तीस साल बाद???? मृत्यूची बातमी की अफवा?

ही बातमी रविवारी रात्री वाऱ्यासारखी का पसरली?

तीस साल बाद???? मृत्यूची बातमी की अफवा?

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण साखळी बॉम्बस्फोट घडवणारा माफिया दाऊद इब्राहीम मृत्यूशी झुंजतोय, अशा बातम्यांचे पाकिस्तानात पीक आले आहे. दाऊदवर विष प्रयोग करण्यात आल्यामुळे त्याला कराचीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आयएसआय आणि पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला गराडा घातला आहे. अशा प्रकारच्या या बातम्या आहेत. परंतु, त्याची पुष्टी कोणीही करताना दिसत नाही. कराचीतील हॉस्पिटलमध्ये दोन दिवस दाऊदवर उपचार सुरू आहेत. मग ही बातमी रविवारी रात्री वाऱ्यासारखी का पसरली? रविवारी संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट ठप्प झाल्यामुळे अनेक यू-टयुबर्सनी याचा संबंध दाऊदशी जोडला.

 

 

दाऊदवर विष प्रयोग झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी इंटरनेट ठप्प होण्याचा दाऊदशी संबंध नसावा. रविवारी पाकिस्तानात इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाचा व्हर्च्युअल मेळावा होता. इम्रान यांच्या पक्षाशी सध्या सरकारचे वाकडे आहे. त्यामुळे या मेळाव्याची हवा काढण्यासाठी हंगामी सरकारने लष्कराशी हात मिळवणी करून इंटरनेट ठप्प केले असण्याची शक्यता आहे. कारण इम्रान खान यांच्या पक्षाशी हंगामी सरकार आणि लष्कराचा मोठा पंगा सुरू आहे.

 

इंटरनेट ठप्प झाल्याचा संबंध दाऊदशी जोडला गेल्यामुळे रविवारी रात्री या बातमीचा चांगलाच बोभाटा झाला. मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी साजीद मीर याच्यावर ५ डिसेंबर रोजी डेरा गाझी खान येथील मध्यवर्ती तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. त्याला बहावलपूर येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. साजिद मीर हा एफबीआयच्या मोस्ट वॉण्टेड यादीवर होता. तो पाकिस्तानात नाही, असे पाक सरकारने अमेरिकेला वारंवार सांगितले होते. त्याचा मृत्यू पाकिस्तानात झालाय हे उघड झाले असते, तर अमेरिकेचा भडका उडाला असता. फायनान्शिअल एक्शन टास्क फोर्सच्या कचाट्यातून नुकताच सुटलेल्या पाकिस्तानला हे परवडणारे नव्हते. त्यामुळ साजीद मीरच्या मृत्यूवर शिक्कामोर्तबही झाले नाही आणि त्याची चर्चाही होऊ नये असा प्रय़त्न झाला.

 

 

तो पर्यंत पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांना अज्ञात मारेकऱ्यांकडून गोळ्या घातल्या जात होत्या. साजीद मीरपासून विषप्रयोगाचा पॅटर्न सुरू झाला. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या दहशतवाद्यांसाठी हा पॅटर्न उपयुक्त ठरत असल्यामुळे दाऊदच्या विरोधातही तो वापरण्यात आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दाऊद जर खरोखरच जाण्याच्या मार्गावर असेल तर पुढचा नंबर हाफीज सईदचा असणार हे उघड.

 

ज्या कारणामुळे साजीद मीरची हत्या पाकिस्तानने दडवून ठेवली तीच मजबुरी दाऊदवर झालेला विषप्रयोग झाकून ठेवण्यात असू शकते. परंतु साजीद मीर आणि दाऊदमध्ये फरक आहे. दाऊद १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर पळाला असला तरी मुंबईत त्याची पाळंमुळं आहेत. त्यामुळे कराचीतील क्लिफ्टन एरियात कडेकोट बंदोबस्तात राहणाऱ्या दाऊदबाबत इथे बातम्या थोड्या उशीरा येतील, परंतु येणार हे नक्की.

 

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे तुरुंगात आहे. बहीण हसीना पारकर हिचा मृत्यू झाला असला तरी तिचा मुलगा दाऊदचा भाचा अलिशाह पारकर आजही डोंगरीत राहतो. दाऊदची थोरली बहीण सईदा हिचा मुलगा साजिद वागळे हा देखील माझगावमध्ये राहतो. दाऊद गँगचे अनेक लोक डोंगरीत राहतात. दाऊदवर विषप्रयोगाची बातमी पसरल्यानंतर डोंगरीत सन्नाटा आहे. कोणीही एक शब्द बोलायला तयार नाही. सगळीकडे चिडीचूप. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी दाऊद गँगचे जुने खबरी आणि दाऊदच्या नातेवाईकांच्या माध्यमातून खातरजमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

दाऊदची परिस्थिती गंभीर आहे की ही निव्वळ अफवा आहे याची खातरजमा फक्त कराचीतून होऊ शकते. तिथे गेल्या काही महिन्यात जे काही घडतेय त्याचा अर्थ इतकाच की तिथे भारताचे डीप असेट ताकदीने कामाला लागले आहेत. आजवर पाकिस्तानात जे दोन डझनावर दहशतवादी अल्लाला प्यारे झाले, त्यांच्या मृत्यूवर भारत किंवा पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांनी ना शिक्कामोर्तब केले, ना खंडन. परंतु भारत आणि पाकिस्तानात माफिया आणि गुप्तचरांचे एक समांतर जग आहे. तिथून या माहितीवर शिक्कामोर्तब होत असते.

हे ही वाचा:

हिंदू मुलाशी प्रेम केले म्हणून मुस्लीम तरुणीची तिच्या भावांकडून हत्या

रशियाचे व्लादिमिर पुतिन पुन्हा राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत!

ठाकरेंनी अदानींचे विमान वापरले, पैसे नाही भरले!

राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार तीन दिवस ठप्प!

 

दाऊद कराचीच्या हॉस्पिटलमध्ये आहे. संपूर्ण मजला त्याच्यासाठी आरक्षित. तिथे प्रवेश फक्त आय़एसआय आणि त्याच्या मोजक्या कुटुंबियांना. उद्या तो मेला तरी त्याचे दफन जाहीरपणे होणार नाही. दाऊद अत्यवस्थ किंवा दाऊद गेला अशा बातम्या तो पाकिस्तानात फरार झाल्यापासून अनेकदा आलेल्या आहेत. २००५ मध्ये दाऊदची मुलगी माहरुख हिचा पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद याचा मुगला जुनेदशी निकाह झाला तेव्हा त्याला ठोकण्याची योजना होती. दाऊद तेव्हा बालंबाल बचावला होता. छोटा राजन टोळीचे शूटर फरीद तनाशा आणि विकी मलहोत्रा दाऊदचा गेम करण्यासाठी अनेक वेळा कराचीत जाऊन आले. पण उपयोग झाला नाही.

 

आताही दाऊदवर झालेल्या विषप्रयोगाची बातमी आली असली तरी ती खरी असेल याची शाश्वती नाही. साधारण अशाच वावड्या यापूर्वी अनेकदा उठल्या आहेत. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याला सुखरुप पळ काढू देणाऱ्यांकडे पक्की खबर असण्याची शक्यता आहे. दाऊदला भारतात परतायचे होते. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या मार्फत त्याने भारत सरकारकडे निरोपही पाठवला होता. परंतु त्याच्या शर्ती मानणे शक्य नसल्याचे तत्कालीन काँग्रेस सरकारने स्पष्ट केले. खरे तर तो इथे आलेला अनेकांना परवडणार नव्हते. पाकिस्तानात बरेच अज्ञात कार्यरत आहेत. त्यापैकी काहींनी भारतात सक्रीय व्हायला काय हरकत आहे. इथेही बरेच आहेत की?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version