शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीचा फैसला खरे तर विधानसभेच्या सभागृहात होणे अपेक्षित आहे, परंतु तुर्तास तरी शिवसेनेचे याचा फैसला रस्त्यावर करण्याचा मनसुबा केलाय. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. जे आमदार मुंबईतून पळून गेले ते जेव्हा मुंबईत परत येतील तेव्हा ‘खेला होबे’, असे राऊत म्हणालेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये खेला होबे म्हणून जो रक्तपात केलाय तो अवघ्या भारताला ठाऊक आहे. तिथे दिवसा ढवळ्या विरोधकांचे मुडदे पडतायत. त्यामुळे राऊत यांना महाराष्ट्रात कसला ‘खेला’ हवाय याचा अर्थ आपण समजू शकतो.
पोलिस संरक्षणात शिवसैनिक सक्रीय झाले आहेत. मुंबईत आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यालय फोडण्यात आले. उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडण्यात आले. धाराशीवचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावरही हल्ला झाला. सत्तेवर आल्यापासून शिवसेनेची ही दंडेली सुरू आहे. एखादी पोस्ट केल्याबद्दल भाजपा समर्थकांना अटक करणारे त्यांना महिना महिना तुरुंगात डांबणारे पोलिस शिवसैनिकांच्या दंडेलीवर मात्र कोणतीही कारवाई करत नाहीत. हातावर हात घेऊन बसतात. त्यामुळे मनगटात जोर नसलेलेही गल्लोगल्ली झुंडीची मर्दांनगी दाखवत फिरतायत. पण अति तिथे माती हा निसर्गाचा नियम आहे.
शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करून जेवढी संख्या शिवसेना भवनात जमवली त्यापेक्षा जास्त संख्या आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी जमली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ठाण्याचे महापौर नरेश मस्के सुद्धा त्यांच्या श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होते. अनेक नगरसेवक समर्थकांच्या गर्दीत उपस्थित होते. ठाण्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत अशी ग्वाही या गर्दीने एकमुखाने दिली. ठाणे हे सुरूवातीपासून शिवसेनेचे ठाणे आहे, हे धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे आहे. परंतु या ठाण्यात आज शिवसेनेचे पक्षप्रमुख पोस्टर बॅनरवरून गायब झाले आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर पट्ट्यात शिंदे समर्थकांचा जोर आहे. तिथेही पोस्टरवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब झाले आहेत. हेच चित्र उर्वरीत महाराष्ट्रातही दिसते आहे. बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे समर्थन करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
कुणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? असा प्रश्न ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी काल विचारला होता. शिंदे हे आनंद दिघे यांचे चेले आहेत. ज्यांनी असंख्य राडे करून पक्ष वाढवला, हाणामाऱ्या केल्या, शिवसेनाप्रमुखांच्या एका आदेशासाठी विरोधकांची डोकी फोडून केसेस घेतल्या, असे शेकडो शिवसैनिक ठाण्यात आहेत. त्यांच्या निष्ठा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, कारण एकनाथ शिंदे त्या संघर्षात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. शिवसेनेची मसल पावर म्हणून ओळखलं जात असे त्या एकनाथ शिंदे यांना ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांनी आयुष्यभर एसी केबिनमध्ये बसून फक्त अग्रलेख खरडले ते संजय राऊत एकनाथ शिंदे यांना दम भरण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळं चित्रच विनोदी आहे. राऊत यांच्यासोबत मनिषा कायंदे, प्रियंका चतुर्वेदी ही मंडळी शिवसेनेच्या बाजूने इशारे देतायत.
शिवसैनिकांनी पुण्यात ज्यांचे कार्यालय फोडले त्या तानाजी सावंत यांनी इशारा दिलाय. ‘आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आम्ही संयम बाळगून आहोत, एकदा हा प्रश्न सुटली की जशास तसे उत्तर देण्यात येईल,’ असे तानाजी सावंत म्हणालेत. सावंत यांचा मतदार संघ धाराशिव, पण त्यांच्या व्यवसायाशी संबंधिक पुण्यातील कार्यालय फोडले गेले.
राज्यात अजूनही शिवसेनेची सत्ता आहे. परंतु शिवसैनिक कायदा हातात घेतायत. त्यांना कंट्रोल करणे शक्य नाही असं संजय राऊत सांगत आहेत. विरोधकांना सत्तेच्या बळावर शिवसेना चेपायला निघाली आहे. ‘शिवसैनिकांचा संयम सुटतो आहे, शिवसैनिक अजून रस्त्यावर उतरलेले नाही. एकदा का शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर आग लागेल.’ असा इशारा रस्त्यावर कधी न उतरलेले संजय राऊत, रस्त्यावर राडे करून शिवसेना नेते झालेल्या एकनाथ शिंदे यांना देत आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारने संख्याबळ गमावलं आहे. परंतु वस्तूस्थिती मान्य न करता अखेर पर्यंत रडीचा डाव खेळायची शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.
महाविकास आघाडीकडे १७० चे संख्याबळ होते, परंतु त्यापैकी ५० आमदार गुवाहाटीत जाऊन बसले आहेत. याचा अर्थ महाविकास आघाडीकडे फक्त १२० संख्या उरली आहे. सत्तेचा मोह नाही असे सांगणारे उद्धव ठाकरे तरीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार नाहीत.
२०१९ मध्ये आम्ही भाजपा-शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढवली, परंतु तरीही शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा फैसला केला तेव्हा भाजपाचे कार्यकर्ते असे रस्त्यावर उतरले नव्हते, याची आठवण आज एकनाथ शिंदे गटाचे दिपक केसरकर यांनी करून दिली. गुवाहाटीतून आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
हे ही वाचा:
शिंदेंचे समर्थन करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर
पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत
शिवसेनेतून बाजूला झालेले आमदार ओरडून ओरडून सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेना साफ होते आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज जे शक्ती प्रदर्शन केले, त्यातही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारवायांचा पाढा वाचला. आमच्या मतदार संघातील प्रकल्पांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री करतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पण तरीही शिवसेनेने हे बंड हाताळण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली आहे.
राज्यभरात शिवसेनेची पुंडाई सुरू आहे, परंतु हा सूडाच्या राजकारणाचा अखेरचा अंक असल्याची टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. “आज तुमने मेरा घर तोडा है, कल तेरा घमंड तुटेगा,” असं कंगना म्हणाली होती. परंतु हा घमंड खुर्ची गेल्याशिवाय तुटणार नाही, हे आता शिवसेने स्पष्ट केले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)