31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरसंपादकीयमुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?

मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न कोणाचा?

मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यावर दबाव येत असल्याचा रंग या प्रकरणाला देण्यात आला.

Google News Follow

Related

‘आपल्याला चेकमेट करण्यासाठी वर्षभरापासून प्रय़त्न सुरू आहेत’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका बुद्धीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केला. अजित पवार यांची सरकारमध्ये एण्ट्री झाल्यापासून शिंदे यांचे आसन अस्थिर झाले आहे. ते फार दिवस मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत, अशा प्रकारचा दावा विरोधकांकडून वारंवार होत असताना, एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य आलेले आहे. या विधानाचे टायमिंग महत्वाचे आहे.

 

 

बुद्धिबळ आणि राजकारणाच्या खेळातला एक फरक खूप मोठा आहे. बुद्धिबळाचा एक डाव संपला की दुसरा मांडता येतो. राजकारणात मात्र त्यांची हमी नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन आता वर्षभराचा काळ लोटलेला आहे. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेमुळे सरकारवर अस्थिरतेचे संकट होते. ते अद्यापि दूर झालेले नाही. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, शिंदे यांना शह देण्यासाठीच ही खेळी खेळली गेल्याचा दावा, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत आदी मविआतील अनेक नेत्यांनी केला.

 

 

अजित पवारांची सरकारमध्ये एण्ट्री लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून भाजपाने केलेली जुळवाजुळव आहे. कारण फक्त शिंदेंना सोबत घेऊन ४० पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य गाठता येणार नाही, असे भाजपा नेतृत्वाला जाणवत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे नाव निशाणी आली तरी पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्यासोबत नाही. ती विभागली गेलेली आहे. प्रत्येक संधी साधून शिंदेंच्या विरोधात हूल उठवण्याचे काम त्यांचे विरोधक करीत आहेत. राजकारणात अनेकदा हूल देऊन मातब्बर शत्रूला धूळ चारल्याची उदाहरणे आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी तसा प्रयत्न करून पाहिला.

 

दोन दिवसांपूर्वी शिंदेच्या आजारपणावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. शिंदे यांच्या आजारपणाचे कारण पुढे करून केंद्रातील भाजपा नेते त्यांना हटवण्याच्या तयारीत आहेत, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. सतत एकच विषय बोलत राहिला की हळूहळू लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागतात. या खेळीवर बहुधा मविआतील नेत्यांचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे शिंदे जाणार, जाणार असा घोषा सतत सुरू आहे. शिंदे यांच्या आजारपणाचे राजकारण करण्यात आले. मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यावर दबाव येत असल्याचा रंग या प्रकरणाला देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मला चेकमेट करण्याचा प्रय़त्न केला जातोय, पण त्यांचे स्वप्न साकार होत नाही. विरोधकांनी कितीही बुद्धी पणाला लावली तरी जनता माझ्या पाठीशी आहे, असे वक्तव्य केले.

 

शिंदे यांच्या आसनाला कोणताही धोका नसला तरी राज्यात सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. जिथे एका म्यानात दोन तलवारी ठेवणे कठीण असते, तिथे एका म्यानात आता तीन तलवारी आहेत. राज्यात तीन सत्ताकेंद्र झालेली आहेत. प्रत्येक निर्णयात तिन्ही नेत्यांचे एकमत होत असेल असे मानायचे काहीच कारण नाही. सगळं काही सुरळीत सुरू आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. आघाडी सरकारचा कारभार किती सुरळीत असतो याची झलक २०१४ च्या आधीची तीन दशके देशाने पाहिली आहे, अनुभवली आहे. आघाडीचा खेळखंडोबा नको म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुमतातील सरकारची महत्ता जनतेला वारंवार सांगत असतात. त्यांची सत्ता येण्यापूर्वी जे काही घडत होते, त्याची आठवण करून देत असतात.

 

महायुती सरकारचे मुख्यमंत्री पद सर्वात मोठ्या पक्षाकडे नाही, हे या सरकारचे सर्वात नाजूक मर्मस्थळ आहे. सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही, ही सल फक्त कार्यकर्त्यांच्या मनात नाही. नेते सुद्धा याला अपवाद नाहीत. फडणवीसांनी दाखवलेल्या समंजसपणामुळे राज्यात नवे सरकार आले आहे.

हे ही वाचा:

हॉटेलमधील चिकन प्लेटमध्ये उंदीर की खंडणी उकळण्याचा प्रयत्न?

चांद्रयानाचा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपीने महिलेलाही दिली होती धमकी

 

एकनाथ शिंदे यांचे योगदानही मोठे आहे. त्यांनी धोका पत्करला नसता तर प्रचंड अंतर्गत संघर्ष असूनही मविआचे सरकार कोसळले नसते. शिंदे यांनी पत्करलेला धोका इतका मोठा होता की गणित जरा चुकले असते तर त्यांची कारकीर्द संपुष्टात आली असती. रिस्क-रिवॉर्ड रेशोचा विचार केला तर शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय योग्य होता. त्यांना हटवण्याचा विचार भाजपा नेत्यांच्या मनातही येऊ शकत नाही. २०२४ ची निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

विधानसभा निवडणुकीनंतर नेतृत्वाबाबत काय निर्णय घ्यायचा याचा फैसला केंद्रातील नेते करतील, इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. रावसाहेब दानवे यांनीही हीच भूमिका मांडलेली आहे. सगळं काही आलबेल नसले तरी मविआच्या कारभाराची तुलना जर केली तर महायुतीचे सरकार निश्चितपणे उजवे आहेत. सरकारचे कर्ते सक्रीय आहेत, लोकांच्या संपर्कात आहेत. कोणीही घरी बसलेले नाही. प्रशासनावर पकड असलेले हे नेते आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या काळात अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. विकासाला गती आली. एकनाथ शिंदेही राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतायत. त्यांच्या गाठीभेटी अखंडपणे सुरू असतात.

 

 

राजकारणाच्या खेळाचे आपण ग्रँड मास्टर आहोत, हे शिंदे यांचे विधान त्यांचा आत्मविश्वास व्यक्त करणारे आहे. परंतु त्याला विरोधक उसने अवसान ठरवण्याचा प्रय़त्न करतील. शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद २०२४ पर्यंत अबाधित आहे की नाही, हा प्रश्नच नाही. ते अबाधितच आहे. मूळ मुद्दा असा आहे की नाव-निशाणी मिळवलेला त्यांचा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कामगिरी कशी करणार. ते राजकारणाच्या बुद्धीबळाचे ग्रँडमास्टर आहेत की नाहीत, याचा फैसला फक्त आणि फक्त महाराष्ट्राची जनता करू शकते. घोडामैदान फार लांब नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा