गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर

गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर

शिवसेनेचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वलय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कधीच लाभले नाही. पक्षप्रमुख असताना झाकलेली मूठ मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदीच उघडी पडली. घरी बसलेला मुख्यमंत्री असा ठपका पडल्याने ठाकरे यांची क्रेझ पूर्वीपेक्षा ढासळली. परंतु आता सत्ता गमावल्यानंतर ठाकरे अधिकच दीन झालेले दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर गद्दारीचे आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाते आहे. ठाकरे नावाभोवतीचे वलय साफ संपुष्टात आले आहे काय? असा सवाल निर्माण करणारा हा घटनाक्रम आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात बोलणे तर दूरच बोलण्याचा विचार करणेही शिवसैनिकाला शक्य नव्हते. शिवसेनेच्या नेतृत्वाचा हा दरारा उद्धव ठाकरे यांच्या काळात अगदीच लयाला गेल्याचे चित्र सध्या दिसते आहे. ठाकरे पिता-पुत्रांकडून होणाऱ्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. महाराष्ट्राला हे चित्र अगदीच नवे आहे.

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांचा वेगळा गट स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे नवनियुक्त गटनेते खासदार राहुल शेवाळे आक्रमकपणे पक्ष नेतृत्वाचे वाभाडे काढतायत. त्यांनी गेल्या काही दिवसांत ठाकरे पिता-पुत्रांवर अगदी खरमरीत भाषेत टीका केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व लोकसभा निवडणुका विजय मिळवून देऊ शकत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे यांना काय वाटेल याची फिकीर करण्याची गरज आता कुणाला वाटत नाही. शेवाळे हे एके काळी मातोश्रीच्या अगदी जवळचे होते. त्यामुळे नगरसेवक असताना अनेक वेळा त्यांना स्थायी समिती अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. परंतु तेच शेवाळे आता ठाकरेंच्या अरे ला, का रे… अशी उत्तरे देत आहेत. विचारधारेशी फारकत घेऊन सत्ता जवळ करण्याचा सौदा ठाकरे पिता-पुत्रांसाठी अगदीच महागडा ठरतोय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत अनैसर्गिक आघाडी केल्यावरून शिवसेनेत सुंदोपसुंदी माजली. महाराष्ट्रातील सत्तेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. ठाकरे यांच्याशी फारकत घेताना शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर ठपका ठेवला असला तरी आता ठाकरेंच्या नेतृत्वातील त्रुटींवर उघड उघड शरसंधान सुरू झाले आहे. शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणावरच सवाल उभा केला आहे.
ठाकरे विजय मिळवून देऊ शकत नाहीत, ती क्षमता फक्त मोदींमध्ये आहे, असे शिवसेनेच्या खासदारांचे म्हणणे आहे. आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतानाही आम्हाला लोकांना सामोरे जायचे आहे, मतदार संघातून निवडून यायचे आहे, असाच सूर लावला होता.

शिवसेनेचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावूनच जिंकले, या भाजपाच्या दाव्यावर शिवसेना खासदारांकडूनच शिक्कामोर्तब होते आहे. जे सत्य उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने नाकारत होते, ते त्यांच्या खासदारांनी उच्चारवाने सांगायला सुरूवात केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पक्षाचा चेहरा असू शकत नाहीत. शिवसेनेच्या खासदारांना भाजपाशी युती करण्याची इच्छा असून मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा आहे, असे मत त्यांनी नोंदवले. अनेक मतदार संघात सामना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्यामुळे भाजपा हाच युतीसाठी एकमेव पर्याय आहे आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात आम्हाला अजिबात रस नाही असे त्यांनी नेतृत्वाला सुनावले आहे. एकाप्रकारे त्यांनी उद्धव आणि राहुल गांधी यांना एका रांगेत उभे केले आहे.

हे ही वाचा:

तृणमूल काँग्रेसचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

मुद्दा फक्त नेतृत्वापुरता मर्यादीत राहीला नसून आता ठाकरे परीवाराकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर द्यायला एकनाथ शिंदे समर्थकांनी सुरूवात केली आहे. सध्या शिवसंवाद यात्रेवर निघालेले आदीत्य ठाकरे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर गद्दारीचे आरोप करत फिरतायत. त्याचा समाचारही शेवाळे यांनी घेतला आहे.

वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे भाजपा- शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांशी लढून विजयी झाले होते. परंतु, सत्तेसाठी आदित्य ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. ही गद्दारी नाही का? त्यामुळे गद्दार कोण याचे उत्तर वरळीची जनताच त्यांना देईल, असे शेवाळे म्हणाले आहेत.

गमावलेली सत्ता परत मिळवता येते. देवेंद्र फडणवीस यांनी हे दाखवून दिले. पण ठाकरे पिता- पुत्रांना हे करून दाखवता येईल का? आणि सत्ता मिळवता आली, तरी गमावलेली पत त्यांना पुन्हा मिळवता येईल काय, या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version