सलमान फाळके या ड्रग डीलरसोबत माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे फोटो व्हायरल झाले. आव्हाड यांना याप्रकरणी जाब विचारण्यात आला तेव्हा ‘आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहून फोटो काढत नाही’, असा खुलासा त्यांनी केला. आव्हाडांचा कारभार पाहिला तर कॅरेक्टर हा त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा विषय आहे, असे दिसत नाही. कोणत्याही कामासाठी त्यांना कॅरेक्टर सर्टीफीकेटची गरज वाटत नसावी. अलिकडेच विधानसभेत त्यांनी ड्रग्जवर तपशीलवार भाषण ठोकले होते. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि सलमान फाळके याच्या फोटोवरून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुसंगत वाटत नाही हे मात्र निश्चित.
ड्रग्ज आणि राजकीय नेत्यांच्या संबंधांवर चर्चा सुरू झाली ती ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या हॉस्पिटलमधून पलायनानंतर. शिउबाठाचे संजय राऊत यांनी याप्रकरणी राज्य सरकारकडे बोट दाखवले. त्यानंतर त्यांचेच नेते उद्धव ठाकरे ललित पाटील याला शिवबंधन बांधत असल्याचे फोटो व्हायरल झाले. मविआच्या दुसऱ्या नेत्याचे या ललित पाटीलच्या कंपूशी संबंध असल्याचा आरोप होतो आहे.
या ललित पाटीलने नाशिकमध्ये ड्रग्जची फॅक्टरी उभारली होती आणि त्या फॅक्टरीतून सलमान फाळके याच्या मार्फत मुंब्र्यात लाखो रुपयांचे ड्रग्ज येत होते असा आरोप होतो आहे. याच सलमानसोबत आव्हाडांचा फोटो काल एका पत्रकार परीषदेत झळकवून शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी आव्हाडांना जाब विचारला. त्यावर कॅरेक्टर सर्टिफिकेट दाखवून फोटो काढत नाही, असा खुलासा आव्हाडांनी केलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटा दाखवून त्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या तरुणावर अनेक गुन्हे असल्याचा दावा केला.
परंतु या तरुणाने मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला म्हणजे त्याचे मुख्यमंत्र्याशी संबंध आहेत, असे होत नाही अशी मखलाशीही केली. आव्हाडांचे म्हणणे योग्य आहे. एखाद्या नेत्याचा गुंडासोबत किंवा ड्रग्ज माफियासोबत फोटो झळकला म्हणजे त्याचे त्याच्याशी संबंध आहेत, असे म्हणता येत नाही. राजकीय नेते दररोज शेकडो लोकांसोबत फोटो काढत असतात. त्यापैकी ते प्रत्येकाला ओळखतात, असा दावा कोणीही करू शकत नाही.
आव्हाड फोटोच्या आरोपाला फोटोने उत्तर देऊन मोकळे झाले. परंतु त्यांनी मूळ मुद्द्याला बगल दिली. मुंब्र्यात या सलमान पठाणच्या मार्फत ललित पाटीलचे ड्रग्ज येतात, असा आरोप आहे. आव्हाडांनी विधीमंडळात ड्रग्जच्या विरुद्ध लक्षवेधी मांडली होती. मुंब्र्यात ड्रग्जचा कसा सुळसुळाट झाला आहे. हे ड्रग्ज कसे नाक्या नाक्यावर उपलब्ध आहेत. ते काय रेटने मिळतात, याचा तपशील आव्हाडांनी त्यांच्या भाषणा दरम्यान विधानसभेत मांडला. भाषणा दरम्यान भावविवश होऊन आव्हाड रडतायत की काय किंवा मुंब्र्यात ड्रग्जचा सुळसुळाट झालाय या दु:खातिरेकाने विधानसभा अध्यक्षांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतायत की काय असा प्रश्न ते भाषण पाहणाऱ्या लोकांना पडला होता.
हे ही वाचा:
हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी
कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!
पोर्तुगीजांनी तोडली होती एक हजार मंदिरे; गोवा सरकारने बनवला मास्टर प्लॅन
कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला
जेव्हा त्यांना मुंब्र्यातील तरुणांना नासवणारे हे ड्रग्ज कोणा मार्फत येतात याचा उलगडा झाल्यानंतर त्यांनी त्या सलमानविरुद्ध संताप व्यक्त करणे अपेक्षित होते. त्याचे शानू पठाणशी काय आणि किती संबंध आहेत हे शोधणे फार कठीण नाही. सलमान आणि शानू पठाणच्या फोनचा सीडीआर काढला तर एकमेकांशी त्यांचे किती घट्ट संबंध आहेत, अथवा नाहीत याचा एका क्षणात उलगडा होऊ शकतो. सलमानचे मुंब्र्यातील कोणत्या नेत्याशी संबंध आहेत, त्याच्या डोक्यावर कोणाचा वरदहस्त आहे हेही उघड होऊ शकेल.
या प्रकरणामागे कोण आहे, त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि जो कोणी दोषी आहे, त्याला ठोकून काढावे अशी प्रतिक्रिया आव्हाड देऊ शकले असते. परंतु त्यांनी चकार शब्द काढला नाही. स्वत: च्या फोटोबद्दल खुलासा करून ते मोकळे झाले. परंतु मुंब्र्यात ड्रग्जचा सुळसुळाट करणाऱ्या सलमानच्या विरोधात ते एका शब्दाने बोलले नाहीत.
आव्हाडांच्या सोबत चालताना सलमानने फोटो काढला हा काही आव्हाडांचा दोष नाही. परंतु त्यांच्या आजूबाजूला वावरणारा, त्यांच्या पक्षातील नगरसेवकाशी गुळपीठ असलेला हा इसम नेमके कोणत्या प्रकारचे शेण खातो याबाबत त्यांना माहिती नसावी हा मात्र त्यांचा दोष आहे. मुंब्र्यात कोणते ड्रग्ज मिळतात, कोणत्या ठिकाणी मिळतात याबाबत जर आव्हाड खोलात जाऊन माहिती काढू शकतात, तर हे विष कोण पसरवते आहे, याबाबत माहिती काढणे त्यांच्यासाठी फार मोठा विषय नव्हता.
सलमान फाळकेबाबत समजल्यानंतर तर ते अधिकच सोपे होते. आव्हाड हे मुंब्र्याचे मसिहा आहेत. ते गाझाचेही मसिहा आहेत. मुंब्र्यातील तमाम मुस्लीमांचे दैवत. त्यामुळे मुस्लिम तरुणांमध्ये ड्रग्जचे विष पसरवणाऱ्या सलमान फाळकेची कनेक्शन खणून काढण्यासाठी पोलिसांची मदत करणे. त्याचे जर त्यांच्या जवळच्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी संबंध असतील तर त्यांना जाब विचारणे हे काम स्वयंस्फूर्तीने केले पाहिजे.
फेसबुकवर आपल्याविरुद्ध एक किरकोळ पोस्ट अपलोड करणाऱ्या अनंत करमुसे याला जर आव्हाड गुंड पाठवून घरातून उचलू शकतात, बंगल्यावर आणून मारहाण करू शकतात, तर एक लोकप्रतिनिधी म्हणून मुंब्र्याला नासवणाऱ्या ड्रग्ज माफियांचा त्यांनी त्याच पद्धतीने समाचार घ्यायला हवा होता. लोकांनी त्याला रॉबिनहूडगिरी समजून आव्हाडांचे कौतुक तरी केले असते. आततायीपणाचे प्रदर्शन त्यांना ड्रग्ज माफियांच्या विरोधातही करता आले असते. परंतु आव्हाड फक्त मी नाही त्यातला असे सांगून शांत बसले.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)