महाराष्ट्राचे राजकारण इतके घसरले आहे की, एखाद्या दुर्दैवी घटनांचेही लोकांना वारंवार भांडवल करावेसे वाटते. अभिषेक घोसाळकर नावाचा एक तरुण राजकीय कार्यकर्ता गोळीबारात ठार झाला. त्याची हत्या करणाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून ठार केले ही घटनाच मुळात दुर्दैवी आहे. दोन परिवारांवर या घटनेमुळे आकाश कोसळले. एखादा राजकीय संघर्ष चुकीच्या मार्गाने पुढे गेला तर त्याचे पर्यवसान किती भयंकर होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेशी याचा खरंच संबंध आहे काय?
अभिषेक घोसाळकर हे उबाठा गटाचे उपनेते. माजी नगरसेवक. कधी काळी ते वॉर्ड क्रमांक १ चे नगरसेवक होते. हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांच्या पत्नी तेजस्विनी इथून निवडून आल्या. या वॉर्डमध्ये घोसाळकर यांचे काम खूपच चांगले होते. याच वॉर्डात मॉरीस नऱ्होना सक्रीय होता.
मॉरीस हा राजकारणी नव्हता. राजकारणाच्या खेळापेक्षा तो पोकरमध्ये जास्त रमायचा. भारतात पोकर हा जुगार मानला जातो. रमी आणि तीन पत्ती या खेळाच्या तुलनेत पोकर हा थोडा वेगळा खेळ आहे. इथे समोरच्याकडे कोणते पत्ते आहेत, तो कोणते पत्ते फेकेल याचा अंदाज बांधून तुम्हाला खेळायचे असते. एक प्रकारचा माईंड गेम असतो. कसिना रॉयल या बॉण्ड पटात तुम्ही हा खेळ पाहिला असेल.
मॉरीस नऱ्होना पोकरचा बादशहा होता.आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पोकर खेळायचा. पोकरच्या जागतिक क्रमवारीत त्याची गणना होत होती. राजकारणाच्या खेळातला माईंड गेम मात्र त्याला जमला नाही, असेच म्हणावे लागले. राजकीय महत्वाकांक्षेमुळे तो इतका पेटला होता की स्वत: सोबत त्याने प्रतिस्पर्ध्याला संपवून टाकले.
मॉरीस आठ वर्षे अमेरिकेत राहिलेला नऱ्होना भारतात स्थायिक झाल्यानंतरही वरचेवर अमेरिकेत जात असे. कारण अमेरिकेत पोकर खेळणे बेकायदेशीर नाही. मॉरीस लॉस एन्जल्समध्ये पोकर खेळण्यासाठीच जात असे. त्याने चांगला पैसाही कमावला. अलिकडे तो पोकर खेळणाऱ्यांना पैसे पुरवण्याचा व्यवसाय करायचा. तो फायनान्सर झाला होता. त्याला राजकारणाची खाज होती.
कोविडच्या काळात त्याने खूप पैसा खर्च केला. लोकांची मदत केली. कोणत्याही परीस्थित त्याला नगरसेवक पदाची निवडणूक जिंकायची होती. म्हणून तो प्रचंड पैसा खर्च करत होता. पोकरमध्ये कमावलेले पैसे तो गोरगरीबांना वाटायचा. बोरीवलीत अनेक रिक्षांच्या मागे मॉरीसभाई-गॉडब्लेस असे स्टीकर सर्रास दिसतात.
वॉर्ड क्रमांक एक मध्ये त्याने अभिषेक घोसाळकरच्या संपर्क कार्यालयाशेजारी त्याने आपले कार्यालय थाटले. स्पर्धा जोपर्यंत कामा पुरती होती तो पर्यंत ठीक होते. परंतु मॉरीस असा वाहवत गेला की त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर वैयक्तिक टीका सुरू केली.
समाज माध्यमांवर तो प्रचंड सक्रीय होता. स्वत:च्या कामांबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या मॉरीसने समोरच्यावर प्रहार करण्यासाठीही हेच शस्त्र वापरले. फेसबुकच्या माध्यमातून तो अभिषेकची बदनामी करू लागला. अभिषेकची प्रतिमा त्या भागात चांगली होती. मॉरीस त्याच्यावर भ्रष्टाचार आणि टक्केवारीचे आरोप करू लागला. राजकारणात प्रतिस्पर्ध्यांकडून एकमेकांवर चिखलफेक होतच असते. परंतु मॉरीसने मर्यादा ओलांडली. वैयक्तिक भानगडींना तो लक्ष्य बनवू लागला. त्याने याप्रकरणी केलेले अनेक आरोप गंभीर होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड खुन्नस निर्माण झाला.
कोविडच्या काळात भरपूर काम केल्यामुळे मॉरीसची लोकप्रियता वाढली होती. लोक त्याचे खूप कौतुक करत होते. २०२२ मध्ये तो अमेरिकेत गेला. त्याच काळात त्याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल करण्याचे आरोप करून पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. मॉरीस त्यावेळी परदेशात होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली. भारतात परतल्यावर त्याला अटक कऱण्यात आली.
आपल्याला या प्रकारात गुंतवण्यात आले आहे, हे त्याच्या लक्षात आले. यामागे अभिषेकचा हात असावा असा त्याने ग्रह करून घेतला. वॉर्ड क्रमांक एक मधून कोण नगरसेवक बनणार, या प्रश्नातून निर्माण झालेल्या राजकीय चुरशीचा परिपाक अखेर या दोघांच्या मृत्यूत झाला. मॉरीसने कसे अभिषेकला कार्यालयात बोलावले, त्याच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले. दोघांनी एकत्र काम करायचे असे जाहीर केले आणि मॉरीसने त्याच्यावर गोळ्या झाडल्या हे सगळ्या जगाने लाईव्ह पाहिले. या घटनेच्या मागचा इतिहास हा असा आहे.
हे ही वाचा:
गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा
हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक
फेसबुक लाईव्हमधून लोकांपर्यंत आपली कामे पोहोचवणाऱ्या मॉरीसने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सूडनाट्य जगासमोर ठेवले. अभिषेकवर जीवघेणा गोळीबार केल्यानंतर त्याने स्वत:लाही संपवले. जे काही घडले ते गँगवॉर नव्हते. वैयक्तिक वैमनस्यातून दोन चांगल्या माणसांचा बळी गेला. मत्सर नरकाचे द्वार दाखवतो असे भगवद्गीतेत म्हटले आहे. दहीसरमध्ये नेमके तेच घडले आहे.
या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुठे येतात? मॉरीस हा काही गुंड नव्हता. दोघांमध्ये सुरू असलेले कोल्ड वॉर या पातळीवर जाईल अशी कोणी कल्पना केलेली नव्हती. जे काय घडले ते अत्यंत दुर्दैवी असले तरी त्याचा खरोखर कायदा-सुव्यवस्थेशी संबंध आहे काय? संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे आदी वैफल्यग्रस्तांना चिखलफेक करण्यासाठी काही कारण लागत नाही. निमित्तही लागत नाही. जेव्हा काही घडत नाही तेव्हाही ही मंडळी फडणवीसांचा राजीनामा मागत असतात. आता दोन हत्या झाल्यानंतर त्यांनी राजीनामा मागितला तर कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.
मॉरीसच्या कार्याची दखल अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांसह सामनानेही वेळोवेळी घेतलेली आहे. याचा अर्थ माणूस वाईट नव्हता. अभिषेक घोसाळकर यांचेही सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. आज उबाठा गट आणि भाजपाचे संबंध प्रचंड ताणले गेले असताना अभिषेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी उत्तम संबंध ठेवून होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही त्याच्याबद्दल आदर होता. घोसाळकर यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्याचे सोडून फडणवीसांना टार्गेट करणाऱ्यांना काय म्हणावं?
राज्यात कोणाचेही सरकार असले तरी गुन्हे थांबणार नाहीत. सरकारचे काम गुन्हे घडल्यानंतर आरोपींना शिक्षा होते की नाही याची खातरजमा करणे आहे. फडणवीस हे काम नि:पक्षपातीपणे करतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)