राज इम्पॅक्ट : उद्धव यांच्या राजकीय अस्तित्वाची जलील यांना चिंता

जलील हे उद्धव यांचे प्रवक्ते कधीपासून झाले? उद्धव यांची राजकीय उंची कमी किंवा जास्त झाल्यामुळे त्यांना कधीपासून फरक पडू लागला?

राज इम्पॅक्ट : उद्धव यांच्या राजकीय अस्तित्वाची जलील यांना चिंता

शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खणखणीत भाषण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या वक्त्तृत्वाचा वारसा लाभलेल्या राज यांचे भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी, त्यांच्या समर्थकांसाठी मेजवानी असते. राज यांनी संपूर्ण जोशात भाषण करताना चाहत्यांची अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. राज यांची गोळी निशाण्यावर लागली. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाबाबत इम्प्तियाज जलील चिंतातूर झाले.

शिवतीर्थावर झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला. काही जुन्या घटनांना उजाळा दिला. काही नवीन माहीती लोकांच्या समोर आणली. शिवसेनेतून ते आणि नारायण राणे बाहेर पडतानाचे काही अनसुने किस्से त्यांनी उपस्थितांसमोर ठेवले. उद्धव ठाकरे यांनी सगळे स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी इतरांना कसे पद्धतशीर बाजूला केले, याचा तपशील त्यांना मांडला.

यापूर्वीच्या सभांमधून भोंग्याच्या प्रश्नांना यशस्वीपणे वाचा फोडल्यानंतर यावेळी त्यांनी माहीमच्या समुद्रात अचानक उगवलेल्या मजारीचा मुद्दा उपस्थित केला. ही मजार जर हटवली नाही, तर त्याच मजारी समोर भव्य गणपती मंदीर उभारावं लागेल, असा इशारा त्यांनी काल दिला होता. २४ तास उलटण्याआधी आज शिंदे-फडणवीस सरकारने या मजारीवर कारवाई केली. ही राज ठाकरे यांची ताकद आहे.

अशी कैक बांधकाम महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर उभारण्यात आली आहेत. अफजल खानाच्या कबरीभोवती झालेले बेकायदा बांधकाम या सरकारने हटवलं, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे कौतुक झाले. परंतु बाकी ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांना जो अनधिकृत मजारींचा वेढा पडलाय उठणार कधी, हा सवाल हजारो शिवभक्तांच्या मनात सलतो आहे. ही रावणाची लंका खरं तर एका झटक्यात साफ व्हायला हवी होती.

राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून नेमकी कोणाची दुखरी नस दाबली, हे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे पुरेसे उघड झाले आहे. सरकारने या मजारीवर कारवाई केल्यानंतर जलील चेकाळले. औरंगाबादला गाडून शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यापासून जलील प्रचंड बिथरलेले आहे. त्यांच्या बिर्याणी उपोषणाविरुद्ध हिंदुत्ववाद्यांनी जबरदस्त ताकदीचा मोर्चा काढून जलील यांना त्यांची औकात दाखवून दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलील यांना उद्धव ठाकरे यांचा प्रचंड आधार वाटत होता. तो आधार आता उरलेला नाही. उद्धव ठाकरे यांनाच सध्या आधाराची गरज आहे. मजारीवर झालेली कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची खेळी आहे, असा दावा जलील यांनी केला. राज यांचे महत्व वाढले तर उद्धव यांचे महत्व कमी होईल, या गणितातून हे सगळं चाललेलं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मुळात उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व कितीसे उरले आहे? बरं जे संपवले आहे, ते संपवण्यात सर्वात मोठी भूमिका ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांचीच आहे.आणि जलील हे उद्धव यांचे प्रवक्ते कधीपासून झाले? उद्धव यांची राजकीय उंची कमी किंवा जास्त झाल्यामुळे त्यांना कधीपासून फरक पडू लागला? उद्धव यांचे राजकीय अस्तित्व माहीममध्ये उभारलेल्या अनधिकृत मजारीशी कधीपासून संबंधित होते? उद्धव ठाकरे यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी त्यांच्याच सांगण्यावरून जलील यांनी इथे मन्नत वगैरे मागितली होती का? असे अनेक सवाल जलील यांच्या विधानामुळे निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा:

वॉशिंग्टनमध्ये काश्मीर मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानींना हाकलून लावले!

मुंबईकरांसाठी गुड न्यूज..बालहट्टापायी मोडीत काढलेला गारगाई-पिंजाळ पाणी पुरवठा प्रकल्प पुन्हा सुरू होणार

राहुल गांधींना शिक्षा ही काँग्रेस सरकारच्या काळातील कायद्यानुसारच, मग ढोंग कशाला?

जागतिक उद्दिष्ट २०३० पण भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मूक्त होणार

 

उद्धव यांनी हिंदुत्व सोडल्याचा या सगळ्या लोकांना इतका ठाम विश्वास झालाय, की वेळ प्रसंगी ते आपली ताकद उद्धव यांच्या मागे उभी करायला मागेपुढे पाहात नाहीत. जलील यांनी त्यात भावनेतून उद्धव यांची वकीली केलेली आहे.
राज यांनी मजारीवर कारवाईची मागणी केली, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने ती कारवाई केली. करणे त्यांना बंधनकारक होते. कारण हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उच्चारवाने सांगितले होते. याला हवं तर राज्य सरकारची चलाखी म्हणा, ते राज यांच्या पायताणाने विंचू मारत आहेत. याला पडत्या फळाची आज्ञा घेणे म्हणतात.

राज यांनीही यासाठी आपले पायताण वापरू द्यायला नकार नाही. श्रेय राज यांना मिळाले, माहीमचा अनधिकृत दर्गा साफ झाल्यामुळे सरकारचेही काम झाले. पण इथे गोची झाली, उद्धव यांची. जलील यांनी ती व्यवस्थितपणे मांडली आहे.
ही मागणी करण्यापासून उद्धव ठाकरे यांना रोखले कोणी होते? त्यांनाही मोठेपणा घेता आला असता, पण त्यांना तसे का केले नाही जलील यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती आहे.

उद्धव यांची नजर नव्या मतपेढीवर आहे आणि ही मतपेढी अशा प्रकारची हिंदुत्ववादी भूमिका घेण्याची मोकळीक देत नाही. उद्धव यांनी अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मजबुरीतून ठेवला होता हेही त्यांना माहीती आहे. शिंदे फडणवीस सरकारने छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. या सगळ्याचा अर्थ एवढाच की जलील यांना हिंदुत्ववादाचा मुखवटा ओढणाऱ्यांबाबत काहीच समस्या नाही. त्यांची उंची आणि वजन कमी होऊ नये, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु हिंदुत्ववादासाठी आवाज बुलंद करणाऱ्या राज ठाकरेंचे वजन सरकारच्या कारवाईमुळे वाढू नये, अशी त्यांची सच्ची भावना आहे.

हा राज ठाकरे यांच्या सभेचा दृष्य परिणाम आहे. कालच्या सभेच्या आणखी एका परिणामाबाबत चर्चा व्हायला हवी. मी आज जे काही बोलतोय, त्याबद्दल उद्या तुमची तोंड उचकटू नका, नाही तर याद राखा तुमचं सगळं बाहेर काढल्याशिवाय राहाणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी दिला होता आणि आज संजय राऊत यांचे सकाळी दर्शन झाले नाही. कुणी निंदो वा वंदो… राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपला दम महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. हिंदुत्वाचा झेंडा उंच उठल्यापासून ही ताकद वाढलेली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version