गुरूजी भिडे आणि जातवादी किडे

गुरूजी भिडे आणि जातवादी किडे

झोपडीत राहणारे, राज्यभरात एसटीने फिरणारे संभाजी भिडे गुरुजी यांच्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात इतकी जळजळ का? शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव संभाजी भिडे नसून मनोहर कुलकर्णी आहे, असा कांगावा केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता त्यांच्या शिक्षणाबाबत काहूर माजवतायत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस नेत्यांनी एवढा चिकित्सकपणा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी पूर्व इतिहासाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि राहुल गांधी यांच्या पात्रतेबाबत दाखवला असता काही वर्षांपूर्वी काँग्रेसला आणि देशाला दर्जेदार नेतृत्व मिळाले असते. देशाचेही भले झाले असते.

महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत भिडे गुरुजी यांनी केलेल्या काही विधानांवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते गेले काही दिवस करतायत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरीमध्ये अत्यंत किळसवाणा, बदनामीकारक आणि बिनबुडाचा लेख प्रसिद्ध करणारे आणि माफी न मागणारे काँग्रेसवाले संभाजी भिडे यांच्या विधानामुळे फार दुखावले गेले आहेत. भिडे गुरुजींकडून माफीची अपेक्षा करणारे, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी राहुल गांधींना माफी मागायला सांगणार आहेत का? त्यांच्यावर कारवाई करणार आहेत का?

काँग्रेस नेतृत्वासाठी गांधी, नेहरु आणि वाड्रा यांच्या शिवाय देशात कोणाही नेता आदरणीय नाही. म्हणूनच संभाजी भिडे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुजी म्हणतात, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांचा पोटशूळ तीव्र होतो. संभाजी भिडे यांना गुरुजी म्हणून तुम्ही त्यांचे महीमामंडन का करता? संभाजी भिडे फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का असा सवाल पृथ्वीराज चव्हाण करतायत.

मुळात चव्हाणांनी विचारलेला प्रश्न बाळबोध आहे. संभाजी भिडे हे पुणे विद्यापीठातून एमएसस्सी गोल्ड मेडलिस्ट आहेत, ते फर्ग्युसन आणि लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. हे भिडे गुरुजी कुठे सांगत फिरत नाहीत. त्यांच्याकडे शिकलेल्या, त्यांच्यासोबत शिकवणाऱ्या अनेक लोकांना ते माहीत आहे. पृथ्वीबाबांना याबाबत काही शंका असतील तर त्यांनी पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन आणि लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये चौकशी करावी. कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात पीएमओचे राज्यमंत्री राहीलेल्या एका नेत्यासाठी ही माहिती काढणे फार मोठी गोष्ट नाही.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार

गणेशोत्सवाची तयारी सुरू; एसटीकडून २ हजार २०० जादा गाड्या सोडणार

‘जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबाराची घटना बघून आली कसाबची आठवण’

इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

इतकं उच्च शिक्षण घेऊन झोपडीत राहणारा, पैसा कमावण्याच्या शर्यतीत सामील न झालेला, तरुणांना शिवछत्रपतींच्या इतिहासाचे वेड लावण्यासाठी आयुष्य वेचणारा, हा माणूस काँग्रेस नेत्यांना डी-कोड करता येत नाही. त्यांनी प्रयत्नही करू नये छत्रपती शिवरायांचा इतिहास शरीराच्या कणाकणात आणि रक्ताच्या थेंबाथेंबात भिनवून घेणारा हा माणूस समजणे काँग्रेसवाल्यांच्या कुवतीच्या पलिकडे आहे.

काँग्रेसचा संबंध इतिहासाशी कमी आणि इतिहासाच्या विकृतीकरणाशी जास्त आहे. संभाजी भिडे गुरुजींनी, त्यांच्या शिवप्रतिष्ठान या संस्थेने रायगडावर छत्रपती शिवरायांचे बत्तीस मणाचे सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संकल्प सोडला आहे. यूपीएची दहा वर्ष भ्रष्टाचाराच्या चिखलात लडबडलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना या संकल्पाबाबत प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कमिशन न घेता पैसे गोळा करता येतो, असा त्यांचा तरी अनुभव नाही.

म्हणूनच भिडे गुरुजी बहुजन समाजातील तरुणांकडून सोनं गोळा करतात, असा आरोप चव्हाण यांनी विधानसभेत केला. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असा हा प्रकार आहे. काँग्रेसच्या इतिहासाचा शस्त्रास्त्रांच्या दलालीशी जुना संबंध आहे. जीप, बोफोर्स तोफा, हेलिकॉप्टर अशी जंत्री सांगता येईल. देशाच्या सुरक्षेशी संबंधित खरेदीत सुद्धा झोल झपाटे करण्याची ज्यांची परंपरा आहे, त्यांनी खरं तर आजही एसटीतून राज्यभर झपाटल्यासारखा प्रवास करणाऱ्या भिडे गुरुजींबाबत तोंड उघडू नये. तेवढी त्यांची योग्यता नाही. रायगडावर सुवर्ण सिंहासनाची पुर्नप्रतिष्ठापना करण्यासाठी हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिहांसन पुनर्स्थापना न्यासाची स्थापना केली. एक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडीया या तीन बँकात या न्यासाची खाती उघडली आहेत. दहा जणाची समिती हा व्यवहार पाहते. गेली चार वर्ष फक्त चेक द्वारे लोकांनी हा संकल्प पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे. गेल्या चार वर्षात या खात्यातून एकही पैसा काढण्यात आलेला नाही. आणि हा व्यवहार पाहणाऱ्या दहाजणांमध्ये भिडे गुरुजींचे नाव नाही.

पृथ्वीराज चव्हाणांनी एक तर विधानसभेच्या पवित्र व्यासपीठावर माहिती न घेता बोलायला नको होते. गुरुजी तरुणांकडून सोनं गोळा करतात, अशी चुकीची माहिती देऊन त्यांनी स्वत:चे तोंड काळे केले आहे. त्यांनी सोने गोळा करण्याचा आरोप सिद्ध तरी करायला हवा किंवा भिडे गुरुजींची माफी मागायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील सुद्ध सभागृहात खोटं बोलले. महापुरुषांचा अवमान करणारे भिडे गुरुजी स्वत: मात्र सरकारी संरक्षणात फिरतात. त्यांच्या मागे पुढे गाड्या असतात, असे तद्दन खोटारडे विधान त्यांनी केले. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ याची पोलखोल केली. असे कोणतेही संरक्षण भिडे गुरुजींना देण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकच दु:ख आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करणारे गुरुजी हे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. या तरुणांमध्ये या माणसाने राष्ट्रवादाचा अंगार असा काही फुलवलाय की त्यांच्या डोक्यात जातीचा विखार पेटवून त्यांना ताब्यात घेणे दोन्ही काँग्रेसला शक्य होत नाही. तरुण निर्व्यसनी असल्यामुळे निवडणुकांच्या काळात दारुचे आमीष देऊन त्यांना आपल्या गोटात वळवताही येत नाही. त्यामुळे भिडे गुरुजींची बदनामी करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

हे प्रयत्न किती खालच्या पातळीचे आहेत, हे महाराष्ट्र पाहातो आहे. संभाजी भिडेंचे नाव मनोहर भिडे आहे, असा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केला. भिडे गुरुजींच्या आधार कार्डावर, मतदान ओळखपत्रावर, भीमा कोरेगाव प्रकरणात त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे नाव संभाजी भिडेच आहे. परंतु ब्राह्मण म्हटल्यावर ब्रिगेडी मानसिकतेच्या अनेक नेत्यांच्या पोटात मुरडा उठतो. एका ब्राह्मणाचे नाव संभाजी असूच शकत नाही, त्यांचे नाव मनोहर भिडे आहे, मनोहर कुलकर्णी आहे, असा दावा हे जातवादी नेते करीत असतात. एक गोष्ट निश्चित भिडे गुरुजी आणि त्यांच्या पाठीशी असलेले तरुणाईचे बळ या कांगावाखोरांना पुरुन उरेल. त्यांच्या नावाने कांगावा करणारे त्यांची बदनामी करणारे हे नेते शंभर वर्षांनंतर लोकांच्या लक्षातही नसतील. परंतु भिडे गुरुजींचे कार्य लक्षात राहील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version