महाराष्ट्रात मविआची सत्ता असताना मुंबईतील नाईट लाईफची चिंता करणारे उबाठा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे सध्या मुंबईतील बहुमजली झोपडयांची चिंता वाहतायत. बहुमजली झोपड्या एसआरएसाठी पात्र करून घ्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. मुंबईतील बहुमजली झोपड्या बेहराम पाडा, भारत नगर, मदनपूरा, बैंगनवाडी अशा मुस्लीम बहुल भागात आहेत. मुंबईकर ही बाब ओळखून आहेत. त्यामुळे आदीत्य ठाकरे यांना त्यांची चिंता असणे स्वाभाविक आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात हेच लोक उबाठा शिवसेनेच्या पाठीशी उभे होते. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवाज उठवणारे ठाकरे आता अल्पसंख्यांच्या अनधिकृत मोहल्ल्यांसाठी कंबर कसून उभे आहेत.
मविआची राज्यात अडीच वर्षे सत्ता होती. त्या काळात या बहुमजली झोपड्यांना एसआरएसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेता आला असता. परंतु तेव्हा घेण्यात आला नाही. हा तर ठाकरेंच्या डोळ्यासमोरचा विषय. मातोश्री पासून या झोपड्या फार दूर नाही. अगदी हाकेच्या अंतरावरच्या परंतु तरीही निर्णय झाला नाही. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकाही अपेक्षित आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर मतदारांना गोड गोड वाटेल अशा मागण्या आणि घोषणा करायच्या असतात. ज्यांच्याकडे २५ वर्षे महापालिकेची सत्ता असताना मराठी माणूस गिरगाव, भायखाळा, दादरपासून थेट विरार, डोंबिवलीत फेकला गेला. हे वास्तव असले तरी निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाची आठवण काढावीच लागते. ते शास्त्र असते. उबाठा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मुंबईतील नव्या इमारतीमध्ये मराठी माणसासाठी ५० टक्के फ्लॅट आऱक्षित ठेवण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशानात एका खासगी विधेयकाच्या माध्यमातून केलेली आहे.
मराठी मतदार उबाठा शिवसेनेसोबत आहे, असे ठामपणे सांगण्याचे दिवस उरलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी सांगते की मुस्लिम मतांनी उबाठा शिवसेनेला तारले. तेव्हा आता मुस्लिम मतांसाठी हातपाय मारणे भाग आहे. मुंबईत अनेक मुस्लिम मोहल्ले आहेत. त्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सगळ्या मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे पालिका आणि पोलिस फिरकत नाहीत. हिंदुबहुल भागात कुठे रेती पडायचा अवकाश, पोलिस आणि पालिकेचे लोक इथे लगेच धाव घेतात. ही धाव कशासाठी असते हे काही गुपित राहीलेले नाही. परंतु मुस्लीम मोहल्ल्यात मात्र मजल्यावर मजले चढले तरी पालिकेचे लोक हफ्ता खायलाही येत नाही. अनधिकृत बांधकाम तोडण्याची बाब तर खूप दूर राहिली. इथे कारवाई केली तर बाहेर पडताना हात-पाय धड राहतील याची कोणतीही शाश्वती नाही, हे माहीत असल्यामुळे हे पोलिस सुद्धा या मोहल्ल्यांपासून दूर असतात.
हे ही वाचा:
फडणवीसांनी काढला चिमटा, ‘फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री झाला तर अडचण होते!’
इटलीत तीन जणांनी इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यकारी संचालकाची बॅग लांबवली
रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!
पंतप्रधानांचा खास संदेश, ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’
लाखो मुंबईकर लोकल प्रवासी वांद्र्यावरून प्रवास करताना या झोपड्यांचे दर्शन घेत असतात. अनेकांना प्रश्न पडत असतो की वांद्रे पूर्व स्थानकापासून थेट हायवेपर्यंत या पसरलेल्या झोपड्यांवर कारवाई का होत नाही? यातल्या अनेक झोपड्या सहामजली आहेत. अनधिकृत आहेत. वांद्रे स्थानकावरून जाणाऱ्या स्काय वॉकला चिकटून या झोपड्या उभारण्यात आलेल्या आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या दिसत का नाहीत? महापालिकेची सत्ता २५ वर्षे हाती ठेवणाऱ्या शिवसेनेला या झोपड्यांवर कारवाई करण्याची हिंमत कधी झाली. असेच बहुमजली इमले जोगेश्वरीतील बांद्रे प्लॉटवर, मदनपुऱ्यात, बेहरामबागेत, डोंगरीत अनेक ठिकाणी आहेत. तीन मजल्यांपासून सहा मजल्यांपर्यत बांधकाम, अनेकांनी त्यापुढेही मजल मारलेली आहे. तिथे कोण राहतात, ते कुठून आले आहेत, याची चौकशी करण्यासाठी सरकार दरबारातील कोणताही माणूस इथे फिरकण्याची हिंमत करत नाही.
एकेकाळी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुस्लीम मतांची चिंता करत नव्हता. कारण बाळासाहेब हयात असेपर्यंत आणि पुढे शिवसेनेने अजान स्पर्धांचे आयोजन करे पर्यंत मुस्लीम मतदार शिवसेनेकडे ढुंकूनही पाहात नव्हता. आता मात्र हा त्यांची हक्काची व्होट बँक बनलेला आहे. या मतदाराची चिंता आदित्य ठाकरे यांना असणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे या बहुमजली झोपड्यांना एसआरएसाठी पात्र करण्याची मागणी करीत आहेत. एसआरएच्या नियमानुसार तुम्हाला पोट माळ्यासाठी घर दिले जात नाही. तिथे आदित्य ठाकरे या एकावर एक चढवलेल्या मजल्यांना पात्र ठरवण्याची मागणी करतायत.
जिथे अशा झोपड्या असताना तिथे सतत आगी लागत असतात, त्यामुळे कागदपत्र आगीत भस्मसात झाली, अशी कारणे सांगता येतात. मुस्लीम समाजाचे स्थानिक नेते त्यांना नवी कागदपत्र बनवण्यासाठी मदत करतात. आता या मोहल्ल्यांना मुस्लीम नेत्यांची गरज उरलेली नाही, कारण खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी किल्ला लढवत आहेत. आगामी निवडणुकीत बहुमजली अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या, कागज नही दिखाएंगे, असा दम देणाऱ्या लोकांना एसआरएच्या बहुमजली इमारतीत राहता यावे म्हणून प्रयत्न करीत आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)