जरांगे पाटलांना समज कोण देणार?

ओबीसी विरुद्ध मराठा अशी तेढ निर्माण होऊ नये याची जबाबदारी सर्वांची आहे

जरांगे पाटलांना समज कोण देणार?

दोन महिन्यांपूर्वी जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रातील किती लोकांना ठाऊक होतं? परंतु मराठा आरक्षणासाठी १६ दिवस उपोषण करून ते प्रकाश झोतात आले. फक्त १६ दिवसांची गुंतवणूक करून नेते बनलेले जरांगे अलिकडे गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वांना समज देत सुटले आहेत. ते ज्या प्रकारे दमबाजीची भाषा वापरतायत ती ऐकल्यानंतर प्रश्न हा निर्माण होतो की यांना समज कोण देणार?

 

अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण सोडताना जरांगे यांनी सरकारला ३० दिवसांची मुदत दिली होती. गेल्या ४० वर्षात सुटू न शकलेला प्रश्न केवळ महिन्याभरात कसा सुटणार? असा विचार करून, जरांगे कृपाळू झाले. ही मुदत आणखी दहा दिवसांनी वाढवली. काहीही करा आणि २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

 

जरांगे यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न जरुर करावेत, परंतु हे प्रयत्न करताना ज्यांनी राजकारणात आपली हयात घालवली त्यांचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ‘लोकशाहीत अल्टीमेटमची भाषा चालत नाही. बघून घेऊ, दाखवून देऊ, अशी भाषा चालत नाही. देशातील ५० टक्के जागा देशातील गुणवंतासाठी आहेत, त्यांच्यासाठी मी लढा देईन, वेळ पडल्यास उपोषण करेन’, असे सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

जरांगे मराठा समाजासाठी लढतायत, त्यांना आव्हान देणारे सदावर्ते दलित समाजाचे असून खुल्या वर्गातील लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून आवाज उठवतायत. म्हणून सदावर्ते यांची भूमिका कौतुकास्पद आहे. जातीच्या पलिकडे विचार करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली आहे. खुल्या वर्गातील गुणवंतांच्या न्याय्य हक्कांसाठी उपोषण करण्याची तयारी ते दाखवतायत.

 

 

सदावर्ते यांनी या मुद्द्यावर तोंड उघडल्यापासून जरांगे त्यांच्यावर संतापले आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाज दिलाय. ‘सदावर्ते तुमचा कार्यकर्ता आहे, त्यांना समज द्या’. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फडणवीसांची तक्रार केली आहे. फडणवीसांना समज द्या, असे त्यांनी थेट मोदींना सांगितले आहे. जरांगे सर्वांची तक्रार करत सुटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला तेव्हा जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बजावले, भुजबळांना समज द्या.

 

 

जी लोकशाही जरांगेंना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते तीच लोकशाही सदावर्ते आणि भुजबळांनाही अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य देते. जरांगेना त्यांची अभिव्यक्ति मात्र मान्य दिसत नाही. देश जरांगे यांच्या इच्छेनुसार चालत नाही, घटनेच्या चौकटीत चालतो. जरांगेंची मागणी आज तरी घटनात्मक तरतुदीत बसत नाही, असे जर सदावर्ते म्हणत असतील तर त्यात जरांगेंना झोंबण्यासारखे काहीच नाही.

 

 

मराठा आरक्षणाचा विषय हा जटील आणि गुंतागुंतीचा आहे. जर तो इतका साधा-सोपा असता तर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांना ते जमले नसते का? पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही मराठा समाजाचाचे आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी काही केल्याचे ऐकीवात नाही. जरांगे पाटील यांच्यासारख्या चळवळ्याला त्यांच्या कारकीर्दीत आवाज उठवासा वाटला नाही.

हे ही वाचा:

श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर

आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी

 

जरांगे पाटील आरक्षण मागताना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या असं जेव्हा म्हणतात, तेव्हा त्या विषयासी ओबीसी समाजाचा संबंध येतोच की. मग या मुद्द्यावर ओबीसी नेते बोलणार नाहीत, असे कसे होऊ शकते? ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास अनेक ओबीसी नेत्यांनी विरोध केला तसा तो भुजबळांनीही केला. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी भुजबळांना चिल्लर नेते म्हटलेले आहे. भुजबळ यांनी जरांगेंच्या सभेसाठी लागणारा पैसा येतो कुठून असा सवाल उपस्थित केला. या विधानावर प्रतिक्रिया देताना जरांगे भुजबळांना चिल्लर नेते म्हणाले. भुजबळांना मराठा समाजाने मोठे केले असे विधान केले. भुजबळांना मोठे करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. आणि ठाकरे मराठा नव्हते हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवारांनी भुजबळांना फोडले आणि आपल्या पक्षासाठी वापरले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर भुजबळांनी पवारांची भक्कम साथ केली होती. सत्ता आल्यानंतर पवारांनी त्याची परतफेड केली.

 

 

मराठा समाजामुळे भाजपाचे १०६ आमदार विजयी झाले, असे जरांगे सुनावतात. भाजपाने हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे. जातीच्या नावावर मत मागण्याचे धंदे भाजपा करत नाही. त्यामुळे अमुक समाजामुळे भाजपाचे १०६ आमदार विजयी झाले, असा दावा करण्याचा कोणी प्रयत्नही करू नये.

 

 

मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना समाजात ओबीसी विरुद्ध मराठा अशी तेढ निर्माण होऊ नये याची जबाबदारी सर्वांची आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी जरांगे आता लाखोच्या सभा घेतायत. उद्या अशाच सभा घेऊन ओबीसी समाजाने त्यांच्या भूमिकेला विरोध केला तर हा प्रश्न लोंबकळण्याच्या पलिकडे काहीच होऊ शकत नाही. उपोषण फक्त जरांगे करू शकतात असं थोडंच आहे, आता सदावर्ते यांनीही आमरण उपोषणाची हाळी दिलेली आहे. आरक्षण देताना जातीची फूटपट्टी लावण्यापेक्षा गरिबीची फूटपट्टी लावण्याची गरज आहे. हीच भूमिका कधी काळी शरद पवारांनी जाहीरपणे घेतली होती.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version