उद्धव ठाकरेंना दाऊद का आठवला?

उद्धव ठाकरेंना दाऊद का आठवला?

राज्यात गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका बाजूला सुरु असताना यावरून केले जाणारे राजकारण काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अस विधान केले की त्या विधानावरून हसावं कि रडावं काही समजत नाही, अशी अवस्था हे विधान ऐकणाऱ्यांच्या मनाची नक्की झाली असणार. मराठीत एक म्हण आहे ‘आत्याबाईला मिशा असत्या तर त्यांनाही काका म्हटलं असतं’ तशाच पद्धतीचे एक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आणि विशेष म्हणजे त्याच विधानाची पुनरावृत्ती किंवा ते विधान कसे बरोबर आहे हे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संजय राऊत बोलताना म्हणाले ललित पाटील हा जर शिवसेनेचा पदाधिकारी होता असे जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर महाराष्ट्रात झालेल्या बॉम्बस्फोटावेळी दाउद हा काय भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होता का? म्हणजे काय म्हणायचे आहे संजय राऊत यांना या विधानावरून हेच लक्षात येत नाही.

ललित पाटील याला जेव्हा डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली तेव्हा त्याची पोलीस कोठडी मिळूनसुद्धा चौकशी झाली नाही कारण लगेचच तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि तेव्हा तो शिवसेना पक्षाचा नाशिकचा पदाधिकारी होता, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काल सांगितले. त्यावर आज संजय राऊत बोलताना म्हणाले की, जर ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी होता, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा कुख्यात गुंड दाउद हा काय भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी होता का? यातून त्यांना काय सूचित करायचे आहे? भारतीय जनता पक्षाचा आणि दाउदचा काय संबंध? ज्याअर्थी देवेंद्र फडणवीस हे ललित पाटीलचा शिवसेनेशी संबंध आहे असे म्हणत आहेत तर त्याला काहीतरी आधार आहे तसा एक फोटो प्रसिद्धी माध्यमात आला आहे.

देवेंद्र फडणवीस आज राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्यांकडे येणारी किंवा त्यांना दिली जाणारी माहिती ही आधाराशिवाय नसते. ललित पाटील याला शिवसेनेत कोणी प्रवेश दिला किंवा तो कोणाच्या मध्यस्थीने आला, त्यावेळी तिथे कोण उपस्थित होते हे विषय वेगळे पण त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता हे तरी सत्य आहे ना? त्याला जेव्हा अटक झाली होती तेव्हा राज्यात सत्ता ही महाविकास आघाडीची होती. उद्धव ठाकरे हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस जे बोलत आहेत त्याला काहीतरी आधार आहे. आज जे संजय राऊत बोलले त्याला काय आधार आहे? ते संजय राऊत यांनी सांगायला हवे होते.

वस्तुतः या देशात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून देशात बॉम्बस्फोटासारख्या अतिरेकी कारवाया झालेल्या नाहीत. जम्मू आणि काश्मीर भागात ज्या अतिरेकी कारवाया झाल्या त्याला भारतीय सैन्य दलाने चोख उत्तर देत अतिरेक्यांचा खात्मा केला. सर्जिकल स्ट्राईक करून दहशवादी हल्ल्याची स्थळ उद्ध्वस्त करण्याचे काम केले. या नव्या बदलणाऱ्या भारताची ओळख आता जगभरात तयार झालेली आहे. भले भले आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नाहीत हे कोणीही मान्य करेल. दाउद आणि त्याच्या टोळीला या सरकारबद्दल इतकी भीती वाटत आहे कि गेल्या ९- १० वर्षांच्या काळात भारतात दहशतवादी कारवाया करण्याचे धाडस त्यांच्याकडून झालेला नाही. त्यामुळे दाउद आणि भारतीय जनता पक्ष असा संबंध जोडायचा का असे संजय राऊत याचं विधान म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर त्यांनाही काका म्हटले असते असे म्हणण्यासारखेच आहे.

हे ही वाचा.. 

इस्त्रायल- हमास युद्ध थांबविण्यासाठी हॉलीवूड कलाकर मैदानात

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

ललित पाटील याचा तपास जसा पुढे सरकत आहे तसे काही नावे समोर येत चालली आहेत. आज त्यातील एक शेख नामक संशयिताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याशी संबंधित एक एक जण आता सापडत आहे. हळूहळू आणखी नाव बाहेर येतील. ललित पाटील याला शिवसेनेत नक्की कोणी आणले? त्याच्या संपर्कात कोण कोण होते? हे सुद्धा नक्की बाहेर येईल. त्यात ललित पाटील जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तो असेही म्हणाला होता की त्याला पळवून लावण्यात आले आहे, तो पळून गेलेला नाही. तेव्हा या त्याच्या विधानाबद्द्लही त्याने पोलिसांना काही गोष्टी सांगितल्या असतील, त्याही बाहेर येतील. मुळात इतक्या भयंकर आणि गंभीर प्रकारच्या गुन्ह्यात राजकारण करण्यापेक्षा तपास कामात पोलिसांना जास्तीत जास्त माहिती देऊन त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्यात काय अर्थ आहे.

राजकारण करायला निवडणुका आहेत. ते राजकारणाचेच मैदान आहे आणि निवडणुकाही जवळ आल्याने घोडा मैदान लांब राहिलेले नाही. पण ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात राजकारण करणे योग्य नाही. अन्यथा लोकांची धारणा अशी होईल की महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली तरी त्या घटनेला राजकीय दृष्टीकोनातून पहिले जाते. लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होईल आणि हे सुदृढ लोकशाहीसाठी नक्कीच पोषक असणार नाही.

Exit mobile version