पवारांनी वाटोळे केले, असे म्हणताय ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्या शरद पवार तसेच नाना पटोलेंविरोधात जरांगे गरळ ओकणार का?

पवारांनी वाटोळे केले, असे म्हणताय ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले याची मनोज जरांगे पाटील यांना अखेर उपरती झालेली आहे. कालपर्यंत मराठा आरक्षणप्रकरणी जरांगे भाजपावर खापर फोडत होते. पवारांवर स्तुतीसुमने उधळत होते. शरद शरण भूमिकेवरून लोक प्रश्न विचारायला लागल्यामुळे जरांगे अडचणीत आले होते. आता फक्त भाजपावर बोलून चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पवारांनाही त्यांनी लक्ष्य केलेले आहे. परंतु ते टीका करून थांबणार आहेत, की पवारांचे उमेदवारही पाडणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट करायला हवे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मनोज जरांगेही कामाला लागलेले आहेत. सध्या राज्यात त्यांची शांतता रॅली सुरू आहे. राहता येथे झालेल्या रॅलीत जरांगे यांनी पवारांवर टीका केली. प्रश्न हा आहे की पवारांना आपले वाटोळे केले याचा शोध जरांगेंना इतक्या उशिरा का लागला? शरद पवार जेव्हा त्यांना भेटायला अंतरावली सराटीमध्ये आले होते तेव्हा जरांगेंचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तेव्हा शरद पवार यांनी जरांगेच्या कानातही काही गोष्टी सांगितल्या. तेव्हा जाहीरपणे सांगता आले नसेल, परंतु जरांगेंनी पवारांसारखे कानातच सांगायचे की तुमच्यामुळे मराठा समाजाचे वाटोळे झाले. तेव्हा का सुचले नाही?  आणि आता का सुचले आहे. जरांगेंनी हे स्पष्ट करायला हवे.

ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत मविआने आपली भूमिका स्पष्ट करावी या त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस या पक्षांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर जरांगेना डिचवले आहे. आजोबा मराठा, बाप मराठा मग मुलाला कुणबी का व्हायचंय? पटोलेंनी जरांगे यांच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही, उलट मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून जाहीर करा, या मागणीवरून त्यांना डिवचणारा सवाल केला आहे. थोडक्यात एका बाजूला भाजपाचे नेते आता जरांगेंच्या अरे ला कारे, असेच उत्तर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मविआचे नेते जरांगेना फार गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत. जरांगेना थेट पाठिंबा देण्याची भूमिका राज्यातील एकही पक्ष घेताना दिसत नाही. त्यामुळे जरांगेंना आता सगळ्यांनाच ठोकावे लागले. किमान जाहीरपणे तरी तसा आव आणावा लागेल, हे स्पष्ट होते. म्हणून जरांगे यांनी आव आणलेला दिसतो. परंतु ही लुटुपुटूची लढाई नाही, हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे फक्त टीका करून भागणार नाही.

जर पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले असेल तर जरांगे भाजपाचे उमेदवार पाडून त्यांचा राजकीय लाभ का करून देत आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजे. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या बजरंग सोनावणे यांना फायदा होईल अशा रितीने पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता. गावागावात बैठका घेऊन पंकजा यांना पाडा, असे आवाहन केले होते. असे अनेक मतदार संघात घडले. जर पवारांनी मराठ्यांचे नुकसान केले असेल तर जरांगे पवारांच्या पक्षाचा फायदा होईल अशा प्रकारे तुतारी का फुंकत होते, हे त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे.

हे ही वाचा:

तुरुंगवास भोगलेल्या माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधानांची हकालपट्टी

केजरीवालांना दिलासा नाहीच; अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, लष्कराचा कॅप्टन हुतात्मा !

अराजकतेच्या गर्तेत सापडलेला बांगलादेश आता आर्थिक संकटाच्या छायेत!

आधी राज्यात २८८ जागा लढवण्याचा दावा जरांगे यांनी केला होता. तो हळूच मागे घेतला. कदाचित डिपॉझिट जप्त होईल याची त्यांना खात्री झाली असावी. आता मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत उमेदवारांना पाडणार असा दम त्यांनी भरला आहे. त्यात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे, बाप मराठा असेल तर मुलाला कुणबी का व्हायचंय असा सवाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आणि या विषयावर सोयीस्कर मौन बाळगणाऱ्या उबाठा शिवसेनेचे उमेदवार किती हे त्यांनी जाहीर करायला हवे.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्या विरोधात जरांगे वाट्टेल ते बोलतात. मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्या शरद पवार यांच्या विरोधात, नाना पटोले यांच्याविरोधात आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आता ते तशीच गरळ ओकणार आहेत का हा प्रश्न आहेत. याची शक्यता अजिबात नाही. पवारांनी दिले नाही, म्हणून तुमच्याकडे आरक्षण मागतोय ना? असा युक्तिवाद जरांगे महायुतीबाबत करतायत. परंतु आजवर आरक्षण न देणाऱ्या पवारांबाबत त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही आकस दिसत नाही. तो दिसतो फक्त पवारांना विरोध कऱणाऱ्या नेत्यांबाबत. हा आकस ते कायम ठेवतील आणि विधानसभा निवडणुकांमध्येही पवारांना फायदेशीर असे आंदोलन जारी ठेवतील, अशी शक्यता जास्त आहे. अन्यथा पवारांनी वाटोळे केले आता पश्चिम महाराष्ट्रात त्यांचेही उमेदवार पाडणार, मविआलाही झटका देणार असे त्यांनी जाहीरपणे सांगितले असते. तसे होणे नाही. वाटोळे करणाऱ्या पवारांचे भले करण्याचे धोरण जरांगे यांनी लोकसभेत राबवले. आता ते विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करणार. आरक्षणासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले मराठे त्यांची साथ देणार काय, हा महत्वाचा सवाल आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version