ब्राह्मणांना हव्या कशाला ३० जागा? मुख्यमंत्रीपद घ्या की!

ब्राह्मण समाजामध्ये श्रीमंत बाजीराव निर्माण व्हायला हवेत

ब्राह्मणांना हव्या कशाला ३० जागा? मुख्यमंत्रीपद घ्या की!

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार आणि विद्यमान आमदारांनी आपले जनसंपर्क अभियान जोरात सुरू केलेले आहे. निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांनी महायुतीकडे ३० जागांची मागणी केलेली आहे, अर्थातच ब्राह्मण उमेदवारांसाठी. ब्राह्मण समाज अशा भानगडीत फार पडत नाही. जिथे संधी मिळेल तिथे त्यांनी झेंडे गाडले, संधी मिळत नसतील तर त्या निर्माण केल्या.
राजकारणाचे मैदान सुद्धा याला अपवाद नाही. राजकारणात लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार प्रतिनिधीत्व मागणे गैर नाही. परंतु मागून काहीच मिळत नाही हा एक मुद्दा आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळ निघून गेल्यावर ही मागणी आलेली आहे.

महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. अनेकांना घरदार सोडून पळ काढावा लागला. अलिकडे ज्याची बरीच चर्चा होते ते मॉब लिंचिंगचे प्रकारही घडले. त्याबाबत आजवर तरी कुणाला फार चर्चा करावीशी वाटली नाही. गेल्या काही दशकांत खाणावळींपासून हॉटेलपर्यंत आणि अभिनयापासून आयटीपर्यंत सगळ्या क्षेत्रात
ब्राह्मणांनी आपला ठसा निर्माण केला.

महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडची स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मण विरोधाचा अजेंडा जोरात राबवण्यात आला. ब्राह्मणांना लक्ष्य करण्यात आले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक जण ऊत आल्यासारखे ब्राह्मणांच्या विरोधात बोलू लागले. छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी, आदीलशाहीशी लढले नसून त्यांचा संघर्ष ब्राह्मणांशीच होता, अशा प्रकारे इतिहासाची मांडणी कऱण्याचा प्रयत्न झाला. औरंगजेबापेक्षा अनाजीपंत याला मोठा खलनायक बनवण्यात आले. आज मराठा आंदोलनाच्या आडून काही जण ब्राह्मण द्वेषाचा कंड भागवण्याचे काम करतायत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणाऱ्या अनेकजणांना त्यांची जात हा सगळ्यात मोठा दोष वाटतो.

या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांना जात म्हणून एकत्र येणे गरजेचे वाटणे स्वाभाविक होते. ही आजूबाजूला जे काही घडते आहे, त्याची प्रतिक्रीया होती. जिथे जमेल तिथे राजकीय ताकद दाखवली पाहिजे ही अनेक ब्राह्मण तरुणांची मानसिकता आहे. कसब्याच्या पोट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराची विकेट काढून ब्राह्मण समाजाने आपले उपद्रव मूल्यही सिद्ध केले,
आम्हाला गृहीत धरू नका, असा इशाराही दिला. हा सगळा घटनाक्रम डोळ्या समोर असूनही महाराष्ट्रात ३० जागा मागण्याच्या सकल ब्राह्मण संघाच्या मागणीचे समर्थन करता येत नाही. त्याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, ही मागणी म्हणजे उशीरा आलेली जाग आहे.

महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. उमेदवारांची संभाव्य यादी तयार आहे. ज्यांना विधानसभेची निवडणूक दोन महिन्याच्या आधी ठरवून लढता येत नाहीत. त्यासाठी आधी किमान तीन वर्षे मतदार संघ बांधावा लागतो. तिथे मेहनत घ्यावी लागते. विधानसभेचे तिकीट मागून मिळत नाही, तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागले. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचा टक्का सुमारे १० च्या आसपास आहे. त्यात अन्य राज्यातून आलेल्या अमराठी ब्राह्मणांचाही समावेश आहे. आम्ही लोकसंख्येच्या १० टक्के आहोत म्हणून आम्हाला जागा एकूण जागांच्या ३० टक्के वाटा मिळायला हवा असा तर्क या ३० च्या
आकड्याच्या मागे आहे.

हे ही वाचा:

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

टाटा ट्रस्टची धुरा आता नोएल टाटांकडे

असा कोणताही फॉर्म्युला नसताना देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. पाच वर्षे त्यांनी राज्याची सूत्रे यशस्वीपणे सांभाळली. ३० नाही १२२ आमदार आणि संपूर्ण पक्ष तेव्हाही फडणवीसांच्या मागे उभा होता, आजही आहे. त्यामुळे नेतृत्व आकडेवारीच्या आधारावर मिळत नाही क्षमतेच्या आधारावरच मिळते. ब्राह्मण समाजासमोर ३० आमदार की ब्राह्मण मुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवला तर ब्राह्मण समाज कोणता प्रस्ताव स्वीकारेल ? अर्थातच मुख्यमंत्री पदाचा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापणे ही चूक केली याची जाणीव झाल्यानंतर पक्षाने त्यांचे राज्यसभेत पुनर्वसन केले. याचा अर्थ समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे याची जाणीव भाजपा नेतृत्वाला आहे. लोकशाहीत संख्या बळाला पर्याय नाही. परंतु बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाला कुठेच पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्यात रुपांतरीत करणारे श्रीमंत बाजीराव पेशवे हे कुणाच्या कृपेमुळे किंवा ब्राह्मणांच्या संख्याबळाच्या आधारावर मिळाले नाही.

संख्या ही ब्राह्मणांची ताकद कधीच नव्हती. त्यांचे बलस्थान, बुद्धिमत्ता आणि नीतिमत्ता हेच होते. गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे मराठा आरक्षणाच्या संदर्भात अलिकडेच एक वक्तव्य केले. आरक्षण कसले मागता, मराठ्यांनी देशाचा गाडा चालवला पाहिजे. भिडे गुरुजींचे हे मार्गदर्शन ब्राह्मणांनाही तंतोतत लागू आहे. ब्राह्मण समाजामध्ये श्रीमंत बाजीराव निर्माण व्हायला हवेत. देशाला अखंडतेच्या सूत्रांत बांधणारे आचार्य चाणक्य, तरुणांना बलोपासनेची प्रेरणा देणारे समर्थ रामदास, देशाला संघटनेचा महामंत्र देणारे डॉ.केशव बळीराम हेडगेवार निर्माण व्हायला हवेत. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा हीच ब्रह्मवृदांची प्रेरणा असायला हवी. ३० जागा हा फारच किरकोळ विषय आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version