महालक्ष्मी येथील रेसकोर्स सध्या चर्चेत आहे. ही जागा महापालिका आणि राज्य सरकारच्या संयुक्त मालकीची आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या या जमिनीचा भाडेपट्टा २०१३ मध्येच संपला. परंतु आजही इथे घोड्यांच्या शर्यती होतात. इथे थीम पार्क होणार अशी पुडी कोणी तरी सोडल्यामुळे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ते ओपन स्पेसच्या नावाने बोंबा ठोकतायत. परंतु ही कल्पना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला का सूचली नाही? या विचाराने ते अस्वस्थ नाहीत ना, असा संशय अनेकांना येतोय.
पुरातन वास्तूंची श्रीमंती असलेल्या दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या भागात महालक्ष्मी रेसकोर्सची गणना होते. रेसकोर्सचा भाडेपट्टा २०१३ ला संपला असताना अत्यंत मोक्याच्या जागेवर असलेली ही जमीन कोणीही ताब्यात घेण्याचा प्रय़त्न केला नाही. मुंबई महापालिकेच शिवसेनेची सत्ता गेली २५ वर्षे आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. साडे आठ लाख चौ.मी. पसरलेली ही जागा आता चर्चेत आली आहे ती आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटमुळे. रेसकोर्स मुलुंडला हलवून इथे थीम पार्क बनवण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे, असा दावा आदित्य यांनी केला आहे. रेसकोर्सला हेरीटेज-२ चा दर्जा आहे. शिवाय ही मुंबईतील महत्वाची मोठी मोकळी जागा आहे. त्यामुळे ही जागा आम्ही खोके सरकारच्या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही, इंच इंच लढू अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या घोषणा वरकरणी खूपच पर्यावरणवादी वाटत असल्या तरी त्यांचे अंतरंग कायम झोलझाल असतात. आरे वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी मेट्रो कारशेडचे आणि पर्यायाने मेट्रो प्रकल्पाचे चाक अडीच वर्षे कशा प्रकारे चिखलात रुतवून ठेवले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले. याच आरेच्या परीसरात मेट्रो कारशेडचा प्रकल्प येण्याच्या खूपपूर्वी रॉयल पाम्स हा निवासी प्रकल्प वसवण्यात आला तेव्हा या पर्यावरणवाद्यांची दातखीळ बसली होती. परंतु मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रोसारखा एखादा प्रकल्प राबवण्यात येत असताना आदीत्य यांची पोटदुखी उसळली. प्रकल्पाचा खर्च दहा हजार कोटींनी वाढला. आता महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यामुळे बालहट्ट बंद झाले आणि मेट्रो कारशेड त्याच ठिकाणी साकारते आहे. परंतु मुंबईकरांसाठी जो मेट्रो प्रकल्प आता पर्यंत बऱ्यापैकी सज्ज व्हायला हवा होता तो मात्र प्रचंड रखडला.
आता आदित्य रेसकोर्सच्या नावाने गळा काढतायत. ओपन स्पेसचा मुद्दा त्यांनी पुढे रेटला आहे. या जागेवर अबाल-वृद्धांसाठी मोफत ग्रीन पार्क बनायला हवा, परंतु थीम पार्कच्या नावाखाली शिंदे-फडणवीस सरकार ही जमीन बिल्डरांना बहाल करू पाहाते आहे, अशी टीका आदित्य यांनी केली आहे. मुळात रेसकोर्सची एक तृतीयांश जागा महापालिकेची आहे. ही महापालिका अडीच दशके शिवसेनेच्या ताब्यात आहे. दहा वर्षांपूर्वी रेसकोर्सचा भाडेपट्टा संपला असताना आदित्य किंवा त्यांचा पक्ष या मुद्यावर मूग गिळून का बसला होता, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सवर ग्रीन पार्क करण्याची एखादी योजना जाहीर का केली नाही? ज्या काळात आदित्य यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त नाईट लाईफचे खूळ होते. ते फक्त याच एका विषयावर बोलत होते, तेव्हा मुंबईची फुफ्फुसे असलेल्या रेसकोर्सच्या जमिनीबाबत मुंबईकरांसाठी त्यांची काय योजना आहे, हे त्यांनी कधी बोलून का दाखवले नाही? जेव्हा त्यांचे पिताश्री उद्धव ठाकरे हे फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या योजनांना शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याच्या एक कलमी कार्यक्रमात रंगले होते, तेव्हा रेसकोर्सवर सर्वसामान्य मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेनाप्रमुखांच्या नावावर एखाद्या भन्नाट पार्कची योजना जाहीर करणे त्यांच्या हाती होते. परंतु त्यांनी तेही केले नाही? या जागेवर हाईड पार्कसारखी एखादी योजना व्हावी अशी उद्धवजींची इच्छा होती हे आदित्य ठाकरे आज सांगतायत. हे मुंबईकरांना माहीत नाही. बहुधा उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट आदित्य यांच्या कानात सांगितली असावी, जी आदित्य यांनी मनात ठेवली आणि आता ती मुंबईकरांना सांगण्याची त्यांची इच्छा झाली आहे.
हे ही वाचा:
तामिळनाडूमध्ये ३५६ कलम लागू करा! सोशल मीडियावर #Article 356 हा ट्रेंड
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च
आदित्य रेसकोर्स हलवण्याचा विचार करू शकत नव्हते कारण ते ज्या नाईट लाईफच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, त्या नाईट लाईफमध्ये रमलेल्या लोकांचा, क्लब संस्कृतीचा रेसकोर्स संस्कृतीशी घट्ट संबंध आहे. आणि या रेशमीबंधांना धक्का लावण्याची त्यांची इच्छा नव्हती हे खरे कारण. नाही तर शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या नावावर त्यांनी महापौर बंगला ताब्यात घेण्याचे काम फत्ते केले, त्याच धर्तीवर रेसकोर्सबाबतही विचार होऊ शकला असता.
आदित्य यांच्या ट्वीटला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी चोख उत्तर दिले आहे. गेली २५ वर्षे महापालिकेला वैयक्तिक पिगी बँकसारखे वापरत होते. कंत्राटदारांमार्फत मुंबईची लूट करत होते, त्यांना आता ओपन स्पेसची आठवण झाली आहे. ओपन स्पेस गिळणाऱ्या आदित्य यांच्या काही प्रकल्पांची शेलार यांनी त्यांना आठवणही करून दिलेली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स अनेक हिंदी सिनेमात झळकला, परंतु सर्वसामान्य मुंबईकरांचा या रेसकोर्सशी जो संबंध आहे तो सिनेमाच्या पडद्यापुरता आहे. बाकी ही श्रीमंतांची दुनिया आहे. त्यामुळे इथे पर्यावरणाचा विचार करून, जागेचे सौंदर्य अबाधित राखून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी काही करता आले तर त्याचे स्वागतच होईल.
अलिकडेच दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाची १५० एकर जागा विकत घेऊन महापालिकेने इथे थीम पार्क बनवण्याचे जाहीर केले आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्याचे सौंदर्य खुलवणारे आणि मुंबईकरांना उपयुक्त असे इथे काही तरी साकारू शकते. परंतु ज्यांना फक्त एखाद्या चांगल्या प्रकल्पात खोडे घालण्याची खोड आहे, असे सल्लागार इथे नको एवढीच मुंबईकरांची इच्छा आहे.