अयोध्येत मंदिराची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. विविध माध्यमांचे प्रतिनिधी अयोध्येत जाऊन प्रेक्षकांना आँखो देखी… दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यापैकी एक असलेल्या एबीपी माझ्याच्या अँकर ज्ञानदा कदम या लाईव्ह करताना अचानक भावूक झाल्या. अनेक पावसाळे, उन्हाळे आपले आराध्य श्रीराम तंबूत राहिले, हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ज्यांना या भावभावनांची किंमत कळत नाही, असे अनेक दगड त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत. कारण दगडांना भावना नसतात, सुपारीबाज भाडखाऊंना तर अजिबातच नसतात.
२२ जानेवारी रोजी पुण्यभूमी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा होते आहे. एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात शतकानुशतकानंतर अथक प्रयत्नानंतर असे सोनेरी क्षण येतात. ज्यांना अयोध्येचा इतिहास माहिती नाही, हे मंदीर उभे करण्यासाठी किती संघर्ष झाले, किती जणांनी प्राणांचे बलिदान दिले त्याचा इतिहास माहिती नाही, त्यांना या अश्रूंचे मोल कळणार नाही. एखादा पूल, बोगदा, प्रकल्प आणि राम मंदिराच्या निर्मितीत नेमका काय फरक आहे, हे कळणे शक्य नाही.
फार दूर जाण्याची गरज नाही, १९९० साली स्वत:ची धर्मनिरपेक्ष प्रतिमा सिद्ध करण्यासाठी, मुस्लिमांचे मसीहा बनण्याच्या नादात समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता. त्यांचे मृतदेह शरयु नदीत फेकून दिले होते. शरयु कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली होती. ठिकठिकाणी तुरुंगात बंदिस्त असलेले कारसेवक बाहेर पडल्यावर जेव्हा अयोध्येत पोहोचले तेव्हा शरयुच्या पात्रांत कारसेवकांची पाण्यात फुगलेली कलेवरं पाहण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले.
पूर्ण पांढरी फटक पडलेली त्वचा, मध्ये एखाद्या ठिकाणी शरीराचा लचका तोडल्यामुळे दिसणारे लालसर रक्त, त्यावर भुणभुणणाऱ्या माशा, असे भयाण दृश्य होते. अशी अनेक घरे आहेत, जिथून कारसेवेला गेलेला कुणी मुलगा, भाऊ, वडीलधारा कधी परतलाच नाही. रडून रडून डोळ्यातले अश्रू सुकले, परंतु गेलेला माणूस परत आला नाही. समाज माध्यमांवर पोश्टी पाडून इतिहास घडत नाही, त्याच्यासाठी घाम गाळावा लागतो, वेळ पडल्यास रक्त सांडावे लागते.
ही फार दूरची गोष्ट नाही, फक्त ३३ वर्षांपूर्वीची घटना आहे. हा इतिहास सांगण्याचे कारण एवढेच की देश स्वतंत्र झाल्यानंतरही राम जन्मभूमी हिंदूंना कोणी सुखासुखी बहाल केलेली नाही. रामलला मुक्त करण्यासाठी हिंदूंनी रक्त आणि अश्रूंचे अर्ध्य दिले आहे. डावे, सेक्युलर, लिबरल, नमाजवादी नेत्यांनी इथेही नाट लावण्याचा ताकदीने प्रयत्न केला, हे पुनरुत्थान रोखण्यासाठी जंग जंग पछाडले, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. कारण जेव्हा आकाशात वीजांचा गडगडाट होतो, तेव्हा कोल्हेकुई ऐकू येत नाही.
ज्ञानदा कदम जे काही बोलल्या ते अजिबातच खोटे नाही. हिंदुस्थानचे आराध्य दैवत असेलेले श्रीराम कित्येक दशकं तंबूत किंवा एका अर्धवट टीचभर इमारतीच्या आश्रयाला होते. कोट्यवधी हिंदूंच्या हृदयात असलेला राम तंबूत होता, हे सांगताना एखाद्याच्या काळजाला वेदना झाल्या, तर ते मानवी स्वभावाला धरून आहे. किरकोळ नेत्यांच्या चरणदासांना या स्पंदनातील काव्य कळण्याची शक्यता नाही. हे प्रक्षेपण झाल्यानंतर सुपारीबाज कामाला लागले. काँग्रेसची सुपारी वाजवणारा पुण्यातला चौधरी नावाचा भामटा म्हणतो, धर्माच्या नावावर धंदा उघडणारे काही निगरगट्ट ज्ञानदा सारख्या इमोशनल लोकांना आपल्या बाजूला वळवतायत. कधी काळी हा संघकार्याची वारेमाप स्तुती करायचा, तिकीटासाठी हा भाजपाच्या दारावर उभा होता. परंतु तिकीट न मिळाल्यानंतर आलेला निराशेचा कोळसा उगाळण्याचे काम अलिकडे हा नित्यनियमाने करीत असतो.
देश बदलतो, इतिहासाच्या नव्या वळणावर उभा आहे. बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी अश्रू ढाळले. या घटनेची देशात खूप चर्चा झाली होती. दहशतवादी इशरत जहाँसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उर बडवत होते. अफजल गुरू, बुरहान वाणी सारख्या दहशतवाद्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या कित्येक लिब्रांडूंची नावे सांगता येतील. ही थेरं इतिहास जमा झाली आहेत. दहशतवाद्यांसाठी उर बडवणाऱ्यांना या देशाने त्यांची लायकी दाखवून दिली आहे. या जमातीची किंमत आता कवडी दमडीची सुद्धा राहीलेली नाही.
देशातील एक तरुण महिला पत्रकार राम मंदीरासाठी भावूक होते. एबीपी माझा हे काही हिंदुत्वाचे मुख्यपत्र नाही. तो ना तरुण भारत आहे, पांन्चजन्य नाही की ऑर्गनायझर नाही. कोणी राम नामाचा गरज केला की त्याच्यावर संघ-भाजपाचा शिक्का मारायचा असा प्रकार पुरोगामी भामट्यांनी सुरु केलेला आहे. अयोध्येच्या ज्या भूमीवर कारसेवकांनी बलिदान केले. कित्येक पिढ्यांनी संघर्ष केला. ती भूमी रामभक्तांच्या बलिदानाने पावन झालेली आहे. अशा भूमीवर ज्ञानदा यांचे भावूक ही घटना प्रातिनिधिक आहे. देशातील कोट्यवधी लोकांची भावना वेगळी नाही. आधी मूर्तिभंजकांशी आणि स्वातंत्र्यानंतर सेक्युलर फुरशांशी दोन हात केल्यानंतर कित्येक दशकांनी हा सोनेरी क्षण आलेला आहे.
हे ही वाचा:
कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!
ठाकरे गटाला २३ जागा मग आम्हाला काय? काँग्रेसचा सवाल!
इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!
आपला पोटशूळ काही कामी आला नाही, आपले कोलदांडे राममंदिराची निर्मिती रोखू शकले नाहीत, आपला काडीचाही सहभाग नसतानाही या देदिप्यमान इतिहासाची निर्मिती होते आहे, याची सल असलेले नेते आता पोटात मुरडा झाल्यासारखी ओरड करतात. मंदीर वही बनायेंगे, तारीख नही बताएंगे… या शब्दात संघ परिवाराची खिल्ली उडवणाऱ्यांची सध्या वाचा बंद झालेली आहे. भव्य मंदिराची निर्मिती झालेली आहे, तारीखही जाहीर झालेली आहे. म्हणून हे उरबडवे कामाला लागलेले आहेत.
राम मंदीर उभारून कोरोना जाणार आहे का? असा कुत्सित सवाल करणारे शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. मला सोहळ्याचे निमंत्रण नाही, असा गळा काढतायत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण नाही. रामायण काल्पनिक आहे, असा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नादाला लागून राजकीय कारकिर्दीची माती करून घेतली. अयोध्येत राममंदीर उभे राहते आहे, याबाबत यांना आनंद नाही. उलट लोकांना अयोध्येत बोलावून दंगली घडवतील, असे दंगलीचे डोहाळे लागल्यासारखी वक्तव्य हे महाशय करत होते.
ज्यांनी राममंदिराचा विरोध केला, ते सगळे नेते आज राजकीयदृष्ट्या भिकेला लागलेले दिसतात. अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करणारे मुल्ला मुलायम यांची अखेर कशी झाली. त्यांचा स्वत:चा मुलगा त्यांना विचारत नव्हता. अखेरच्या काळात पक्षातील दुफळी पाहून त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. सोनिया गांधी यांच्या पक्षाची काय स्थिती आहे. ५५ वय झालेल्या मुलाला लाँच करण्याचे प्रयत्न करणे आणि अपयशी होणे एवढाच उपक्रम त्यांच्या नशिबी उरला आहे. ही त्या प्रभू रामाची कृपा आहे. हा देश यापुढे रामविरोध्यांना थारा देणार नाही आणि सत्ता तर अजिबात देणार नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)