पक्ष वाढवण्यासाठी बाहेरची कुमक घेणे सगळ्याच पक्षांसाठी अपरिहार्य झालेले आहे. परंतु पक्षात आलेले बाटगे जेव्हा कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवू लागतात. तेव्हा एकतर त्या पक्षाचा कडेलोट झालेला असतो, किंवा येत्या काळात होणार हे निश्चित असते. भास्कर जाधव हे उबाठा शिवसेनेतील चर्चेतले व्यक्तिमत्व. पक्षाची काँग्रेस होत चालली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोकणात दशावतार प्रसिद्ध आहे. का कोण जाणे जाधव यांना ऐकताना कायम दशावतारी नाट्यातील
शंखासुराची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
पक्षात १० ते १५ वर्ष पदाधिकारीही मस्तपैकी एकाच पदावर आहेत. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणार्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं, आपल्या पक्षाची काँग्रेस होत चालली आहे. हे भास्कर जाधवांचे विधान आहे. परंतु काँग्रेस होत चालली आहे हा भास्कर जाधवांसाठी खंत करण्याचा विषय कधीपासून झाला हे काही कळायला मार्ग नाही. कालपर्यंत याच काँग्रेसच्या नेत्यांचे चरणामृत प्राशन करणे हा उबाठा शिवसेनेसाठी अभिमानाचा विषय होता. पक्षाचे मुखपत्र राहुल गांधी यांचे कौतुक करून करून थकत नव्हते. आपल्याला ज्यांचे कौतुक आहे, त्यांच्यासारखे आपण होत असू तर त्यात खंतावण्यासारखे काय आहे? भास्कर जाधवांचे हे वक्तव्य म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, अशा प्रकारचे आहे.
कधी काळी भास्कर जाधव हे कट्टर शिवसैनिक होते. १९९५ ते २००४ ते शिवसेनेच्या तिकिटावर जिंकून आले. २००४ मध्ये त्यांचे तिकीट कापले गेले. दाद मागण्यासाठी ते मातोश्रीवर गेले तेव्हा त्यांना हाकलून लावण्यात आले. याच दरम्यान भास्कर जाधवांनी तत्कालिन जिल्हाप्रमुख राजन साळवी, उदय शेट्टे या शिवसैनिकाला रात्रभर कोंडून ठेवले होते. ही बातमी मातोश्रीवर गेल्यानंतर जाधवांना नारायण राणे, उद्धव ठाकरे फोन करून साळवींना सोडा असे सांगत होते. मातोश्रीतून हाकलल्यानंतर भास्कर जाधवांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगली. ते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले. त्यांचा माज उतरवण्यासाठी मातोश्रीवरून प्रभाकर शिंदे यांची रवानगी चिपळुणात करण्यात आली. शिंदे यांनी भास्कर जाधव यांना पाडण्याचे काम व्यवस्थित पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कदम यांचा या निवडणुकीत विजय झाला. बराच काळ शांत बसल्यानंतर भास्कर जाधव राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना फळली. मंत्रीपदाचा लाल दिवा त्यांना मिळाला. परंतु इथेही धुसफूस सुरू झाल्यामुळे २०१९ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत परतले.
सांगण्याचा मुद्दा काय तर ज्या पक्षाने दोन वेळा आमदारकीची संधी दिली, त्या पक्षाच्या विरोधात षड्डू ठोकण्याचा भास्कर जाधव यांचा इतिहास आहे. ते उबाठा शिवसेनेत उरल्यासुरल्या शिवसैनिकांना सांगतायत की, आपल्या पक्षाची काँग्रेस झाली आहे. बरं काँग्रेस झाली तर त्यात जाधवांना खटकणारे काय आहे? २००४ ते २०२९ अशी तब्बल १५ वर्षे ते काँग्रेसची संस्कृती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुखाने नांदले. मंत्रिपदाचा व्यवस्थित उपभोग घेतला. त्यामुळे आपल्या पक्षाची
काँग्रेस होते आहे, त्यात त्यांना खंत बाळगण्याचे कारण काय?
हे ही वाचा:
खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार
आरएसएस ही काँग्रेसपेक्षा खूप सहिष्णू !
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!
२०१९ मध्ये भास्कर जाधव शिवसेनेत परतले असले तरी त्यांचा अवघा पक्ष काँग्रेसच्या छत्रछायेखाली होता. त्यांच्या पोस्टर बॅनरवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो लावून त्यांनी २०२४ च्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यांचे पक्षप्रमुख काँग्रेसला पूर्ण शरण होते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना प्रमाणपत्र दिले होते की, त्यांचे विचार आमच्यासारखेच आहेत. शरद पवारांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत, ठाकरेंच्या पक्षाचे विचार पवारांसारखे म्हणजे काँग्रेससारखेच असणार. मग पक्षाची काँग्रेस होत असेल तर भास्कर जाधव यांनी सेलिब्रेशन करण्याची गरज आहे. उगाच खंतावण्याचे कारण काय?
आज जवळ जवळ सगळ्यात पक्षांची ही अवस्था आहे, निवडणुकीत तिकीट मिळण्याची जोपर्यंत हमी आहे, तो पर्यत निष्ठा कायम असतात. तिकीट कापले तर निष्ठा पिकलेल्या फळासारखी गळून पडते. राजकारणी आणि फळांमध्ये फरक एवढाच आहे, की नेते मूळ पक्षाला जाऊन पुन्हा चिकटू शकतात. भास्कर जाधवांनी तेच केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांशी जमेनासे झाल्यावर त्यांनी पुन्हा शिवसेनेत उडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरेंसोबत हाणामारी सुरू होती, ती इथे आल्यावर अनंत गीतेंसोबत सुरू राहिली. अपूनीच भगवान है… ही भास्कररावांची मानसिकता आहे.
पक्ष कोणताही असो. आपले राजकीय हित जपण्यासाठी नेत्यांनी पक्ष जरुर बदलावेत. त्यांच्याकडे मेहनत करण्याची क्षमता
असेल, लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशी क्षमता असेल तर कोणत्याही पक्षात ते रुजू शकतात. भाजपामध्येही असे नेते आहेत, जे दुसऱ्या पक्षातून आले आहेत. परंतु जेव्हा तुम्ही इथून तिथे उडी मारता तेव्हा निष्ठेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार संपतो. आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे, हे बोलण्याचा अधिकार संपतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)