संसदेमध्ये भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना प्रचंड संताप आलेला आहे. त्यांना हा जातीचा, संविधानाचा आणि संसदेचाही अपमान वाटला. आव्हाडांना असे का वाटले ते काही कळायला मार्ग नाही. राहुल गांधी जिथे तिथे जातीची चौकशी करत फिरतात. कौन जात हो, असा सवाल करीत असतात. संसद सुद्धा याला अपवाद नाही. मग तोच प्रश्न राहुल गांधींना केला तर तो त्यांना त्यांच्या समर्थकांना झोंबण्याचे कारण काय? स्वत:च्या जात आणि धर्माबाबत इतकी संदीग्धता बाळगण्याचे गांधी-वाड्रा परिवाराला कारण काय ?
आपल्या देशात नेत्यांची ओळखच जातीवरून देण्याची परंपरा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांना मराठा स्ट्राँगमॅन म्हटल्यावर संविधानाचा अपमान होत नाही, छगन भुजबळ यांना ओबीसी नेते म्हटले तर संविधानाचा अपमान होत नाही, मायावतींना दलित नेत्या म्हटल्यानंतर संविधानाचा अपमान होत नाही, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पेशवे म्हटल्यामुळे संविधानाचा अपमान होत नाही. तर मग राहुल गांधी यांची जात विचारल्यामुळे संविधानाचा अपमान कसा होतो? संसदेचा अपमान कसा होतो?
खुद्द राहुल गांधी हे जातीबाबत जाणून घेण्यासाठी इतके उत्सुक असतात की ते सगळ्यांना जात विचारत असतात. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ओबीसी किती, दलित किती, असा सवाल करतात तेव्हा संविधानाचा सन्मान होतो का? ते लष्कराच्या जवानांची जात काढत असतात. तेव्हा संविधानाचा सन्मान होतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. ही फार जुनी गोष्ट नाही. अशी फाजील विधाने करण्याचा परवाना आपल्याकडेच आहे, या थाटात राहुल गांधी बोलत असतात. कोणी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला गेले तर इतक्या मिर्च्या का झोंबतात?
मुळात राहुल गांधी यांच्या जातीबद्दल विचारल्यामुळे त्यांचे समर्थक संतापले त्याचे कारण उघड आहे. कारण काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या गांधी परिवाराबाबत प्रचंड मोठी संदिग्धता आहे. स्वातंत्र्य सैनिक फिरोज घांडी हे राहुल यांचे आजोबा. ते पारशी होते. महात्मा गांधी यांनी त्यांना आपले आडनाव दिले. त्यानंतर ते गांधी झाले. आपल्याकडे पतीचा धर्म मुलांना मिळतो. त्यानुसार राजीव गांधी हे पारशी ठरतात. राजीव गांधी यांनी पारशी धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केल्याची कुठेही नोंद नाही.
राजीव यांच्या पत्नी सोनिया मायनो या इटालियन कॅथोलिक. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याची कुठेही नोंद नाही. मग पारशी आणि कॅथोलिक दांपत्याचा मुलगा हिंदू कसा झाला? तो पंडीत आणि जनेऊधारी कसा झाला, हे अवघ्या हिंदुस्थानला न सुटलेले कोडे आहे. प्रियंका वाड्रा यांचा विवाह रॉबर्ट वाड्रा नावाच्या कॅथलिक तरुणाशी का झाला? नाव रॉबर्ट असले तरी तेही जनेऊधारी आहेत का? अजून तरी त्यांनी तसा दावा केलेला नाही. दहा जनपथवर येशूचा फोटो दिसतो, मग गणपती किंवा भगवान शंकराचा फोटो का दिसत नाही.
जगात कुठेही अस्तित्वात नसलेले दत्तात्रय गोत्र राहुल गांधी यांनी कुठून मिळवले. ते असे मिळवता आणि चिटकवता येते का? हा परिवार कायम बाबरी समर्थक का होता, त्यांनी राम मंदिर आंदोलनाला विरोध का केला? रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर त्यांनी बहीष्कार का घातला. त्यांच्या कृतीवरून तर ते हिंदू विरोधी आणि चर्च प्रेमी वाटतात. लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा तीच आहे. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी संसदेत राहुल गांधींना संधी दिली होती. की ते हिंदू आणि हिंदुत्वाचे विरोधी असले तरी ते नावापुरता का होईना हिंदू आहेत. राहुल गांधी ऑनरेकॉर्ड सांगू शकले असते की ते हिंदू आहेत, अमुक तमुक जातीचे आहेत. खरं तर हिंदू असणे महत्वाचे. परंतु काँग्रेसनेच या देशावर कायम अगडे-पिछडे, सवर्ण-दलित असे राजकारण लादले. हिंदू समाजात असलेल्या जातीच्या भिंती अधिक मजबूत कशा होतील, यासाठी प्रयत्न केले. राहुल गांधी तर जातीच्या मुद्द्यावरून हिंदूंमध्ये फूट कशी पडेल याचा कायम प्रयत्न करीत असतात.
कारण हिंदूंनी जर एकजूटीने भाजपाला मतदान केले तर मुस्लीम समाज एकगठ्ठा पाठीशी उभा राहूनही काँग्रेसच्या वाट्याला पराभवाशिवाय दुसरे काहीही येऊ शकत नाही हे राहुल गांधी यांना ठाऊक आहे. त्यामुळे ते कायम हिंदू एकजूट तोडता कशी येईल त्या दृष्टीने पावले उचलत असतात. अलिकडेच शरदचंद्र राष्ट्रवादी गटाचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले होते की राहुल गांधी वारीत सहभागी होणार. शरद पवारांनी वारीचे महत्व राहुलना पटवल्यामुळे त्यांनी वारीत येण्याचे मान्य केलेले आहे. बातमीची चर्चा बरीच झाली. वारकऱ्यांकडून नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या, परंतु राहुल काही वारीकडे फिरकले नाही. त्याचे कारण स्पष्ट आहे. त्यांना हिंदू धर्माचे आणि हिंदू धर्म श्रद्धांचे प्रचंड वावडे आहे. कोणी श्रद्धेने त्यांना विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली, तर ते लगेच ती हातावेगळी करतात. गळ्यात रुद्राक्षाची माळ टाकली तर एका सेकंदात काढून टाकतात. कारण हा परिवार हिंदूं नाही. त्यांच्या निष्ठा व्हॅटीकनच्या चरणी वाहिलेल्या आहेत. त्यामुळे राहुलना जात असण्याचे कारण नाही.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा नेमबाज धोनीला का मानतो आदर्श !
माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला
आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !
ढगफुटीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित; २०० यात्रेकरू अडकले
ही माहीती चुकीची असेल तर आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहेत. परंतु सोनिया गांधी यांनी जाहीर करावे आणि सिद्धही करावे की त्या हिंदू आहेत आणि त्यांची दोन्ही मुलं हिंदू आहेत. राहुल यांच्या धर्माबाबत, त्यांच्या जातीबाबत इतकंच काय, त्यांच्या नागरिकत्वाबाबत शंका आहेत. त्यांनी यूपीएच्या कार्यकाळात ब्रिटनचे नागरीकत्व स्वीकारले होते असे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. त्याबाबत चौकशीही सुरू आहे.त्यामुळे ज्यांच्या हिंदू असण्याबाबत साशंकता आहे, ते हिंदूंमधील जातींची गणना करण्याची मागणी कशी करू शकतात?
उद्या हिंदूविरोधी राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले असदुद्दीन ओवेसी आणि परवा फारुक अब्दुल्ला आणि मेहबूबा हिंदू धर्माच्या अंतर्गत बाबींबाबत उठाठेवी करतील. त्यामुळे काँग्रससारख्या पक्षाची सूत्र असलेल्या आणि संसंदेत विरोधी पक्षनेता म्हणून बसणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या व्यक्तिगत आस्थांबाबत जनतेच्या मनात असलेली संदिग्धता दूर करणे गरजेचे आहे. कारण विरोधी पक्ष नेते म्हणून ते जेव्हा हिंदूमधील जातीपातींचा विषय उपस्थित करतात. तेव्हा असा विषय उपस्थित करणारा हिंदू आहे की कॅथलिक हे जाणून घेण्याचा देशातील हिंदूंना अधिकार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)