उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री दहानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट तासाभरापेक्षा जास्त चालली. गप्पा मारायला राज ठाकरे यांच्याकडे गेलो होतो, असे फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. गेल्या वर्षभराचा आढावा घेतला, तर भाजपा-शिवसेनेच्या अर्धा डझनपेक्षा जास्त नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु भेटीमागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, असे प्रत्येक नेत्याने सांगितले. ‘ही सदिच्छा भेट होती’, किंवा ‘आम्ही गप्पा मारायला भेटलो’, असे उत्तर प्रत्येकाने दिले. सदिच्छा भेटीचा हा गोलमाल लोकांच्या काही लक्षात येत नाही.
सोमवारी झालेल्या राज-फडणवीस भेटीबद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. बरेच जण तर्कांचे पतंग बदवायला लागलेले आहेत. गप्पा अराजकीय होत्या असे फडणवीस म्हणतात, तेव्हा महाराष्ट्राचे राजकारण इतके बेचव झाले की काय? असा प्रश्न पडतो. राज ठाकरे हे हरफन मौला आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत, नकलाकार, व्यंगचित्रकार, संगीताचे दर्दी आहेत. लवकरच ते सिनेनिर्मात्याच्या भूमिकेत दिसतील. छत्रपती शिवाजी महाराजांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे गप्पांसाठी विषयांची काही कमी नसणार हे उघडच आहे. परंतु प्रत्येक नेता त्यांच्याकडे कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय जातो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो यावर विश्वास कोणी आणि कसा ठेवायचा?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज हे गप्पांच्या मैफलीत रमणारे नेते आहेत. मातोश्रीवर एकेकाळी राजकारण, सिने-कला-क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची मैफल जमायची. दिलीपकुमारच्या जमान्यापासून अमिताभ बच्चनपर्यंत हा सिलसिला कायम होता. मनोज कुमार, मिथून चक्रवर्ती अशा अनेक कलाकारांचा, क्रिकेटपटूंचा इथे सतत राबता असायचा. राज यांच्याकडेही असाच गोतावळा असतो. अक्षयकुमार, आमीर खान, आशुतोष गोवारीकर, शाहरुख खान, मधुर भांडारकर, रोहित शेट्टी हे हिंदीतले दिग्गज, त्यांच्याकडे येत असतात. अध्येमध्ये जावेद अख्तर, कमल हसन असे दिग्गजही डोकावून जातात.
हे ही वाचा:
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची दिमाखदार पालखी
स्वामीराज प्रकाशनतर्फे पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन
कुस्तीगीरांच्या आखाड्यात उतरले राज ठाकरे
कुस्तीगीरांच्या आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची नाराजी
मराठीतील कलाकांरामध्ये केदार शिंदे, महेश मांजरेकर हे नेहमीचे गडी. राज यांना भेटून गप्पांचा फड जमवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सिनेक्षेत्रातील अनेकांशी राज यांचा दोस्ताना आहे. अनेकदा ते राजकुमार हिरानी, संगीतकार राजेश रोशन यांच्या घरी जाऊन गप्पांचा फड जमवतात. हे खरे असले तरीही राजकीय क्षेत्रातील मित्रांशी ते फक्त अराजकीय गप्पा मारतात यावर कोण विश्वास ठेवेले?
राज यांना मित्र म्हणणाऱ्या, त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध असलेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे. जुलै २०१८ मध्ये राज नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी राज यांची भेट घेतली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये विदर्भ दौऱ्यावर असताना राज यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अनेकदा शिवतीर्थवर गेले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये गणेशोत्सवानिमित्त शिंदे त्यांना भेटले होते. मार्च २०२३ मध्ये त्यांनी शिवतीर्थावर सहकुटुंब भेट दिली. राज सुद्धा त्यांना भेटायला त्यांच्या शासकीय निवासस्थानी जात असतात. फडणवीस हे सुद्धा शिवतीर्थावर नियमितपणे जात असतात.
२०२२ च्या जुलै महिन्यात फडणवीस त्यांना भेटले होते. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची कर्नाटकमधील निकालानंतर राज ठाकरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली असली तरी त्यांचे राज यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. २०२२ मध्ये राज यांना भेटायला गेलेल्या भाजपा नेत्यांमध्ये शेलारांचेही नाव आहे. हे सगळे नेते राज यांची भेट झाल्यावर आमच्या मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. आमचे विषय राजकीय नव्हते, भेट व्यक्तिगत होती, राज जुने मित्र आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मीडियासमोर देतात.
तेव्हा प्रश्न असा पडतो की राज ठाकरे यांच्यासारख्या दबंग नेत्याशी या तमाम नेते मंडळींना राजकारणावर गप्पा माराव्याशा का वाटत नाहीत? कि राज ठाकरे यांच्याकडे विषयांना काही तोटा नसल्यामुळे अवांतर गप्पांनाच वेळ पुरत नाही? फडणवीस यांची भेट ताजी आहे. राज यांनी कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपावर टीका केल्यानंतर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा सकारात्मक परिणाम झाला, अशी स्तुतीसुमने उधळल्यानंतर झाली आहे. त्यामुळे अवांतर विषयांवर कितीही चर्चा झाली असली तरी राजकारणावर चर्चा झाली असणारच. राज राजकारणावर किती खुसखुशीत बोलू शकतात याचा अनुभव त्यांच्या भाषणाच्या वेळी लोक घेतातच. त्यामुळे राजकारणाचा विषय गप्पांतून सुटेल कसा?
अमिताभशी गप्पा मारताना सिनेमा कसा टाळता येईल, सचिनशी बोलताना क्रिकेट कसे टाळता येईल? मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही तोंडावर असताना भाजपाचे नेते राज ठाकरे यांच्यासोबत नेमके कोणते समीकरण जुळवण्याचा प्रय़त्न करतायत, असा प्रश्न तमाम राजकीय विश्लेषक आणि अन्य पक्षांच्या नेत्यांना पडलाय. फडणवीस आणि राज ताकास तूर लागू देत नाहीत. भेटीत झालेल्या चर्चेचा कोणताही तपशील बाहेर पडत नाही. काही तरी शिजतंय असा कयास काढायचा एवढंच फक्त लोकांच्या हाती उरते आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचाराची राळ उडवून टाकली होती. त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या नाहीत परंतु भाजपाच्या विरोधात जोरदार प्रचार केला. त्यांची भाषणे आणि लाव रे तो व्हीडीयो… चे प्रयोग दोन्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देऊन गेले. परंतु इतका जोरदार प्रचार करून सुद्धा विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी राज यांना हिंग लावून विचारले नाही. याचा खुन्नस राज यांना नक्कीच असणार. परंतु आगामी निवडणुकांबाबत त्यांची भूमिका काय असेल याचे पत्ते त्यांनी खोललेले नाहीत. परंतु एकंदर गाठीभेटीचा सिलसिला पाहाता भाजपा-शिवसेना आणि मनसे यांची युती झाली नाही तरी अंडरस्टँडींगची दाट शक्यता दिसते आहे. त्यामुळेच या गाठीभेटींमुळे शिउबाठाचे नेते धगधगतायत हे मात्र निश्चित.
राज-फडणवीस भेटीनंतर विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि विनायक राऊत या दोन्ही राऊतांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की लक्षात येते जबरदस्त आग लागलेली आहे. बराच धूर सुद्धा येतोय. अर्थात याबाबतीत राज आणि त्यांना भेटणारे नेते मूग गिळून बसले असताना उगाचच पतंग उडवण्यात काही हशील नाही. या गाठीभेटींची उकल होईल, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण योग्य वेळी.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)