31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरसंपादकीयअंधार सावलीतून बाहेर पडल्या कायंदे...

अंधार सावलीतून बाहेर पडल्या कायंदे…

शिउबाठा सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या मनिषा कायंदे यांच्याबद्दल मात्र कोणालाच सहानुभूती नाही.

Google News Follow

Related

शिउबाठाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून केला आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामुळे अंधारात गेलेल्या शिउबाठाच्या महिला नेत्या असे काही पाऊल उचलतील याची शक्यता होतीच. मनिषा कायंदे यांनी त्याची सुरूवात केली. मविआच्या सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांसह पक्षाचे ४० आमदार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना सोडून गेले. तिथे आणखी एका महिला नेत्याने पक्ष सोडला तर काय मोठा फरक पडणार? परंतु हा ठाकरेंना खरोखरच धक्का आहे.

 

मनिषा कायंदे यांची हयात भाजपामध्ये गेली. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर आरोप करून त्यांनी पक्ष सोडला. त्यांनी २०१६ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात भाजपाचे सरकार होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. पक्षातील अनेक निष्ठावंतांना डावलून ठाकरे यांनी २०१८ मध्ये कायंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या दोन वर्षात मनिषा कायंदे विधान परिषदेत दाखल झाल्या. नगरसेवक पद, आमदारकीच्या आशेने पक्षात अनेक वर्ष जोडे झिजवणारे वाट पाहात असताना, त्यांना मागे सोडत कायंदेबाईंनी अवघ्या दोन वर्षात करून दाखवले.

 

कायंदे या काही जननेत्या नव्हत्या. पाठीशी जनता आहे, खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत, असा काही मामला नव्हता. परंतु सुशिक्षित होत्या. पक्षाची भूमिका मांडण्याची क्षमता त्यांच्यात होती. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा म्हणजे कायंदेबाई भाजपावर प्रचंड संतापलेल्या होत्या. हा दारुगोळा उपयोगी पडेल असा हिशोब मनात धरून त्यांना विधान परिषदेत आमदार बनवण्यात आले.

 

उद्धव ठाकरे यांनी मनिषा कायंदे यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. वाईट काळात त्यांना साथ दिली होती. त्याच मनिषा कायंदे आता उद्धव ठाकरे यांच्या हाती नारळ देऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्या आहेत. अनेक वर्ष भाजपामध्ये कार्यरत असलेल्या मनिषा कायंदे यांनी जेव्हा भाजपाला सोडचिठ्ठी दिली तेव्हाही भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूतीच होती. या महिलेवर अन्याय झाला आहे, असेच अनेकांचे मत होते. परंतु शिउबाठा सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या मनिषा कायंदे यांच्याबद्दल मात्र कोणालाच सहानुभूती नाही.

हे ही वाचा:

सांगलीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी नालसाब मुल्लाचा गोळ्या घालून खून

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा पालिकेला अधिकारच काय?

चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’

राजकारणात भावनांना शून्य किंमत असते यावर मनिषा कायंदे यांनी नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. अर्थात उद्धव ठाकरेही तसेच सोयीचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती वाटत नाही. पक्षात पटले नाही, एकाकी पडण्याची वेळ आली तरी पक्षासोबत राहणाऱ्या, अगदीच वाईट परीस्थिती असेल तर घरी बसणाऱ्या नेत्यांचा एक जमाना होता. आज ही पिढी इतिहासजमा झालेली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतरही मनिषा कायंदे यांच्यावर खोक्यांचा आरोप झालेला नाही. हवेची दिशा बदलली की कचरा इथून उडून तिथे जातो, उद्या पुन्हा दिशा बदलली की हा कचरा आमच्या दारात येईल, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेली आहे. राऊत यांचा ठपका फक्त कायंदे यांच्यापेक्षा पक्ष प्रमुखांवर अधिक आहे. कारण कायंदे यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. फक्त पक्षात प्रवेश देऊन ठाकरे थांबले नाहीत, अवघ्या दोन वर्षांत बाईंना प्रमोशन दिले, विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यासाठी अनेकांचा विरोध चेपून काढला. ठाकरेंनी हा कचरा पक्षात घेतलाच कशाला, असा प्रश्न राऊतांनी थेट त्यांनाच विचारायला हवा. असा आणखी किती कचरा शिल्लक आहे, याचाही आता हिशोब मांडायला हवा.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करूनही कायम अंधारात असलेल्या सुषमा अंधारे यांनी शिउबाठात प्रवेश केला. त्यांना उपनेते पद देण्यात आले. पक्षात प्रवेश मिळाल्यानंतर सभा असो वा पत्रकार परिषदा जिथे तिथे फक्त अंधारे बाईंचे दर्शन होऊ लागले. एकेकाळी हिंदु देवदेवतांबद्दल अत्यंत शेलक्या भाषेत बोलणाऱ्या अंधारे बाई जाहीर सभांमधून हिंदुत्वाबाबत बोलू लागल्या. त्यांच्यामुळे मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या नेत्या अगदीत अंधारात गेल्या. त्यांचे दर्शन तर दूरची गोष्ट झाली, परंतु आवाजही लोकांना ऐकू येईनासे झाले. अंधारेबाई पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत प्रत्येकाला तोंडाला येईल ते बोलतात, याचेच ठाकरेंना समाधान होते.

 

नीलम गोऱ्हे काय किंवा कायंदे काय, अंधारे बाईंच्या शेलक्या भाषेत विरोधकांवर टीका करू शकत नव्हत्या, त्यामुळे त्यांची किंमत कमी झाली. अंधारातून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हाच पर्याय आहे, या निष्कर्षापर्यंत कायंदेबाई आल्या. परंतु त्या अखेरच्या असतील असे दिसत नाही. बरेच जण संधीच्या आणि योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहेत.
१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून सुषमा अंधारेही जरा गप्प गप्प आहेत. उद्या त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला तरी कोणाला फार आश्चर्य वाटणार नाही. संजय राऊतांना पुन्हा एकदा आजचीच प्रतिक्रिया द्यावी लागेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा