ डागता आली असती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यावर टीकेचे शेणगोळे फेकता आले असते. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही, असा आरोप करता आला असता. परंतु त्यांनी तसे केले नाही. कारण एक तर देशमुख हे दलित नव्हते. दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे ते भाजपाशी संबंधित होते. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या निषेध करण्यायोग्य नसतात. त्यामुळे प.बंगालमध्ये झालेल्या हत्यांचा राहुल गांधी कधीही निषेध करीत नाहीत. म्हणूनच देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्याच्या भानगडीतही ते पडले नाहीत.
खरे तर पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत कोणताही किंतु-परंतु नाही. अत्यंत क्रूरपणे त्यांना ठार करण्यात आले ही बाब उघड आहे. परंतु तरीही राहुल गांधी त्यांच्या घरी फिरकले नाहीत. राहुल गांधींच्या दृष्टीने जात हे हिंदू समाजात फूट पाडण्याचे मोठे अस्त्र आहे. कारण एकसंध हिंदू समाज त्यांच्या पक्षाची काय अवस्था करू शकतो हे हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालातून पुरेसे स्पष्ट झालेले आहे. देशमुख यांची हत्या या फोडाफोडीच्या राजकारणाला फोडणी देण्यासाठी सोयीची नव्हती. समाजात जातीवरून मोठा संघर्ष आहे, उच्चवर्णीय तथाकथित छोट्या जातींवर अन्याय करतायत, त्यांचे शोषण करतायत हा जो त्यांचा लाडका सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचे विसर्जन करणारी मस्साजोगची घटना होती. त्यामुळे राहुल गांधी मस्साजोगला गेले नाहीत. त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली नाही. त्यांचे सांत्वन केले नाही.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या पलीकडे एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते, ही खात्री अटलजींनी दिली!
संसद भवनाजवळ एकाने स्वतःला घेतलं पेटवून; पोलिसांना सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी
विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!
‘आदित्य ठाकरेंचे वय आहे तेवढीही त्यांना अक्कल नाही’
राहुल गांधी यांची ही कृती त्यांच्या संकुचित राजकारणावर झळझळीत प्रकाश टाकणारी होती. तरीही याबाबत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही, ही बाब अत्यंत आश्चर्यकारक आहे. कोणाही त्यांना हा प्रश्न विचारला नाही. देशमुख कुटुंबियांकडे न फिरकण्याचे कारण विचारले नाही. ते तिथे न गेल्याबद्दल कोणालाही वावगे वाटले नाही, कोणीही त्यांच्यावर टीका केली नाही. हत्या, बलात्कारासारख्या गुन्ह्यांबाबत राहुल गांधी किती सिलेक्टीव्ह आहेत, हे या आधीही उघड झाले आहे. काँग्रेस किंवा मित्र पक्षांच्या राज्यातील हे गुन्हे त्यांना कधीही गंभीर वाटत नाहीत, त्यांचा निषेध कऱण्याचीही त्यांची ईच्छा होत नाही. पीडितांच्या घरी जाणे त्यांचा निषेध कऱणे ही बाब खूपच दूरची. कारण तिथे गेले तर ठपका कोणावर ठेवणार?
देशमुख हत्याप्रकरणावरून फडणवीसांच्या विरोधात बोलण्याची मनोज जरांगे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. महायुतीच्या प्रचंड विजयामुळे अडगळीला गेलेले जरांगे हे देशमुख हत्या प्रकरणाचे भांडवल करून पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची धडपड करीत आहेत. त्यांनी या प्रकरणावरून फडणवीस यांच्यावर टीका जरूर करावी, परंतु तेवढीच विखारी टीका राहुल गांधी यांच्यावर करण्याचीही संधी त्यांना खुद्द राहुल गांधी यांनी दिली होती. देशमुख यांच्याकडे ते फिरकले नाहीत, त्याबाबत जेव्हा जरांगेंना छेडण्यात आले तेव्हा ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या कारचे पेट्रोल संपले असेल. हे विधान निश्चितपणे उपहासात्मक आहे. परंतु राहुल गांधी यांच्या कृतीला झोडण्यासाठी हा उपहास पुरेसा होता काय? विरोधकांचा हा दुटप्पीपणा त्यांची विश्वासार्हता संपवतो आहे. विरोधकांनी राजकारण जरुर करावे, परंतु ते समाजहिताचे हवे. अन्यायाच्या बाबतीत ते जात शोधत राहिले तर त्यातून त्यांचेही भले होणार नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)