काँग्रेसला सगळे काळे का दिसते? बुरी नजरवाल्यांचे तोंड काळे झाले…

सत्ता गमावलेल्या काँग्रेसची तडफड इतकी वाढली आहे की त्यांना भाजपाविरोध आणि देशविरोध याच्यातील सीमारेषाही कळेनाशी झाली आहे.

काँग्रेसला सगळे काळे का दिसते? बुरी नजरवाल्यांचे तोंड काळे झाले…

सत्ता गमावलेल्या काँग्रेसची तडफड इतकी वाढली आहे की त्यांना भाजपाविरोध आणि देशविरोध याच्यातील सीमारेषाही कळेनाशी झाली आहे. गेल्या वर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या भाकीताची खूप चर्चा झाली होती. २०२३ मध्ये भारताचा विकासदर कसाबसा ५ टक्के राहील असे भाकीत केले होते. प्रत्यक्षात राजन आणि त्यांचे मालक तोंडावर पडले आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत भारताने ७.८ टक्के विकासदर नोंदवला आहे. रघुराम राजन यांचे भाकीत म्हणजे काँग्रेस नेतृत्वाचे ‘विशफूल थिंकींग’ होते हे आता उघड झाले आहे.

पूर्वीचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञ होते, त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुमार आहेत, त्यांना अर्थव्यवस्थेबाबत काही कळत नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष २०१४ पासून करतो आहे. त्यामुळे सातत्याने काँग्रेस नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक धोरणांवर प्रहार करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काही विधाने पाहा. २०१७ मध्ये राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते. १२ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांनी अमरीकेच्या भूमीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तोफ डागली. ‘घाई गडबडीत आणलेला जीएसटी कर, नोटाबंदीसारखी धोकादायक धोरणे राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थकारणाचे प्रचंड नुकसान केले आहे.’

१२ नोव्हेंबर २०२० मध्ये राहुल गांधी यांनी ट्वीट केला.
‘प्रथमच भारत मंदीच्या जाळ्यात
मोदींनी बलस्थानांना मर्मस्थानांमध्ये बदलले’

२१ मे २०२२ राहुल गांधी लंडन दौऱ्यावर होते. तिथे एका मुलाखतीत भारतीय अर्थव्यवस्थेबाबत तुमचे मत काय? असा सवाल त्यांना विचारला तेव्हा ते सर्रास खोटं बोलले. गेली चार वर्षे, विशेष करून गेले वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेची जबरदस्त पिछेहाट सुरू आहे.

१६ मे २०२२ मध्ये तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना इशाराच दिला. ‘जुमलेबाजी बंद करा आणि तातडीने देशात आर्थिक सुधारणा राबवा.’

थोडक्यात काय देशात किंवा जगात भारतीय अर्थव्यवस्था डळमळते आहे, हे दाखवण्यासाठी राहुल गांधी यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. परंतु, राहुल गांधी यांच्या ज्ञानाची पातळी किती, त्यांना अर्थकारणाची कितपत समज आहे, हे देशाच्या जनतेलाही ठाऊक आहे आणि विदेशातील राज्यकर्त्यांनाही. हा ‘आलू से सोना बनानेवाला’ माणूस आहे, याची जगाला कल्पना आहे.

राहुल यांच्या काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज आणि हुशार नेते आहेत. परंतु, त्यांना पक्षात काय किंमत आहे हेही लोकांना माहिती आहे. काँग्रेसमध्ये किंमत फक्त बनावट गांधींना. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस पक्षाने आणखी एक खेळी खेळली. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्यासाठी भारतात आले. ते यात्रेत सहभागी झाले. त्यांनी राहुल गांधी यांच्याशी देशाच्या अर्थकारणाबाबत चर्चा केली आणि त्यानंतर एक विधान केले. ‘भारतासह जगाची अर्थव्यवस्था डळमळते आहे. भारताची निर्यातही कमी झालेली आहे. अशा परीस्थितीत पुढील आर्थिक वर्षात भारत कसाबसा पाच टक्के विकासदर गाठेल.’

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे जारी झालेले आहे. भारताचा विकास दर पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के राहिला आहे. रघुराम राजन तोंडावर पडलेले आहेत. त्यांच्या तोंडून काँग्रेसने त्यांना हवे ते वदवून घेतले होते हेच आता सिद्ध झाले आहे.

मोदी सत्तेवर आल्यापासून ते कसे प्रभावहीन आहेत हे दाखवण्यासाठी काँग्रेस जागतिक स्तरावर प्रयत्न करते आहे. राहुल गांधी यात सर्वात आघाडीवर आहेत. मेक इन इंडीया, डीजिटल इंडीया या मोदींच्या आर्थिक धोरणांची काँग्रेसने कायम खिल्ली उडवली.

‘मेक इन इंडीया होही नही सकता’, ही राहुल गांधी यांची ससंदेतील वाक्य आहेत. माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी देशात डिजिटल इंडीया शक्यच नाही असे ठणकावून सांगितले होते. ‘देशात इंटरनेटचे जाळे नाही. लोक डीजिटल पेमेंट करणार कसे?’ असा सवाल त्यांनी संसदेत विचारला होता. प्रत्यक्षात आज चित्र काय आहे, डीजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारताने चीनला मागे टाकले आहे.

जून २०२२ मध्ये देशात ८९.५ दशलक्ष डिजिटल पेमेंट्स झाली आणि आपण चीनला मागे टाकले. जर्मनीचे मंत्री वोल्कर विसिंग यांनी बंगळुरूमध्ये एका दुकानात भाजी विकत घेतली आणि यूपीआयच्या माध्यमातून मोबाईलवरून पैसे दिले. भारताच्या यूपीआय पेमेंट सिस्टीमसाठी फ्रांस, यूएई, श्रीलंकेसह जगातील अनेक देशांनी दरवाजे खुले केले आहेत.

आयफोन-१५ ची निर्मिती भारतात होते आहे. काल पर्यंत जे मोबाईल आपण चीन, तैवान आणि दक्षिण कोरियातून आयात करायचो ते आता भारतात बनतायत. भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झालेली आहे. माझगाव गोदीत अवघ्या १३ महिन्यात बांधून तयार झालेली फ्रिगेट श्रेणीतील ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ही युद्धनौका दोन दिवसांपूर्वी नौदलात सामील झाली. अशी अगणित उदाहरणे आहेत.

राहुल गांधी यांच्या थापा आणि अज्ञानाची लोकांना रोज नवी उदाहरणे मिळत आहेत. लोकांना राहुल गांधी यांच्यावर काडीचाही विश्वास नाही हे पीईडब्ल्यू रिसर्चच्या ताज्या सर्व्हेवरून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५५ टक्के जनतेने पसंती दिली आहे तर राहुल गांधी यांना फक्त २६ टक्के. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना मिळणारे यश केवळ नियोजन आणि कष्टाचे यश नाही. मोदींचे सरकार देशाला एका वेगळ्या नजरेने पाहते आहे. काँग्रेसचे नेतृत्व कायम हीनतेच्या भावनेने भारताकडे पाहात आले.

हे ही वाचा:

जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित

विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी

माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवायला हव्यात!

भारताच्या गौरवशाली परंपरेची कुचेष्ठा, भारतीयांना कमी लेखणे हे काँग्रेसचे नेहरुंपासूनचे धोरण आहे. १९६४ मध्ये अखेरच्या टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये पंतप्रधान नेहरु म्हणाले होते, ‘भारतीय जास्त खातात म्हणून भारतात अन्नधान्याची टंचाई आहे’. १९४९ मध्ये नेहरु म्हणाले होते, ‘भारतीयांच्या सवयीच अशा आहेत की विदेशातील लोक जेवढं काम करतात तेवढे आपण करत नाही.’ थोडक्यात काय तर आपलं नाणं खोटं ठरवण्याची काँग्रेसची परंपरा आहे. नेहरु भारतीयांना दोष द्यायचे, त्यांच्या वारसांनी ती परंपरा सुरू ठेवली. राहुल गांधी यांनी भारताच्या कोविड विरोधी लसीवर अविश्वास दाखवला होता. ‘मेक इन इंडीया’वर अविश्वास दाखवला होता. उलट मोदींनी देशाची आणि देशवासियांची क्षमता ओळखून त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे परीणाम आज आपल्या सगळ्यांना दिसतायत. मोदींचे नेतृत्व लखलखते आहे. काँग्रेसचे तोंड काळे झाले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version