वाघ म्हणवणारे डरकाळी फोडायला विसरले!

वाघ सध्या कुठल्या जंगलात हरवलाय कोण जाणे.

वाघ म्हणवणारे डरकाळी फोडायला विसरले!

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अटकेपर्यंत धडक देणाऱ्या मराठ्यांचा प्रांत म्हणजे महाराष्ट्र. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनाप्रमुखांच्या काळात शिवसेनेने हे पाणी दाखवलेले आहे. देशभरातील हिंदूंना शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत जे कुतुहल आणि ममत्व होते, त्याचे कारण हिंदुत्व. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंबाबत आवाज उठवणारे, अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचे सावट आल्यानंतर त्यांना दम देणारे बाळासाहेब हे
धर्माभिमानी हिंदूंचे कंठमणी होते. सध्या आमचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा करणारे दोन पक्ष महाराष्ट्रात आहेत. परंतु प.बंगालच्या मुर्शीदाबादेतून होणाऱ्या हिंदूंच्या पलायनाबाबत एकही नेता तोंड उघडायला तयार नाही.
शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडायला विसरल्याचे निराशाजनक चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.

देशात शिख, जाट, राजपूत या लढाऊ जमाती आहेत. परंतु देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पानिपतावर लढलेले मराठे एकमेव. हीच महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख मराठी साहित्यिकांनाही भुरळ पाडत राहिली आहे. पानिपताचे वर्णन करताना कवि गोविंदाग्रज म्हणतात, कौरव पांडव, संगर तांडव द्वापर काली होय अति तसे मराठे, गिलचे साचे कलिंत लढले पानपती… हा मराठी बाणा शिवसेनाप्रमुखांनी जपला. शिवसेनेसारख्या एका प्रादेशिक पक्षाचे नेते असतानाही ते राष्ट्रीय विषयांवर आपली भूमिका अगदी बेधडकपणे मांडत. मग तो प्रश्न काश्मीरचा असो वा रामजन्मभूमीचा किंवा पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा. त्यांचे नाव घेणारे तीन पक्ष महाराष्ट्रात काम करतायत. त्यात आम्हीच शिवसेना असे म्हणणाऱ्या दोन पक्षांचाही समावेश आहे. एका पक्षाला निवडणूक आयोगाने. नाव आणि चिन्ह दिले आहे. दुसऱ्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे म्हणतात की कोणी काहीही म्हणो, आम्ही शिवसेना आहोत. मनसेचे नेतेही शिवसेनाप्रमुखांचे नाव घेतात. परंतु या तिन्ही पक्षांचे नेते महाराष्ट्राच्या चौकटी पलिकडच्या मुद्द्यांवर बोलताना दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे यांची समस्या आपण समजू शकतो. काँग्रेसच्या तैनाती फौजेचा भाग झाल्यापासून त्यांची अडचण झाली आहे. बांगलादेशात जेव्हा हिंदूंचे शिरकाण सुरू होते. तेव्हा ते केंद्र सरकारकडे बोट दाखवून फिदीफिदी हसत होते. भाजपाच्या विरोधात राजकारण करताना त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा विचार बुडवण्याचे काम केले. त्यांचे एकवेळ समजू शकतो, परंतु आम्हीच खरी शिवसेना असा दावा करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तेवढ्या ताकदीने या मुद्द्यांवर बोलताना दिसत नाही. अशा भूमिका कडवटपणे मांडताना दिसत नाहीत.

प.बंगालच्या मुर्शीदाबादमधून हिंदू अन्य जिल्ह्यात किंवा परराज्यात पलायन करतायत. त्यांच्या मालमत्तांची जाळपोळ होते, त्यांच्यावर वरवंटा फिरतोय, परंतु शिवसेनेच्या वाघाची डरकाळी कुठे ऐकू येत नाही. देशाच्या संसदेत वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर प.बंगालमध्ये सरकार पुरस्कृत दंगा सुरू झाला. हिंदूंचे पलायन सुरू झाले. नव्वदच्या दशकात काश्मीरमधून झालेल्या हिंदूंच्या पलायनाची आठवण करून देणारी ही घटना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी काश्मीरी हिंदूंसाठी आवाज उठवला होता. एवढेच नाही तर महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर त्यांना काश्मिरी हिंदूंना राज्यात शैक्षणिक आरक्षण देऊ केले, हा दृष्टीकोन आज दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिसत नाही.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जेव्हा अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याची धमकी दिली तेव्हा महाराष्ट्रातून शिवसेनाप्रमुखांनी आवाज दिला. ‘अमरनाथ यात्रेला टार्गेट कराल तर महाराष्ट्रातून हजचे एकही जहाज जाऊ देणार नाही’. हे बोलण्याचे काळीज असलेला नेता आज शिवसेनेत नाही. एआयच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचा आवाज ऐकवण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर अशासाठी आली की शिवसेनाप्रमुखांसारखा दम देण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात नाही, आदित्य ठाकरे यांच्यात तर अजिबातच नाही. त्यांचा तर आवाजच फुटत नाही. काही महिन्यांपूर्वी मशिदीवरचे भोंगे उतरवण्याचा आवाज देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काही काळ हिंदु जननायक बनले होते. परंतु सध्या ती भगवी शाल उतरवून त्यांनी हिंदीच्या विरोधावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवलेले दिसते. त्यांचे शिलेदार संदीप देशपांडे हिंदीत बोलून हिंदीला विरोध करताना दिसतायत. हिंदू जननायक ना वक्फ कायद्यावर बोलत, ना मुर्शीदाबादवर.

हिंदी भाषकांचा महाराष्ट्रावर वरचष्मा नको, ठसा मराठीचाच हवा, या भूमिकेला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु ज्या प्रमाणात महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी चालली आहे, ते पाहाता उद्या मुंबई, पुण्यासारख्या
शहरांतील बाजारपेठांवर, फूटपथांवर बांगलादेशींचा कब्जा असेल असे चित्र दिसते आहे. अनेक ठिकाणी घुसखोरांनी फुटपाथ, बाजार इतकंच काय एपीएमसीचे बाजारही काबीज केले आहेत. ज्या वेगाने हे घडतेय ते पाहाता, त्यांचाच
एकाधिकार निर्माण होण्याचा दिवस फार लांब नाही. या विषयावर उद्धव ठाकरे बोलणार नाही. कारण सवाल त्यांच्या नव्या
मतपेढीचा आहे. नव मतदारांना दिलेल्या वचनांचा आहे. परंतु एकनाथ शिंदे, राज ठाकरे हे नेतेही यावर डरकाळी फोडताना दिसत नाही, तेव्हा प्रश्न पडतो की वाघ डरकाळी फोडायला विसरले की काय?

हे ही वाचा:

नालासोपाऱ्यात घुसखोर बांगलादेशीला अटक, आतापर्यंत ९ जण ताब्यात!

अमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार

तेलंगणातील काँग्रेस नेत्याने गमावले संतुलन; केंद्रीय मंत्र्याला दिल्या शिव्या!

भारतात डिझाईन केलेला एआय सर्व्हर ‘आदिपोली’!

एका प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असूनही राष्ट्रीय विषयांवर तळमळीने बोलणारा एकमेव नेता म्हणजे योगी आदित्यनाथ. प.बंगालमधील हिंदूंची परिस्थिती पाहून त्यालाच पाझर फुटला. दंगेखोरांचा इलाज दंडुक्यानेच करायला
हवा, अशी परखड भूमिका त्यांनी मांडलीच शिवाय ममता बॅनर्जी या दंगेखोरांबाबत गप्प बसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. प.बंगालमधल्या हिंदूंचा प्रश्न हा काय फक्त तिथला स्थानिक प्रश्न आहे का? जगावर जे हिरवट कट्टरतावादाचे सावट निर्माण झाले आहे, त्याचेच एक उपकथानक प.बंगालमध्ये घडताना दिसते आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये
हेच घडले होते ना? उद्या ते मुंबईत घडणार नाही, याची कोणी शाश्वती देऊ शकतो का?

कधी मराठी-गुजराती, कधी मराठी – उत्तर भारतीय हे तंटे भातुकलीच्या खेळातले आहेत. त्यातून हिंदूंच्या अस्तित्वाला धक्का बसणार नाही. मुस्लीम कट्टरतावादाबद्दल, बांगलादेशी-रोहिंग्यांबाबत असे म्हणता येईल का? मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगरात शिरलेल्या बांगलादेशी-रोहिंग्यांचे बस्तान महाराष्ट्रात पक्के झाल्यानंतर ते मराठीतून बोलणार आहेत का? योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर भाजपाचे सगळ्यात लोकप्रिय वक्ते आहेत. देशभरात जिथे निवडणुका असता तेव्हा योगींची प्रचारसभा आमच्याकडे झाली पाहीजे अशी मागणी असते. त्याचे कारण योगी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची भूमिका कधीही प्रादेशिक किंवा संकुचित नसते. ती अस्सल भारतीय आणि कडवट हिंदू नेत्याची असते, ते देशातील जनतेच्या मनातले बोलतात. योगींच्या व्यक्तिमत्वाचे जसे देशातील जनतेवर गारुड आहे, तशी किमया महाराष्ट्रातील एकाही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला करता येत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव. एकेकाळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हा इतकाच शिवसेनेच्या शाखा शाखांवर झळकणारा वाघ लोक प्रिय होता. हा वाघ सध्या कुठल्या जंगलात हरवलाय कोण जाणे. एकेकाळी घुमणारी त्याची डरकाळीही ऐकू येईनाशी झालेली आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचे दुर्दैव आहे, दुसरे काय.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version