29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
घरसंपादकीयभाजपाचा ‘शक्तिमान’

भाजपाचा ‘शक्तिमान’

चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाला विजयाकडे नेण्याची क्षमता आहे. अर्थात हा विजय विरोधकांचा आहे.

Google News Follow

Related

सुमार क्षमता आणि मर्यादित बकूब असलेले लोक जेव्हा संघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये महत्वाच्या पदावर असतात तेव्हा नेमकं काय होते त्याचा अनुभव सध्या भाजपाचा कार्यकर्ता घेतो आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना नोटीस पाठवण्यावरून सुरू झालेले रण शमते न शमते तोच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे विधीमंडळ अधिवेशना दरम्यान, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंड गोड करायला गेले. उद्धव ठाकरेसह शिवसेना उबाठाच्या आमदारांना त्यांनी चॉकलेट दिले. उद्धव ठाकरेंनीही त्यांना मविआच्या लोकसभेतील ३१ जागांवरील विजयाबद्दल दादांना पेढा दिला, त्यातला अर्धा पेढा देऊन त्यांनी आमदार अनिल परब यांचे पदवीधर मतदार संघातील विजयाबद्दल आगाऊ अभिनंदन केले. निकाल जाहीर व्हायची वाट पाहण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. या घटनेचा अर्थ स्पष्ट आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा काही एका दिवसात झालेला नाही. चंद्रकांत दादा यांच्यासारख्या लोकांनी त्याची पायाभरणी करण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले आहेत.

मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपाचे किरण शेलार यांनी निवडणूक लढवली. अनेक वर्षे त्यांनी तरुण भारत या दैनिकाची जबाबदारी सांभाळली. पदवीधर मतदार संघासाठी त्यांनी बरीच मेहनत सुद्धा घेतली होती. परबांच्या विजयाचे अभिनंदन करणाऱ्या दादांना शेलार यांच्या कष्टाची, त्यांच्यासाठी घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांची पर्वा करण्याची गरज वाटली नाही. कारण कार्यकर्ता म्हणजे काय चीज असते? ते तर सतरंज्या उचलण्यासाठीच असतात. महत्त्व दादांसारख्या कर्तृत्ववान नेत्यांचे असते. ते हे सुद्धा विसरले की २०१४ मध्ये ते पुणे पदवीधरमधून आमदार झाले होते. त्यांचे कर्त्तृत्व महाराष्ट्र गेली काही वर्ष पाहतो आहे. त्यात सातत्य आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात म्हणे त्यांनी उद्धव ठाकरे आणि उबाठाच्या आमदारांचे स्वागत केले. भाजपाने ही नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याची कुठेही चर्चा नाही. असे कुठे छापूनही आलेले नाही. तरीही त्यांनी स्वागत केले. सर्वांना चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड केले. भाजपाचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या दणदणीत पराभवाचे असे सेलिब्रेशन कुणीच केले नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्येक सभेत औंरगजेब असा उल्लेख केल्यामुळे दादांच्या आनंदाला इतके भरते आले, हेही यानिमित्ताने उघड झाले. ठाकरेंनीही दादां मविआच्या विजयाचा म्हणजे महायुतीच्या पराभवाचा पेढा भरवला. भाजपाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आलेली निराशा एका क्षणात झटकली जाईल असे हे चित्र. काहीच अंगाला लावून घ्यायचे नाही, पक्षाचा पराभव झाला, पक्ष खड्ड्यात गेला तरी चॉकलेट वाटत फिरायचे.

दादांच्या या वर्तणुकीला काही लोक लोचटपणा, लाळघोटेपणा म्हणू शकतील. परंतु ते काही खरे नाही. हे चॉकलेट वाटप पहिल्यांदा झालेले असले तरी साखरपेरणी मात्र त्यांनी अनेकदा केलेली आहे. शरद पवारांचे मन मोठे आहे, असे कौतुकही त्यांनी अनेक वळा केलेले आहे. बरं इतकं कौतुक करून विरोधक किंमत करत नाहीत, ही आमची खंत आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांना चंपा म्हणाली. त्याचा कोणी निषेध केला नाही, याचा आम्हाला राग आला. परंतु विरोधकांनी असे प्रेम अनेकदा व्यक्त केलेले आहे. संजय राऊतही त्यांना चंपा म्हणाले आहेत. शरद पवारांचे कौतुक केल्यानंतर पवारांनीही त्यांची परतफेड केलेली आहे. ‘चंद्रकांत पाटील हे भाजपाचे शक्तिमान आहेत, ते आपल्या जिल्ह्यातून निवडणूनही येऊ शकत नाहीत.’

हे ही वाचा:

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

२००९ मध्ये उद्घाटन केलेल्या टर्मिनल- १ च्या छताचा भाग कोसळल्याची नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती; काँग्रेसची बोलती केली बंद

नवीन संसद भवन आणि आता सेंगोल

दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून एकाचा मृत्यू

विरोधकांनाही चंद्रकांत दादांचे कौतुक करीत असतात. दादांची बुद्धी अत्यंत तल्लख. कोल्हापूरातून निवडून येऊ शकत नाही, हे त्यांनी ताडले आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आधी कोथरुडमध्ये उडी मारली. प्रदेशाध्यक्षांनी संघटन बांधणे अपेक्षित असते, परंतु सगळे मोदींच्या नावावर जिंकून येत असल्यामुळे संघटन वैगेरे किरकोळ गोष्टींकडे लक्ष कशाला द्या? प्रदेशाध्यक्ष मजबूत तर प्रदेश मजबूत असा विचार करत, त्यांनी आधी कोथरुडचा मतदार संघ ताब्यात घेतला. आता कोथरुडच का ? कारण हा कसलेला, मशागत केलेला मतदार संघ आहे. तिथे दगड उभा केला तरी जिंकेल अशी परिस्थिती होती. त्यामुळे दादा तिथे उभे राहीले. तिथल्या सक्रीय, सक्षम आणि लोकप्रिय विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा केसाने गळा कापला. त्यांना बाजूला केले. कोथरुडमध्ये दादांनी गाजवलेल्या कर्त्तृत्वामुळे पुढे भाजपाला कसबा लोकसभा गमवावी लागली.

दादांच्या कर्तृत्वाची गाथा इथे संपत नाही. नको तिथे, नको ते बोलणे हा त्यांचा पिंड. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत जाऊन त्यांनी विधान केले, आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे. दादांनी दुसऱ्या दादांना असे काही खड्ड्यात घातले की त्यांना यांची जाहीर खरडपट्टी काढावी लागली. बरं शरद पवार बोलोत, अजित पवार बोलोत, परंतु दादांचा उदारपणा काही कमी होत नाही. जिथे तिथे जाऊन ते वाकत असतात. भाजपामध्ये दमदार मराठा नेतृत्व नाही, त्यामुळे चंद्रकांत दादांना किंमत. मराठा नेते म्हणून ते मिरवतात. परंतु मराठा आरक्षणामुळे भाजपा बॅक फूटला असताना त्यांनी भाजपाला त्यांच्या नेतृत्वगुणांचा काही फायदा झाला, असे चित्र कधी दिसले नाही. तरीही दादा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होतात, मंत्री होतात.

पुण्यातील एका कार्यक्रमात शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील काही काळ फेसशिल्ड घालून फिरत होते. असा आचरटपणा करणारा हा महाराष्ट्रातला नाही तर देशातला एकमेव नेता असावा. दादांना आपल्या चेहऱ्याची फार काळजी असते, पक्षाचे तोंड काळे झाले तरी चालेल. भाजपात अशा लोकांचा बोलबाला आहे. शरद पवारांनी ज्यांची शक्तिमान नेता अशी खिल्ली उडवली. त्यांच्याकडे भाजपाला विजयाकडे नेण्याची क्षमता आहे. अर्थात हा विजय विरोधकांचा आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही दादांना चॉकलेट वाटण्याची संधी द्यायची नसेल तर यांची कोल्हापुरात परत पाठवणी करणे एवढाच उपाय आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा