‘सामना’च्या जाहिरातीतून केसरकरांचे आदित्यना निमंत्रण

‘सामना’च्या जाहिरातीतून केसरकरांचे आदित्यना निमंत्रण

वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमच्या डोममध्ये पहिल्या मराठा तितुका मेळवावा, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे आमंत्रण नाही म्हणून वरळीचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहेत, म्हणे.

मराठीचा गजर करण्यासाठी जगभरातील मराठी भाषकांचा समावेश असलेल्या एका सोहळ्याचे आयोजन शिंदे-फडणवीस सरकारने केले ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. परंतु अशा कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद निर्माण होणे तितकेच दुर्दैवी. निमंत्रणाच्या या वादावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मराठी विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेले उत्तर स्पष्ट आणि परखड आहे.

शासकीय शिष्टाचारानुसार सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिलेले आहे. कोणालाही वैयक्तिक निमंत्रण नाही. सामनामध्ये जाहीरातही प्रसिद्ध केलेली आहे, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिलेली आहे. पूर्वीची एकसंध शिवसेना असो वा आजची शिल्लक सेना. सामनातून संवाद हा या ठाकरेंचा मोठा यूएसपी राहिलेला आहे. सामनातून जगाला ज्ञान देणाऱ्या, बायडेनपासून पुतीनपर्यंत अनेकांना सल्ले देणाऱ्या, अनेकांची कानउघाडणी करणाऱ्या, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हकालपट्टया जाहीर करणाऱ्या शिउबाठाने या जाहीरातीची दखल घ्यावी असे केसरकरांना वाटणे चुकीचे नाही.

विश्व मराठी संमेलनाचे निमंत्रण घेऊन दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत मातोश्रीवर यावे आणि कमरेत मुजरा करून ही निमंत्रण पत्रिका कुमकुम आणि अक्षतांसह ठाकरे कुटुंबियांना द्यावी अशी आदित्य यांची अपेक्षा असू शकते. जगात कोणीही कोणतीही अपेक्षा करायला मोकळा आहे. परंतु अपेक्षापूर्तीची जबाबदारी पूर्णपणे वैयक्तिक असते, ती दुसऱ्यावर ढकलता येत नाही. आणि परिपक्व नेते अपेक्षा पूर्ती झाली नाही म्हणून फुगूनही बसत नाहीत.

आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पर्यावरण मंत्री होते, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आज ते फक्त आमदार आहेत. शिल्लक शिवसेनेचे म्हणजे शिवसेना उबाठाचे युवा नेते आहे. लोकांना त्यांचे महत्व असो वा नसो परंतु त्यांच्या पक्षात, त्यांच्या घरात ते मोठे आहेत. कोणतेही पद नसताना पदावर असलेली मंडळी ज्यांच्या दारापर्यंत येतात आदरपूर्वक कार्यक्रमाचे निमंत्रण देतात, अशा योग्यतेची अनेक माणसं महाराष्ट्रात झालेली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याच पंक्तीतले होते. अनेक बडे मंत्री, नेते त्यांना भेटायला मातोश्रीपर्यंत येत असत. बाळासाहेब बेताज बादशहा होते. परंतु त्यांचे वारस म्हणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही तोच मान मिळेल हे जरूरी नाही. अनेकदा वैयक्तिक संबंधामुळे शिष्टाचार बाजूला ठेवून अशा सरकारी कार्यक्रमांची निमंत्रणे दिली जातात. परंतु आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निकषातही बसत नाहीत.

मराठी माणसांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करण्यासाठी स्थापन शिवसेनेची स्थापना करण्यात आली. परंतु आदित्य ठाकरे यांना मराठीबाबत फार प्रेम आहे हे स्पष्ट करणारे एकही उदाहरण त्यांच्या अल्प स्वल्पशा कारकीर्दीत दिसत नाही. त्यांना वरळी मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा ‘केम छो’ वरळी अशी आरोळी ठोकून ते निवडणूक मैदानात उतरले. मतदार संघात रांगड्या मराठी संस्कृतीला मजबूती देणाऱे कार्यक्रम हाती घेण्याऐवजी त्यांना नाईट लाईफचे डोहाळे लागले होते. त्यांच्यासोबतचा गोतावळाही मराठी नव्हता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अवतीभवती सतत मराठी कलाकारांची गर्दी असते. त्यांचा मराठी कलाकारांना आधारही वाटतो. परंतु आदित्य यांच्या अवतीभवती कायम बॉलिवूडची गर्दी दिसली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मराठी शाळांना घरघर लागली. तिथे लक्ष देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांचे सरकार उर्दू भवन बांधण्याचे संकल्प सोडत होते. सत्तेवरून भिरकावल्यावरच ठाकरेंना मराठीची, मराठी अस्मितेची आठवण येते. त्यामुळे मराठीचा आणि त्यांचा संबंध जेवणातल्या मीठाएवढाच. विश्व मराठी संमेलनाला बोलावले किंवा बोलावले नाही तर त्यांचे काय बिघडणार होते? परंतु आदित्य यांच्या नाराजीचा संबंध मराठी प्रेमापेक्षा दुखावलेल्या अहंकाराशी जास्त आहे.

हे ही वाचा:

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची संपत्ती जप्त

कुलाबा केंद्राने जिंकली बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा

उर्फी जावेदची घाणेरडी, विकृत वृत्ती महिला आयोगाला मान्य आहे का?

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

ठाकरे पिता-पुत्र इतरांना कायम शेलक्या शिव्या देत असतात आणि स्वत:ला मानसन्मान मिळेल अशी अपेक्षा करत असतात. पेरावे तेच उगवते हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे ठाकरे पिता-पुत्रांनी सन्मानाची निमंत्रणे येणार नाहीत, याची सवय करून घेतली पाहिजे. राजकारणात वारशामुळे फक्त प्रवेश मिळू शकतो. परंतु राजकारणात मांड ठोकून बसायचे असेल तर योग्यता हवीच.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात आले. त्या सोहळ्याला उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. शिष्टाचार म्हणून निमंत्रण देण्याची गरज नव्हती आणि वैयक्तिक निमंत्रण द्यावे इतकी दोघांची पुण्याई नाही. विश्व मराठी संमेलनात याची पुनावृत्ती झाली. कधी काळी ठाकरे आणि मराठी अस्मिता यांचा संबंध होता. आज तो सामनात प्रसिद्ध झालेल्या पानभर जाहिराती पुरता शिल्लक आहे, एवढाच या घडामोडींचा अर्थ.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version