भाजपाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली. तरी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरत नाही. अजून काथ्याकुट संपत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील सुंदोपसुंदी बाहेर काढली आहे. मविआचे नेते भाजपाकडे डोळे लावून बसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे.
किस्सा सुरू झाला उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना लिहिलेल्या पत्राने संविधान वाचवण्यासाठी मविआसोबत या असे आव्हान आव्हाडांनी केले. त्यावर उत्तर देताना तुम्ही आरएसएस-भाजपासोबत जाणार नाही, असे लिहून द्या असे प्रत्युत्तर आंबेडकरांनी दिले.
ही पत्रापत्री खासगीत झालेली नाही. आव्हाडांनी एक्सवर अपलोड केलेल्या पोस्टमधून आवाहन केले, आंबेडकरांनी एक्सवरूनच उत्तर दिले. हा प्रकार म्हणजे प्रेमात पडलेले दोघे, समाज माध्यमांवर प्रेम कुजन करतात, असा काहीसा प्रकार आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या एखाद्या प्रियकराने समाज माध्यमांवर प्रेयसीला विचारावे की आपण लग्न करायला हवे? प्रेयसीने त्याला उत्तर द्यावे तू शेजारणीसोबत पळून जाणार नाही, असे मला लिहून दे. हा सगळा संवाद ऐकून जगाने फिदीफीदी हसावे. सगळाच फाजीलपणा.
समाज माध्यमांवर हा संवाद झाला. आपले बऱ्यापैकी हसे झाले, याची खात्री झाल्यानंतर दोघांनी पोस्ट डीलीट केली. या संवादाचे अनेक अर्थ निघतात. भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या या पक्षांचे मूळात एकमेकांवर विश्वास नाही. समोरचा पक्ष भाजपाला आधीच लागू झालाय, असा संशयही आहे.
हे ही वाचा:
मालदीवने दाखविली मस्ती…१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!
हिटमॅन ऱोहित… अब की बार ६०० पार
युपीमध्ये काँग्रेसला धक्का, वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा भाजपात!
आंबेडकरांनी लिहून द्या म्हटले तर लिहून द्यायचे. संजय राऊत आणि त्यांचे मालक सकाळ संध्याकाळ भाजपाच्या विरोधात पिपाण्या वाजवत असतात. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे नेते तुतारी वाजवत असतात. मग दोघांना अडचण काय होती, लिहून द्यायला?
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा, तर संजय राऊतांनी चक्क असे लिहून देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. शरदचंद्र गटाने गप्प राहणे पसंत केले.
आंबेडकरांच्या प्रश्नात एक गर्भितार्थ दडलेला आहे. जो संशय वंचितला आहे, तोच संशय काँग्रेसलाही आहे. उबाठा गटाकडे आता काहीच उरलेले नसताना ते लोकसभेसाठी २३ जागांवर अडून बसलेले आहेत. कारण मविआत जागा वाटपावरून बखेडा निर्माण व्हावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बाजूला करून राष्ट्रवादी आणि उबाठा हे एकत्र निवडणूक लढतील, असा संशय काँग्रेस नेत्यांना आहे. एमआयएमने काँग्रेसशी आघाडीसाठी संपर्क केलेला आहे. परंतु काँग्रेस याला तयार होणार नाही. राज्य पातळीवर हे समीकरण जुळू शकेल.
केंद्राकडून मात्र याला संमती मिळण्याची शक्यता नाही. कारण राहुल गांधी कायम एमआयएमला भाजपाची बी टीम म्हणतात. त्यामुळे अशी आघाडी करायची असेल तर राहुल गांधींना आधी आपले शब्द गिळावे लागतील. काँग्रेसला समस्या आहे, राष्ट्रवादी आणि उबाठाला मात्र काहीच अडचण नाही.
आंबेडकर यांनी आधी उबाठा गटाशी युती जाहीर केली. मविआमध्ये वंचितचा समावेश व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. अद्यापि ते सहभागी झालेले नाहीत. ते अजून काठावर आहेत. आता त्यांना पूर्ण खात्री झाली आहे की मविआमध्ये फूट पडणार आहे.
उबाठा गट भाजपासोबत उघडपणे जाण्याची शक्यता नाही, परंतु भाजपासोबत सेटींग शक्य आहे. पक्ष प्रमुख ठाकरेंनी मविआतून बाहेर पडावे आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या अशी ऑफर असल्याची चर्चा आहे. घडामोडीही त्याच दिशेने घडतायत. उबाठा गट जागा वाटपाच्या चर्चेच ताणून धरतो आहे. पक्षाचा जेवढा जीव उरलेला नाही, तितके ताणून धरतो आहे. २३ जागांची मागणी वारंवार केली जाते आहे. मविआमध्ये उबाठा २२, काँग्रेस १६ आणि शरदचंद्र गट १० या फॉर्म्युलावर चर्चा होते आहे. वंचितचा मविआत समावेश झालाच तर तिघांनी आपआपल्या कोट्यातील जागा त्यांना द्याव्यात असे ठरते आहे. परंतु ही चर्चा फलद्रुप होईल अशी अजिबात शक्यता नाही, असे काँग्रेसला ठामपणे वाटते आहे. उबाठा गट ऐनवेळी मविआतून बाहेर पडेल, असे गृहीत धरून काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत.
जे आंबेडकरांना वाटते, जे वाटते, काँग्रेसला जे वाटते ते संजय राऊतांचे उत्तर ऐकून खरे वाटू लागले आहे. भाजपाचा किती तिटकारा आहे, हे संजय राऊत सकाळ संध्याकाळ मीडियाला दाखवत असतात. त्यांचे मालकही तेच सांगत असतात. मग लिहून द्यायला हरकत काय? प्रकाश आंबेडकर रोज उबाठा- शरद गटाचे वस्त्रहरण करतायत. भाजपासाठी नेमकं कोण काम करते आहे, याबाबत आता जनताही संभ्रमात पडली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)