24 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरसंपादकीयफडणवीसांच्या जय जयकाराची स्क्रीप्ट नेमकी कोणाची?

फडणवीसांच्या जय जयकाराची स्क्रीप्ट नेमकी कोणाची?

Google News Follow

Related

राजकारणातील मुंगळे कायम सत्तेच्या गुळाला चिकटण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र वारंवार पाहायला मिळाले आहे. मविआच्या सत्ता काळात देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू होती. परंतु, बहुधा इंधन कमी पडल्यामुळे हा कट शिजलाच नाही. आज तेच नेते फडणवीसांच्या आरत्या ओवाळतायत. फडणवीसांची तारीफ करणाऱ्यांच्या यादीत आता सुप्रिया सुळे यांचे नावही सामील झाले आहे. सुप्रिया सुळे या काही फडणवीसांच्या समर्थक नाहीत. त्यांच्या कडव्या विरोधकांमध्ये सुळे यांचे नाव घेतले जाते. त्या जर फडणवीसांची प्रशंसा करत असतील तर समजा मामला गडबड है. लोकांच्या मनात गोंधळ माजलाय. हे बोल त्यांचेच आहेत की सुळेबाई दुसऱ्याची स्क्रिप्ट वाचतायत हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

राज्यात मविआचे सरकार असताना विरोधकांच्या रडारवर असलेला एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होते. शरद पवार, उद्धव ठाकरे या राजकीय विरोधकांसह मनोज जरांगेंच्या तोफाही फडणवीसांच्या विरोधातच धडाडत होत्या. हा माहोल आता बदललेला दिसतोय. ज्या फडणवीसांना तुरुंगात पाठवण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कट रचण्यात आला. जे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत एका पोलिस आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली. त्याच नेत्याच्या आरत्या ओवाळण्याची स्पर्धा सुरू आहे.

मविआच्या कार्यकाळात सुप्रिया सुळे यांचे एक विधान प्रचंड गाजले होते. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा…’ या विधानावरून सत्ताकाळातच त्या अनेकदा ट्रोल झाल्या. याच विधानाला छेद देणारे विधान त्यांनी अलिकडेच केले आहे. ‘राज्यात महायुतीला एवढा मोठा मॅण्डेट मिळाला असताना राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त एकच नेता ताकदीने काम करताना दिसतो आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस.’ या एका विधानात दोन ठसठशीत मुद्दे आहेत. एक तर महायुतीला मोठा जनादेश मिळाल्याचे सप्रिया सुळे पुन्हा एकदा मान्य करत आहेत. त्यांच्याच पक्षाचे उत्तम जानकर दिवसभरात एकदा तरी महायुतीचे सरकार इव्हीएममुळे जिंकून आले आहे, असा दावा करत असताना सुप्रिया सुळे यांनी सतत हा दावा नाकारला आहे. आता तर महायुतीला जनतेचा प्रचंड मोठा मॅण्डेट मिळाल्याचे त्यांनी जाहीरपणे मान्य केले आहे. एकाबाजूला ‘मारकडवाडी पॅटर्न’ची हवा काढत असताना त्यांनी फडणवीस यांची तोंड भरून तारीफ केलेली आहे.

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता. अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त थोरल्या पवारांची गाठभेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. तेव्हा पासून पवार भाजपासोबत जाणार अशी चर्चा जोरात सुरू झालेली आहे. अलिकडेच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. त्यानंतर या चर्चेने जोर धरला. शिवसेनेचे आमदार आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील शरद पवारांचा पक्ष महायुतीत सामील होऊ शकतो असे भाकीत केलेले आहे. हे भाकीत बिनबुडाचे नाही, याचे संकेत सुप्रिया सुळे देतायत का? सुप्रिया सुळे यांची वक्तव्य तशी दखलपात्र नसतात. ती फारशी कुणी गंभीरपणे घेतही नाही. परंतु त्यांचे ताजे वक्तव्य त्यातले नाही. हे वक्तव्य त्यांचे असले तरी बोल मात्र त्यांचे नाहीत. ही स्क्रिप्ट कोणाची आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही.

राजकारणातील बरे वाईट निर्णय एकाच कारणासाठी घेतले जातात. ते कारण म्हणजे गरज. सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक होते त्याचे कारण गरज. सुप्रिया सुळे फडणवीसांची प्रशंसा करतात, त्याचेही कारण गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातील एनडीएचे सरकार ताकदीने चालवतायत. परंतु काही बाह्य शक्ती हे सरकार अस्थिर करण्याचे पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतायत ही बाबही सत्य आहे. काही काळापूर्वी आपण पाहिले की, अमेरीकी मुत्सद्दी आंध्र प्रदेशात जातात आणि चंद्राबाबूंची भेट घेतात. अशा गाठीभेटी हवा पाण्याच्या गप्पा मारण्यासाठी केल्या जात नाहीत. या भेटी मागील अमेरीकी राजकारणाची अनेक राजकीय पंडितांनी पोलखोल केलेली आहे. बांगलादेशात जे घडले ते भारतात घडले नाही. परंतु तसे प्रयत्न करण्यात आले होते ही बाब काही लपलेली नाही.

हे ही वाचा..

“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”

“गावे स्वावलंबी असतील तेव्हाच देश स्वावलंबी होईल”

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिव्हन अजित डोवाल यांना भेटणार

दिल्लीत भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपाकडे आज पुरेसे संख्याबळ आहे. परंतु पवारांचे ८ खासदार यात वाढले तर सरकारची मजबूती वाढणार आहे. पवार सोबत येण्याचे काही तोटे असले तरी काही फायदेही आहेत. पवार सरकारसोबत आले तर महाराष्ट्रातील पेटवापेटवीचे प्रयोग बंद होतील. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी इंडी आघाडी नावाचा एक फड बनवला होता. जो आजही अस्तित्वात आहे. पवार या फडाच्या तंबूचा एक महत्त्वाचा बांबू आहेत. राज्यात जेव्हा मविआचा प्रयोग राबवण्यात आला तेव्हा पवार आणि काँग्रेस पक्षाने एकत्र सत्ता उपभोगली आहे. राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला पवारांची साथ हवी आहे. ते भाजपासोबत आले तर इंडी आघाडीच्या फुग्यातील हवाच निघून जाईल. या आघाडीतील नॅशनल कॉन्फरन्स, डीएमके आदी पक्षांशी पवारांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे पवार बाहेर पडल्यावर ही आघाडी केवळ नावापुरती शिल्लक राहील. काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात एकाकी पडेल. अर्थात अशा प्रकारच्या सोयरीकीत काही अडथळे आहेत. त्यामुळे ही सोयरीक प्रत्यक्षात येईलच असे कुणी ठामपणे सांगू शकत नाही. परंतु राष्ट्रवादी शपच्या नेत्यांनी त्या दृष्टीने पावले टाकायला सुरूवात केल्याचे चित्र तरी दिसू लागले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा