कधी काळी एका न्यूज चॅनेलवर गुन्हेगारीवर आधारित ‘सनसनी’ नावाची एक मालिका यायची. मालिकेचा अँकर आरडाओरडा करत संपूर्ण एपिसोड सादर करायचा. त्याच्या बोलण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अनेक सिनेमात त्याला विनोदी ढंगात सादर केले. शिउबाठाचे युवानेते आदित्य ठाकरे ‘सनसनी’ बघत होते का हे ठाऊक नाही, परंतु त्यांच्यावर तो प्रभाव जाणवल्याशिवाय राहात नाही. महालक्ष्मी रेस कोर्स बळकावण्याचा सरकारचा डाव, असल्याचा आरोप करून त्यांनी सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील समुद्रालगतच्या पावणे तीन एकरावर पसरलेला साडे चार हजार चौरस फुटांचा देखणा महापौर बंगला पदरात पाडून घेण्यात ठाकरेंना यश आले. परंतु खरे तर त्यांचा डोळा रेसकोर्सवरच होता. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले. मे २०१३ मध्ये विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी तत्कालिन काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारकडे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी रेसकोर्सची मागणी केली होती.
‘मुख्यमंत्री जर स्वत:ला मराठी अस्मितेचे पाईक समजत असतील तर त्यांनी रेसकोर्सवर शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी परवानगी द्यावी. कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नाही, थेट अध्यादेश काढावा’ अशी मागणी केली होती. राऊतांच्या कल्पना शक्तीची भरारी खूप मोठी असली तरी ते रेसकोर्स मिळवण्याबाबत आदेशाशिवाय कशाला बोलतील? त्यांचे बोलविते धनी कोण हे अवघ्या जगाला ठाऊक आहे.
रेसकोर्सची जादू कोहीनूर हिऱ्यापेक्षा कमी नाही. ही जमीन एकूण २२५ एकरांची आहे. त्यापैकी ३० टक्के जागा महापालिकेची आहे. या जागेचा भाडेपट्टा संपला आहे. ही जागा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे. इथे रेसकोर्सचा व्ह्यू असलेल्या निवासी प्राईम प्रॉपर्टीचे दर चौरस फूटाला ६५ हजार ते ८५ हजार रुपये इतके प्रचंड आहेत. कल्पना करा रेसकोर्समध्ये एखादी प्रॉपर्टी उभारली तर त्याचा दर किती असेल?
स्मारकाच्या नावाखाली ही जागा हडपण्याची पूर्ण तयारी ठाकरेंनी केली होती. संजय राऊत यांनी रेसकोर्सची मागणी केल्यानंतर ‘आमचा तसा प्रस्ताव नाही, परंतु कोणी तसा प्रस्ताव ठेवणार असेल तर आमचा पाठींबा आहे’, अशी मानभावी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना ठाकरेंची खिचडी शिजू शकली नाही. राऊतांच्या बडबडीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साफ दुर्लक्ष केले. महापौर बंगल्याबाबत मात्र त्यांना यश आले.
शिवसेनाप्रमुखांच्या नावाने जरा महापौर बंगला पदरात पाडून घेता आला त्याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात हा निर्णय झाला. हेरीटेज दर्जा असलेली ही सुंदर वास्तू ठाकरेंच्या ताब्यात गेली.
रेसकोर्स घशात घालता आला नाही, याची हळहळ ठाकरेंना आहेच. ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांचे घोडे या रेसकोर्सवर धावतात हा आणखी एक नाजूक ऋणानुबंध. त्यामुळे रेसकोर्सशी ठाकरेंचे भावनिक नाते आहे. हे नाते घट्ट होत नसल्यामुळे ठाकरे बहुधा अस्वस्थ आहेत. आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर रेसकोर्स लाटण्याचा ठपका ठेवला. इथे हॉटेल बांधण्याचा प्रयत्न होतोय. सरकारशी जवळीक असलेला एक बिल्डर यासाठी प्रयत्न करतोय, असा त्यांचा आरोप आहे. ठाकरेंचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. कधी काळी ज्या देखण्या चेहऱ्यावर आपला डोळावर होता, तिथे आता दुसरा नजरा गाडून बसलाय हे बहुधा ठाकरेंना सहन होत नाही.
३१ मे २०१३ रोजी रेसकोर्स भाडेपट्टा संपला तेव्हा इथे मुंबईकरांसाठी बगीचा बांधावा अशी मागणी तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. २०१९ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा या मागणीची अंमलबजावणी व्हायला काहीच हरकत नव्हती. अडीच वर्षे ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महापालिकेची सत्ताही त्यांच्या ताब्यात होती. परंतु, रेसकोर्सवर बगीचा बांधून मुंबईकरांचे भले करण्यात कोणाला रस होता? शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या नावाने जागा जर घशात घालता आली असती तर फायदा झाला असता. परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे मविआची सत्ता असताना रेसकोर्सवर बगीचा बांधण्याचा आपल्याच महापौराचा प्रस्ताव ठाकरेंनी थंड्या बस्त्यात टाकला असावा.
हे ही वाचा:
पुन्हा ईव्हीएम हॅक होतेय, अब की बार ४०० पार…
अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच
रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र
ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार
आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या संबंधी केलेला आरोप सनसनाटी आहे. परंतु फक्त तोंडाच्या वाफा काढण्यात आणि आरोपांच्या पिंका टाकण्यात काय हशील. त्यांनी सरकारमधला कोण मंत्री कोणत्या बिल्डरसाठी रेसकोर्सचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय? त्यासाठी कोणी प्रस्ताव सादर केला आहे? कोणाकडे केला आहे? नेमका प्रस्ताव काय आहे? हे तपशील उघड केले असते तर मजा आली असती. परंतु गेल्या काही दिवसात आरोप करायचे आणि पुरावे द्यायचे नाहीत, तपशील द्यायचा नाही, जणू ठाकरे हे आधुनिक रामशास्त्री आहेत आणि ते म्हणतील ते ब्रह्मवाक्य आहे, असा त्यांनी स्वत:च स्वत:चा समज करून घेतला आहे. त्यामुळे ते पुरावा देण्याच्या भानगडीत पडत नाही.
अलिकडे विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले तेव्हा या मुद्यावर पुराव्यानिशी तोंड उचकटायला हवे होते. तसे काही केले असते तर कागद दाखवावे लागले असते. त्यामुळे पत्रकारांसमोर आरोप करण्याची परंपरा पुढे नेत आदित्य यांनी नवा धमाका केला आहे. पुढे काही दिवस यावर चर्चा होईल. धमाका पोकळ आहे, हे समोर आल्यानंतर तो पोकळ का ठरला याचा खुलासा करणे टाळून आदित्य ठाकरे नवा आरोप करतील.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)