जरांगेंनी प्रश्नच मिटवला…

भुजबळ त्यांना पुरून उरणार असे चित्र दिसत आहे.

जरांगेंनी प्रश्नच मिटवला…

मराठा आरक्षण मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळातही प्रचंड खल झाला. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्या आक्रमक आणि नाट्यपूर्ण भाषणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर भडीमार केला. तिरमिरलेल्या जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या एका दाव्यामुळे राज्यातील महायुती सरकारने सुटकेचा निश्वास सोडला असेल. बीडमध्ये जाळपोळ करणारी जाळणारी भुजबळांचीच माणसं होती, असे जरांगे म्हणाले आहेत. हा दावा खरा मानला तर जाळपोळ करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे यापुढे करणार नाही, असे मानायला वाव आहे.

 

ओबीसी आऱक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही भूमिका सर्व पक्ष मांडत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची तीच भूमिका आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, मीही तीच भूमिका मांडतोय, मग टीका फक्त माझ्यावर का? हा भुजबळांचा सवाल चुकीचा नाही.

‘मराठ्यांना सरसकट ओबीसी म्हणा’ आणि त्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका महाराष्ट्रातील एकाही राजकीय पक्षाने घेतलेली नाही. ना सत्ताधाऱ्याने, ना विरोधकाने. मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, अशी मागणी भुजबळांसोबत भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनीही केली आहे. मराठ्यांना मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर मुळ ओबीसींना आरक्षणाचा लाभच मिळणार नाही असा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे अलिकडे जरांगेही किती जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याचा आकडा जाहीर करीनासे झाले.
माझा आक्षेप जरांगेंच्या भाषेवर आहे. ‘आमच्याकडेही दंडूके आहेत’, ‘बघून घेऊ’, ‘पाहून घेऊ….’ असे आव्हान जरांगे सरकारला देतायत. ते स्वत:ला ‘सुपर सरकार’ समजतात का, असा थेट हल्ला भुजबळांनी जरांगेंवर केला आहे.

भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यामुळे चिडून जरांगेंनी पलटवार केला. परंतु तो आता त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. ‘बीडमध्ये जाळपोळ करणारे भुजबळांचे लोक होते’, असा नवा दावा जरांगे यांनी केलेला आहे. अर्थात भुजबळांनी या आरोपांचा इन्कार केलेला आहे.

जरांगेंचे आरोप खरे असतील तर ‘सरसकट गुन्हे मागे घेणार नाही, प्रत्येक गुन्ह्याबाबत माहिती घेऊन निर्णय घेऊ’, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हा जरांगे यांना इतके झोंबण्याचे कारण नव्हते. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर जरांगेनी पुन्हा ‘बघून घेऊ’, ‘पाहून घेऊ’ची भाषा केली होती. आज त्याच जरांगे यांनी या जाळपोळ प्रकरणातून हात झटकले आहेत. जाळपोळीचे बिल भुजबळांच्या हाती टेकवण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या लोकांची घरे जाळण्याइतका मी अमानुष नाही, असा खुलासा भुजबळांनी केला आहे. परंतु राज्य सरकारने जरांगेंवर विश्वास ठेवून आता जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी. ती माणसे जर जरांगेंची नसतील तर त्यांना कारवाईवर आक्षेप घेण्याचे कारण नाही.

हे ही वाचा:

मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर!

अस्मत अली बनली नेहा सिंग, इस्लाम धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म!

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल

जरांगेंची तब्येत खालावली, तरीही हे त्यांचे कार्यक्रम पार पाडत आहेत. एका मंत्र्याच्या दबावाखाली सरकार आपली फसवणूक करीत असल्याचा आरोप सातत्याने करीत आहेत. ‘अटक करणार नाही, गुन्हे मागे घेऊ हे आश्वासन सरकारने पाळले नाही, आमची फसवणूक केली, त्यामागे भुजबळांचा विरोध आहे’, असे जरांगे सांगतायत. ‘शांतपणे टोकाची भूमिका घेऊ’ अशी दमबाजी करतायत.

आंदोलना दरम्यान जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचार करणाऱ्या लोकांबाबत जरांगेंची भूमिका सातत्याने बदलते आहे. आंदोलनाशी त्यांचा संबध नाही, अशी भूमिका ते सुरूवातीला घेत होते. आता ही माणसं भुजबळांची आहेत, असा आरोप करतायत. लोकांना आता प्रश्न असा पडलाय की जाळपोळ करणारी माणसे भुजबळांची असतील तर त्यांना अटक होते आणि त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत. त्यामुळे जरांगेंची तडफड का होते आहे?

जाळपोळ करणाऱ्यांना अटक करू नका किंवा त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊ नका, असे भुजबळ कधीच म्हणाले नाहीत. उलट जालन्यात घेतलेल्या पहिल्या सभेत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, म्हणून त्यांनी गृहमंत्रालयावर तोफ डागली होती. त्यानंतर ही कारवाई झाली.

भुजबळांनी आता जरांगेवर झुंडशाहीचा आरोप केल्यानंतर तिरमिरलेल्या जरांगेंनी जाळपोळ प्रकरणातून आपले हात झटकले आहेत. परंतु गुन्हे मागे घेण्याचे त्यांचे टुमणे मात्र कायम आहे.

गर्दी दाखवून आपल्याला हव्या मागण्या पदरात पाडून घेण्याचा जरांगेंचा प्रयत्न होता. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणण्याच्या त्यांच्या मागणीला मराठा नेतृत्वाकडून आणि समाजाकडूनही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या मागणीच्या बाबतीत जरांगे एकाकी पडलेले दिसतात. त्यामुळे आता आंदोलनातील हिंसाचाराचे खापरही ते भुजबळांच्या डोक्यावर फोडतायत. ज्यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवेल याची शक्यता नाही.

आंदोलनाच्या सुरूवातीला जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. परंतु फडणवीस संयमी निघाले. त्यांनी या प्रकरणात एकही वावगा शब्द तोंडातून काढला नाही. फडणवीसांना उचकावणे शक्य नाही, हे लक्षात आल्यामुळे जरांगेंनी मोर्चा भुजबळांकडे वळवला. भुजबळ त्यांना पुरून उरणार असे चित्र दिसत आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version