काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नव्या वास्तूच्या शोधात आहेत. सुरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची सजा सुनावल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना १२ तुघलक रोड हा बंगला सोडावा लागला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी बहाल केल्यानंतर त्यांना पुन्हा जुन्या वास्तूत जाण्याची इच्छा नाही. ते नव्या वास्तूच्या शोधात आहेत.
२००४ मध्ये राहुल गांधी अमेठीतून खासदार म्हणून निवडून आले. देशात यूपीएची सत्ता आली तेव्हा पासून राहुल गांधी १२ तुघलक रोड या निवासस्थानी राहू लागले. त्यापूर्वी ते मातोश्री सोनिया गांधी यांच्यासोबत १० जनपथ येथे राहात असत. तब्बल १९ वर्षे त्यांचा मुक्काम १२ तुघलक रोडवर होता. १२ तुघलक हा ब्रिटीश कालीन ऐसपैस बंगला आहे. बंगल्यांच्या श्रेणीमध्ये याला टाईप ८ बंगला म्हणतात. बंगल्यासमोर विस्तीर्ण लॉन, बंगल्याच्या वास्तूमध्ये व्यायामशाळा, ध्यानधारणेसाठी जागा, ऑफीस, डायनिंग रुम आहे. कॅबिनेट मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति किंवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा बंगला मिळतो.
ही वास्तू राहुल गांधींना फार फळली नाही असं म्हणतात. दहा वर्ष देशात यूपीएची सत्ता होती. त्या काळात राहुल गांधी हेही एक सत्ता केंद्र होते. पक्षात त्यांचा दबदबा होता. परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. किंवा थेट पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची त्यांची अभिलाषा असल्यामुळे ते मंत्रिमंडळात सामील झाले नाहीत. गांधी कुटुंब हे अनेक वर्षे देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. परंतु राहुल यांच्या नेतृत्वाला कधीच झळाळी आली नाही. टाईम्स नाऊ या चॅनलवर अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्यावर पप्पू हा शिक्का बसला तो आजतागायत पुसला गेला नाही.
अनेकांनी १२ तुघलक रोड या वास्तूत दोष असल्याचे राहुल यांना सांगितले. परंतु त्यांनी ते फार मनावर घेतले नाही. जेव्हा तुम्ही पूर्णपणे भरात असता तेव्हा अशा गोष्टींना तुम्ही फार किंमत देत नाही. परंतु संघर्षाच्या काळात किंवा पडत्या काळात म्हणा, अनेकजण ज्योतिष किंवा वास्तूशास्त्र अशा विषयांना शरण गेलेले दिसतात. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली तेव्हा त्यांचा १२ तुघलक रोड हा बंगला सुद्धा त्यांच्या हातून गेला. खासदारकी बहाल झाल्यानंतर हा बंगला त्यांना मिळाला. हा बंगला तुम्हाला बहाल करण्यात आला आहे. तो तुम्ही स्वीकारल्याचे आठ दिवसात कळवा, असे खासदारांसाठी बंगल्यांचे वितरण करणाऱ्या समितीकडून त्यांना कळवण्यात आले आहे.
हा बंगला आता राहुल यांना मिळणार हे नक्की झाले असताना राहुल दुसऱ्या बंगल्याचा शोध घेत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. अलिकडेच त्यांनी ७ सफदरजंग हा बंगला पाहून घेतला. बंगला पाहायला त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी या सुद्धा गेल्या होत्या. राहुल यांना झेड सुरक्षा आहे, त्यामुळे त्यांचे निवासस्थान ऐसपैस असणे अपेक्षित आहे. ७ सफदर जंग हा बंगला सुद्धा १२ तुघलक रोड या बंगल्याप्रमाणे प्रशस्त आहे.
आता प्रश्न हा निर्माण होतो की राहुल यांचे बस्तान १९ वर्षे ज्या १२ तुघलक या बंगल्यात होते, तो बंगला सोडून राहुल दुसरा पर्याय का शोधतायत? जो बंगला यूपीएच्या काळात अनेक बैठका आणि घडामोडींचे केंद्र राहिला, त्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा विचार ते का करतायत? असा प्रश्न पडण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. दिल्लीमध्ये नवागत खासदारांची व्यवस्था करण्यासाठी उत्तुंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील प्रशस्त फ्लॅटमध्ये नव्या खासदारांची व्यवस्था केली जाते. परंतु पक्षांचे प्रमुख नेते, वरिष्ठ खासदार आणि मंत्र्यांसाठी मात्र प्रशस्त बंगले असतात. सहसा नेते मंडळींचा कल हे बंगले बदलण्याकडे नसतो. सोनिया गांधी अनेक वर्षे १० जनपथ वर राहतायत, शरद पवारांचे निवासस्थान ६ जनपथ आहे. मग राहुल त्यांचा बंगला बदलण्याचा विचार का करतायत?
हे ही वाचा:
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
चांद्रयान-3; विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ !
भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने
बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!
राहुल यांना जेव्हा पासून १२ तुघलक या बंगल्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हापासून त्यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्यांना सहानुभूती मिळाली. राजकीय परिभाषेत सांगायचे झाले तर त्यांचा ग्राफ वाढला. त्यांचे विदेश दौरेही गाजले. १२ तुघलक मधून बाहेर पडल्यानंतर हे घडले असल्यामुळे त्यांनी पुन्हा या वास्तूत परतू नये, नव्या वास्तूत जावे अशी विनंती त्यांना काँग्रेसचे अनेक नेते करतायत. राहुल गांधी यांचा वास्तू आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल नसेल, परंतु समर्थकांचे म्हणणे त्यांनी मनावर घेतले आहे, असे म्हणायला वाव आहे. त्यांनी १२ तुघलकचा पर्याय शोधायला सुरूवात केलेली आहे. ७ सफदरजंगची वास्तू पाहून घेतलेली आहे. महत्वाचे म्हणजे आठ दिवसात निर्णय कळवा असे सांगून सुद्धा १२ तुघलक रोड या बंगल्याबाबत त्यांनी त्यांचा पक्का निर्णय अजून संबंधितांना कळवलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवरून घालवण्यासाठी गेल्या ९ वर्षात काँग्रेसने जंगजंग पछाडले परंतु उपयोग झाला नाही. त्यातून या नव्या तोडग्याची चाचपणी राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष करतोय. याबाबत स्वत: राहुल कितपत गंभीर आहेत हे त्यांनी बंगल्याची निवड केल्यानंतर स्पष्ट होईलच.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)