लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा खासगी विदेश दौऱ्याचे कौतुक वाटते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला सहा महिन्यावर आलेल्या बिहार निवडणुकांच्या तयारीपेक्षा विदेशात वेळ घालवणे अधिक महत्वाचे वाटते.
हे सगळे अकल्पनीय आहे. देशात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असताना, त्यांच्याकडे पाठ फिरवून काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक गायब का होतात? याचे अनेकांना कोडे आहे. गेल्या तीन महीन्यात राहूल गांधी दुसऱ्यांदा
व्हीएतनामला गेलेले आहेत.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ४ एप्रिल रोजी या अधिवेशनाची सांगता होणार आहे. अनेक महत्वाच्या विधेयकावर चर्चा होते आहे. परंतु राहुल गांधी त्यापूर्वीच व्हीएतनामला रवाना झाले आहेत. ही व्हीएतनाम भेट खासगी
असल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तिला देश-विदेशात कुठेही जायचे असेल तर त्याचे नियोजन बरेच आधी केले जाते. विमानाचे, हॉटेलचे आरक्षण करावे लागते. कुठे, कसे जायचे, ते आगाऊ ठरवायचे असते. राहुल गांधी यांचा दौरा पूर्वनियोजित असेल तर या काळात संसदेचे अधिवेशन आहे, हा मुद्दा लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या
राहुल गांधी यांनी लक्षात घेतला नाही, हे निव्वळ आश्चर्यकारक आहे.
काँग्रेस पक्ष मुस्लीमांचा रक्षणकर्ता म्हणून कायम मिरवत असतो. काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले ९९ खासदार हे मुस्लीम मतदारांच्या कृपेमुळेच आलेले आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केलेला आहे. ही भूमिका योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय असू शकतो. परंतु तुम्ही एखाद्या विषयासाठी लढण्याचा दावा करता आणि हा विषय जेव्हा संसदेत असतो तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून लढायचे सोडून तुम्ही पळ काढता हा विषय अनेकांसाठी कळण्यापलिकडचा आहे.
राहुल गांधी यांच्या बेभरवशी नेतृत्वाबाबत चिंतन आणि चिंता करायचे सोडून काँग्रेस पक्ष त्यांचे समर्थन करताना दिसतो आहे. ‘भाजपाच्या शासनकाळात संसद अर्थहीन बनली आहे, त्यामुळे संसदेत असले काय, नसले काय?’ असा
सवाल काँग्रेसचे फाजील प्रवक्ते विचारतायत. ही तिच मंडळी आहेत, जी देशाच्या संसदेत कायम संविधानाची प्रत नाचवत असतात. त्याच संविधानाची निर्मिती असलेली संसद त्यांना अर्थहीन वाटते आहे. राहुल गांधी यांची भेट आगाऊ ठरलेली नसेल तर निश्चितपणे ती ऐन वेळी आलेल्या एखाद्या कामासाठी असणार? असे कोणते काम आहे, जे लोकसभेच्या
विरोधी पक्षनेत्याला संसदेच्या अधिवेशनापेक्षा जास्त महत्वाचे वाटते?
हे ही वाचा:
वक्फ बोर्डची संपत्ती मुस्लिमांच्या पूर्वजांची
गोरेगावात मोलकरणीवर लैंगिक अत्याचार करून मालक फरार
औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण कदापि होऊ देणार नाही!
उदयपूर: अरविंद सिंह मेवाड यांचे दीर्घ आजाराने निधन
नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत. भाजपासह सगळे पक्ष कामाला लागले आहेत. त्या काळात राहुल गांधी व्हीएतनामला जाऊन बसले आहेत. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत इतकी गोपनीयता का पाळण्यात येते? संसदेच्या दोन्ही सदनापैकी कोणत्याही सदनाचा सदस्य असलेल्या व्यक्तिला परदेश दौऱ्यावर जाताना लोकसभेच्या अध्यक्षाला किंवा राज्यसभेच्या सभापतींना, तसेच परराष्ट्र मंत्रालयाला कळवावे लागते की हा दौरा कोणत्या देशात आहे, त्या
दौऱ्याचे कारण काय, तो किती काळासाठी असेल. परराष्ट्र मंत्रालयाला कळवणे यासाठी आवश्यक असते की ज्या देशात एखादा खासदार जातोय, त्या देशाशी भारताचे संबंध नेमके कसे आहेत, याबाबत त्याला परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाते. जेणे करून तिथे जाऊन त्याने असे एखादे विधान करू नये, ज्यामुळे दोन देशांच्या संबंधांमध्ये बाधा निर्माण होऊ शकेल.
राहुल गांधी या प्रथेचे कधीही पालन करीत नाहीत. कदाचित ते विदेशात कशासाठी जातायत, हे सांगणे त्यांच्यासाठी सोयीचे नसावे. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत कायम प्रचंड गोपनीयता पाळली जाते. ती यावेळीही पाळण्यात येत आहे. विदेशातील त्यांचा एकही कार्यक्रम उघड झालेला नाही, त्याचा फोटोही बाहेर आलेला नाही. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता. तेव्हाही अचानक राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी व्हीएतनाममध्ये गेले होते. अवघ्या तीन महिन्यात ते पुन्हा तिथे जातात याबाबत संशय निर्माण होणे
स्वाभाविक आहे.
भाजपाने राहुल गांधी यांच्या ताज्या व्हीएतनाम भेटीवरून त्यांच्यावर शरसंधान केले आहे. या भेटीबाबत संशय व्यक्त केला आहे. हा संशय फक्त भाजपाला आहे, असे नाही. डॉ.मनमोहन सिंह यांच्या मृत्यूनंतर जाहीर झालेल्या शासकीय दुखवट्याच्या काळात राहुल गांधी जेव्हा व्हीएतनामला गेले होते, तेव्हा दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा यांनीही सवाल उपस्थित केला होता.
पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राहुल गांधी विदेशात जातात, त्याकाळात त्यांची भूमिका देशावर टीका करण्याची आणि चीन सारख्या शत्रूराष्ट्राची भलामण करण्याची असते. त्यांच्या गाठीभेटीही अशा लोकांसोबत असतात जे कायम भारताचा दुस्वास करीत असतात. भारताच्या विरोधात कारवाया करणारे असतात. जे जाहीर गाठीभेटीमध्ये होते ते संशयास्पद असल्यामुळे जेव्हा या भेटी गोपनीय असतात, तेव्हा स्वाभाविकपणे त्या अधिक संशयास्पद बनतात. राहुल गांधी यांच्या व्हीएतनाम दौऱ्याचे काही जॉर्ज सोरोस कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. म्हणजे सुनीता विश्वनाथन, मुश्फीकूल फजल, इल्हान ओमर, सलील शेट्टी, यांच्यासारखे जे लोक त्यांना अमेरिकेत, ब्रिटनमध्ये जाहीरपणे भेटले होते, अशीच मंडळी त्यांना व्हीएतनाममध्ये गोपनीयरित्या भेटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राहुल गांधी यांना भारतात सत्तांतर हवे आहे. लोकशाही पद्धतीने हे सत्तांतर करण्याची काँग्रेसची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही संपलेली आहे. म्हणूनच त्यासाठी राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यादरम्यान जाहीरपणे जागतिक महासत्तांना साद घातली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील राज्यारोहणानंतर बदललेल्या भूराजकीय परिस्थितीत हे उघडपणे शक्य नाही, त्यामुळे तशीच काही मागणी करण्यासाठी गोपनीयता पाळून राहुल गांधी व्हीएतनाममध्ये गाठीभेटी घेत असतील अशी शक्यता जर कोणाला वाटत असली तर त्यात कोणाला आश्चर्य वाटणार नाही. राहुल गांधी त्यांच्या विदेश दौऱ्यात भारताच्या शत्रूंना भेटले की भेटले नाहीत, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. फक्त कयास आहेत. परंतु एक गोष्ट मात्र
निश्चित वयाच्या ५५ व्या वर्षी राहुल गांधी हे मॅच्यूअऱ झाले म्हणून काँग्रेसवाले पेढे वाटत असले तरी त्यात तथ्य दिसत नाही.
एका बाजूला देशातील लोकशाही बळकट करण्याची भाषा करायची आणि त्या लोकशाहीचा सगळ्यात मजबूत स्तंभ असलेल्या संसदेच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवायची असा प्रकार राहुल गांधी वारंवार करतायत. देश पातळीवर एखाद्या पक्षाच्या नेत्याचे एकेक मिनिट महत्वाचे असते. पक्षाचे कार्यक्रम असतात, संघटनेची बांधणी असते, विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अभ्यास करायचा असतो, रणनीती ठरवायची असते. परंतु हे सगळे बाजूला ठेवून एखादा नेता २२ दिवस जानेवारी महिन्यात व्हीएतनामला जातो, पुन्हा तीन महिन्यात व्हीएतनामला जातो, एवढा मोकळा वेळ त्यांना
कसा मिळतो?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)